Skip to main content
x

आठवले, अनंत दामोदर

           ‘‘स्वामी वरदानंद भारती  तथा पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंत दामोदर आठवले त्यांच्या समग्र जीवनावर ओझरता जरी दृष्टिक्षेप टाकला, तरी ते सप्तरंगी इंद्रधनुष्याप्रमाणे,  वेदप्रणीत जीवन, अनन्य गुरुनिष्ठा, माणूसपण, भगवंताचे गुणगान, संस्कृतीचे दर्शन,  प्राचीन विचारांचे सम्यक प्रतिपादन आणि  राष्ट्रासाठी अचूक मार्गदर्शन असे विविधांगी असल्याचे लक्षात येते.’’ असे स्वामी गोविंददेव गिरी अर्थात पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास यांनी म्हटले आहे.

आधुनिक महीपती म्हणून ख्यातकीर्त असलेले परमपूज्य संतकवी दासगणू महाराज अर्थात गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे यांचे अनंत यांच्या वडिलांशी म्हणजेच दामोदर वामन आठवले यांच्याशी पिता- पुत्राप्रमाणे संबंध होते.

पुढे श्रीपादराव महाबळ यांच्या मोठ्या मुलीबरोबर दामोदर यांचा विवाह सन १९१४ साली शिर्डी येथे  संपन्न झालागृहस्थाश्रमी दामोदर व राधाबाई यांच्या पोटी एक-दोन अपत्ये झाली देखील;  पण ती अल्पजीवी ठरली. पुढे अनंत चतुर्दशी शके १८४२ म्हणजे दिनांक २७ सप्टेंबर १९२० या दिवशी सकाळी अनंत म्हणजेच स्वामी वरदानंद भारती यांचा  जन्म झाला.

सन १९२४ साली अनंत यांच्या वडिलांचे म्हणजेच दामोदर आठवले यांचे क्षयरोगाने निधन झाले. त्यामुळे साहजिकच अनंत यांचा प्रतिपाळ दासगणू महाराजांनी केला. दासगणू महाराजांजवळ त्यांचे शिक्षण अनौपचारिकरीत्या होऊ लागले. अनंताची  स्मरणशक्ती उत्तम होती.  वयाच्या तिसऱ्या वर्षी केलेले पाठांतर सर्वांना स्तिमित करून टाकणारे होते. परंतु अनंता लहानपणी अगदी रोगट होता. त्यामुळे अनंता दहा वर्षांचा होईपर्यंत शाळेत गेला नाही. सन १९३०साली अनंताला पंढरपूरच्या आपटे महाविद्यालय या शाळेत घातले गेले. अनंताची तयारी पाहून त्याला एकदम दुसऱ्या वर्गात प्रवेश देण्यात आला.

अनंताला वयाच्या सहाव्या वर्षापासून ते पंधरा-सोळाव्या वर्षापर्यंत किमान चार वेळेला विषमज्वराचा त्रास झाला. वैद्यांना भरपूर औषधपाणी करावे लागे, दादा नेहमी विष्णुसहस्रनामाचे पाठ म्हणत अनंताच्या अंगावरून हलके हलके हात फिरवत असत. महाराजांचे म्हणजेच दादांचे अनंतावरील प्रेम हे शब्दांच्या पलीकडचे होते.

इंग्रजी चौथीत असताना आपल्या प्रकृतीची काळजी आपण स्वत:च घ्यायची या निश्चयाने त्याने  व्यायामासाठी संघाच्या शाखेत नियमित जायला सुरुवात केली. वाचनाचे वेड असलेल्या अनंताने याच काळात गीतारहस्यासारखा गंभीर ग्रंथ पूर्ण वाचून काढला. दररोज आठ-दहा तास चौफेर वाचन चालत असे. दादांशी अनेक विषयांवर त्यांचे वादविवाद होत. तो काळ इंग्रज राजवटीचा होता त्यामुळे साहजिकच भारतीय संस्कृतीच्या विचारधारेला तडे पडत होते. परंतु सिद्धान्तांच्या दृष्टीने तत्कालीन परंपराविरोधी मते ही फसवी, फुसकी आणि पक्षपाती आहेत आणि भारतीय संस्कृतीची तात्त्विक बैठक हा पाया आहे, हे अभ्यासाअंती अनंताच्या लक्षात आले.

सन १९३९-१९४० या शैक्षणिक वर्षात अनंताने मॅट्रिकच्या वर्गात प्रवेश केला. संघशाखा, कीर्तन, उत्सव-महोत्सव अशी अनेक व्यवधाने सांभाळून मॅट्रिकच्या परीक्षेचा अभ्यास चालू होता. शालान्त परीक्षेचे केंद्र पंढरपुरात होते. त्यानंतरची उन्हाळ्याची सुट्टी लांबलचक मोठी असल्यामुळे निकाल लागेपर्यंतच्या काळात वयाच्या विसाव्या वर्षी श्रीशालिवाहनहे महाकाव्य लिहिण्यास अनंताने सुरुवात केली. शकांच्या दास्यातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी तळमळणाऱ्या शालिवाहनाने कालिका देवीला केलेल्या प्रार्थनेने या महाकाव्याचा आरंभ केला. जून १९४० मध्ये शालान्त परीक्षेचा निकाल लागला, अनंता उच्चद्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला. सर्वांना अतिशय आनंद झाला. पुण्यातील ख्यातनाम वैद्य श्री. पुरुषोत्तमशास्त्री नानल यांनी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रवेशासाठीचा अर्ज व मॅट्रिकमधील यशाबद्दल अनंताचे अभिनंदन करणारे पत्र दादांच्या नावे पाठवले. त्यांच्या आग्रहानेच ऑगस्ट १९४०पासून  पुण्यातील आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण सुरू झाले.

दिनांक १९ फेब्रुवारी १९४१रोजी गोरज मुहूर्तावर पंढरपूर येथील खाजगीवाले यांच्या वाड्यात अनंतरावांचा विवाह पंढरपूरपासून जवळच असलेल्या कळमरोडचे स्टेशन मास्तर श्री. हरी गणेश लिमये यांची मुलगी विमल हिच्याशी संपन्न झाला. पू.दादांनी तिचे नाव इंदिरा ठेवले. अनंतरावांच्या वाचनाच्या आवडीला पुण्यातील वास्तव्यात खतपाणीच मिळू लागले. ते राजकीय, सामाजिक, ललित आदी वाङमय सारख्याच आवडीने वाचत असत. कथा, कीर्तन, नाटक, सिनेमा यांचीही त्यांना आवड होती. संगीत नाटक ते आवर्जून बघत असत.  अनंतराव अत्यंत व्यासंगी, विद्वान तसेच रसिक, हौशी होते. तीव्र स्मरणशक्ती आणि एकाग्रता यांमुळे त्यांची अभ्यासावरील पकड कायम असे.

अनंतराव पुण्यात गेल्यावर राजकारणात सक्रीय झाले नाहीत, तरी हिंदुत्व जागृतीचा वसा घेऊन त्यांनी त्यांच्या कार्याची दिशा ठरवली. त्यातून त्यांचे समाजाबद्दलचे प्रेम व राष्ट्राबद्दलची निष्ठा प्रत्ययाला येते. आयुर्वेद महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष तथा प्रख्यात शल्य-चिकित्सक डॉ. एन.जे.बॅन्ड्रावाला हे शल्यचिकित्सा कक्षात मार्गदर्शन करत असत. डॉ. बॅन्ड्रावाला हे विद्यार्थ्यांनी पॅन्ट घालूनच ऑपरेशन थिएटरमध्ये आले पाहिजेयाबद्दल आग्रही होते. अनंतराव नेहमीप्रमाणेच धोतर नेसून आले होते. सेवकाने त्यांना प्रवेश नाकारला. डॉ. बॅन्ड्रावाला यांची सूचना कळल्याबरोबर स्वाभिमानी अनंतराव डॉक्टरांच्या कार्यालयात गेले व त्यांनी विचारले, ‘सर, आपण धोतर नेसणाऱ्याला प्रवेश नाकारला आहे काय?’ ‘हो, कारण जंतुसंसर्गाची भीती....’ डॉ. बॅन्ड्रावाला यांना अडवत अनंतराव म्हणाले, ‘तर मग माझी एक विनंती आहे. माझ्या वर्गातील इतर कोणत्याही एकाची पॅन्ट व माझे धोतर यांची आपण तपासणी (कल्चर) करू. पॅन्टपेक्षा माझ्या धोतरात जर जास्त जंतू आढळले, तर मी पॅन्ट घालून येईन. माझे धोतर रोज धुतलेले असते. चोपून-चापून नेसलेले असते. वर अॅप्रन  घातलेला असतोच.’ अनंतरावाची बोलण्याची पद्धत, प्रभावी व्यक्तिमत्त्व, बिनतोड युक्तिवाद यांमुळे त्यांना शल्य-चिकित्सा कक्षात धोतर नेसूनच प्रवेश दिला गेला. आपल्या संस्कृतीवरील त्यांची निष्ठा अशा पद्धतीने अनेक वेळा लहान-मोठ्या प्रसंगांतून व्यक्त होत गेलेली पहावयास मिळते.

जबरदस्त स्मरणशक्ती, कुशाग्र बुद्धी, तीव्र आकलनशक्ती आदी गुणांमुळे अभ्यास करताना ते विषयाशी सहज एकरूप होत असत. ज्ञानार्जनाची तीव्र लालसा त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे ते परीक्षार्थी कधीच नव्हते. जुलै १९४४ मध्ये अनंतराव आयुर्वेद विशारदही पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

पू. दादांनी १९४४ सालापासून सर्व उत्सवांतली कीर्तन-प्रवचने त्यालाच करायला सांगितली. एव्हाना अनंतरावांना परिवारातील सर्व लोकदेखील अप्पा या टोपणनावानेच संबोधू लागले. . . १९४४ ते १९४८ या काळात अप्पांनी पू. दादांबरोबर कीर्तनाच्या निमित्ताने भ्रमंती केली.

दादांचा मुंबईतही बराच शिष्यवर्ग होता. विलेपार्ल्याला श्री भवनीशंकर गणपत सशीतल यांच्याकडे एकदा एकादशीनिमित्त कीर्तन होते.  दादांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यामुळे अप्पांनी कीर्तन केले. पूर्वरंगातील विद्वताप्रचुर, प्रासादिक विवेचन, रसाळ व भावपूर्ण कथा, कथानक मांडण्याची अंत:करणाचा ठाव घेणारी शैली यांमुळे अप्पांचा मुंबईत अल्पावधीतच चांगला नावलौकिक झाला.

सन १९४५-१९४६ च्या दरम्यान पुण्यात डॉ. वा. रा. ढमढरे यांच्या घरी अप्पांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठरला. डॉ. ढमढरे यांनी पुण्यातील विविध क्षेत्रांतील अत्यंत निवडक अशा मंडळींना पाचारण केले. त्यात प्रसिद्ध साहित्यिक, प्राध्यापक, इतिहासकार आदींचा समावेश होता. पू. दादादेखील उपस्थित होते. श्रोत्यांमध्ये साहित्यसम्राट न.चिं. तथा तात्यासाहेब केळकर उपस्थित होते. त्यांनी लिहिलेला जुगारी तो जुगारी आणि वर धर्मराजहा लेख अप्पांनी नुकताच वाचला होता. तो लेख वास्तवाला धरून नव्हता. त्यामुळे त्याचा अप्पांना राग आला होता. तो विषय लक्षात ठेवून अप्पांनी  अनेकांची अनेक मते । तयाने चित्त व्यग्र होते ॥ध्रु॥हे पूर्वरंगाचे पद लावले. संस्कृती संरक्षणाचे कार्य ज्यांनी आवर्जून केले पाहिजे, त्यांनीच भारतीय संस्कृतीचा मापदंड असलेल्या महाभारतासारख्या ऐतिहासिक ग्रंथातील व्यक्तिमत्त्वांचे असे अवमूल्यन करावे, याची मनस्वी चीड अप्पांनी पूर्वरंगातून व्यक्त केली. भारतीय संस्कृतीच्या संदर्भातले खंडण-मंडण तात्यासाहेबांच्या लेखासंदर्भातले आहे, हे व्यासंगी श्रोत्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहिले नाही. पूर्वरंगाची भाषा बोचरी होती, पण लेख आणि लेखकाचा नामोल्लेख त्यांनी टाळला होता. त्यामुळे जेथे लागायला पाहिजे तेथे ते वाग्बाण बरोबर मर्माचा भेद करत होते. प्रत्यक्ष भेटीत तात्यासाहेब केळकरांनी अप्पांना कीर्तन आवडल्याचे सांगत पूर्वरंगाच्या पदावरील विवेचनाचा सर्व रोख आमच्यावरच होता ना? असेही विचारले.  कीर्तनात आपण जी विधाने केली होती ती प्रामाणिक होती, सत्याला धरून होती, त्यामुळे अप्पांना आतून धीर वाटत होता. पण तात्यासाहेबांचा नावलौकिक मोठा म्हणून त्यावर काही उत्तर न देता अप्पांनी तो विषय तेथेच संपवला.

मिरजेचे राजे श्री. नारायणराव गंगाधरराव तथा तात्यासाहेब पटवर्धन यांनी तुलसीरामायण जसे साकी, चौपाई वृत्तात आहे त्याप्रमाणे कृष्णकथा रचावी, असा आग्रह दादांकडे धरला. परंतु अप्पांनीच ते लिहावे अशी दादांची इच्छा होती. पू. दादांच्या आज्ञेप्रमाणे लिखाण सुरू झाले. सन १९४५ ते १९४९ या कालावधीत लिहून पूर्ण झालेल्या अठरा सर्गांच्या या काव्याला अप्पांनी श्रीकृष्ण-कथामृतअसे नाव दिले. बहुतेक पादाकुलक वृत्त, मधूनमधून साक्या असलेले हे काव्य चौपाई व दोहे यांच्या चालीवर रचलेले आहे. प्रत्येक सर्गाला मंगलाचरण असून ते संस्कृतमध्ये आहे. रामचरितमानसाशी साधर्म्य असलेले हे काव्य रसाळ, प्रासादिक, सुबोध, ओजस्वी तसेच भक्तिरसाने ओथंबलेले असून शांत रसासह सर्व रसांचा परिपोष यात आहे. हे अप्पांचे मराठीतील पहिले महाकाव्य आहे.  १९५० साली ते प्रकाशित झाले. गुरुदेव श्री. रा..रानडे यांनी या काव्यग्रंथाला प्रस्तावना दिली. या काव्यनिर्मितीमुळे अप्पा वयाच्या पंचविशी-तिशीतच महाकवी पदवीला प्राप्त झाले.

कीर्तनहे समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन होऊ शकते याची पूर्ण जाणीव पू.अप्पांना असल्याने त्यांच्या कसदार कीर्तनात साहित्यापासून राजकारणापर्यंत व कुटुंबव्यवस्थेपासून समाजकारणापर्यंत सर्व विषयांचा परामर्श घेतला जाई. त्यामुळे पू.अप्पांची कीर्तने प्रत्यक्ष ऐकणे ही एक दिव्य अनुभूतीच! कीर्तनाची मांडणी अतिशय शास्त्रीय असे. पूर्वरंगामध्ये दृष्टान्तकथा, संदर्भ-दाखले देत विज्ञानाच्या आधाराने अतिशय सोप्या परंतु तर्कनिष्ठ, चिंतनशील आणि प्रभावी वक्तृत्वाने पू.अप्पा अत्यंत रसाळपणे तत्त्वज्ञानाची मांडणी करत. पूर्वरंगात प्रतिपादन केलेली तत्त्वे आचरणात आणणाऱ्या संतमहात्म्यांच्या चरित्रातील कथाप्रसंग आणि मग त्या आख्यानामागील तत्त्वांची उजळणी आणि ते तत्त्वज्ञान आचरणात आणण्यासाठी आग्रही प्रतिपादन अशा प्रकारे त्यांच्या कीर्तनाचे सामान्य स्वरूप असेकीर्तनात श्रोत्यांना अंर्तमुख करणे, भक्तिभाव जागृत करणे, शिवाय श्रोत्यांच्या दंभावर प्रसंगी चिमटे घेऊन योग्य ते मार्गदर्शन पू.अप्पा अत्यंत प्रभावीपणे करत असत. त्यांचे अमोघ वक्तृत्त्व, अफाट बुद्धिमत्ता, सूक्ष्म निरीक्षण, आपली संस्कृती-परंपरा-शास्त्र यांचे यथार्थ ज्ञान, शब्दफेक, मार्मिक आणि नर्म विनोद अशी वैशिष्ट्ये पू.अप्पांच्या कीर्तनात श्रोता अनुभवत असे. आपल्या परंपरा, धर्म, श्रद्धा, इतिहास यांवर तथाकथित बुद्धिवाद्यांकडून सतत होणाऱ्या टीकांवर ते आपल्या कीर्तनातून तर्कनिष्ठ समाचार घेत असत. मुंबईतील एका कीर्तनाला प्रख्यात नाटककार श्री. विद्याधर गोखले उपस्थित होते. पू. अप्पांनी पं. जगन्नाथाचे चरित्र आख्यान लावले होते. संस्कृत, मराठी, हिंदी, उर्दू अशा विविध भाषांमधून पं.जगन्नाथाचे चरित्र अप्पांच्या रसाळ वाणीतून ऐकल्यानंतर श्री. विद्याधर गोखले म्हणाले की, ‘‘हे कीर्तन मी पूर्वी ऐकले असते, तर माझे पंडित जगन्नाथ हे नाटक वेगळे झाले असते.’’

 . . १९४८ ते १९५० या काळात पुण्याच्या आयुर्वेद महाविद्यालयात आयुर्वेद पारंगतया पद्व्युत्तर अभ्यासक्रमासाठी अनंतरावांनी प्रवेश घेतला. त्यांचा संस्कृतचा अभ्यास दांडगा असल्याने  संस्कृतातील आयुर्वेद संहितेवर ते इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत.  ते आयुर्वेद पारंगतची  परीक्षा  विशेष गुणवत्तेसह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. . . १९५० साली अनंतराव त्याच महाविद्यालयात अध्यापक म्हणून सेवेत रुजू झाले. ते इ. . १९५५ मध्ये  आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि पुढे इ. . १९६१ साली प्राचार्य झाले. त्यांच्या कारकिर्दीतच आयुर्वेद महाविद्यालयाचे लोकमान्य टिळक आयुर्वेद महाविद्यालयअसे नामकरण झाले.

पू.अप्पांनी आयुर्वेद महाविद्यालयात अध्यापकपदापासून प्राचार्यपदापर्यंत पदे भूषवलीते राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे आजीव सदस्य होते. पुणे विद्यापीठ कार्यकारिणी सदस्यही होते. तसेच आयुर्वेद रसशाळा, पुणे येथे प्रमुख आणि ताराचंद रामनाथ रुग्णालयाचे अधीक्षक होते. पू.अप्पांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पाहता क्षणीच सर्वांवर पडत असे. महाराष्ट्रातील आयुर्वेद महाविद्यालयाचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटण्यासाठी दिल्लीला गेले. सर्व मंडळी टाय-सूट-बूट घालून हजर होती. श्री.अनंतराव मात्र स्वच्छ पांढरा सदरा, स्वच्छ पांढरे धोतर, तपकिरी काळा कोट व टोपी या आपल्या नेहमीच्याच भारतीय वेषात गेले. राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् त्यांच्या साध्या वेषाने प्रभावित झाले. प्राचार्य अनंतराव सर्वसामान्यांपासून ते अधिकारी वर्गापर्यंत सारखेच लोकप्रिय होते.

प्राचार्य अनंतरावांनी आयुर्वेद वाङमयामध्ये मोलाची भर घातली. त्यांचा निदान पंचक संप्राप्ति विज्ञान-व्याधिविनिश्चय- पूर्वार्धहा ग्रंथ सन १९६१ साली तर निदान पंचक संप्राप्ति विज्ञान-व्याधिविनिश्चय- उत्तरार्धहा ग्रंथ सन १९६२मध्ये प्रसिद्ध झाला. श्रीमत् आत्रेय प्रकाशन, पुणे या नव्या प्रकाशन संस्थेतर्फे कौमार भृत्यतंत्रया वैद्य श्रीमती निर्मलाताई राजवाडे, वैद्य श्री. शि. गो. जोशी आणि श्री. . दा. आठवले या तीन लेखकांनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन जुलै १९५९मध्ये झाले, तर १९६०साली याच प्रकाशन संस्थेतर्फे शल्य शालाक्य तंत्रया वैद्य श्री. शि. गो. जोशी, वैद्य श्रीमती निर्मलाताई राजवाडे आणि वैद्य श्री. . दा. आठवले या तीन लेखकांनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. अध्यापन काळात विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने पुस्तकांची अनुपलब्धता लक्षात घेऊन श्रीमत् वृद्ध वाग्भट विरचित अष्टांग संग्रहया संपूर्ण संस्कृत भाषेतील ग्रंथावरील पू.अप्पांनी लिहिलेला अष्टांग संग्रह इंदु टीकेसहितहा ग्रंथ  प्रसिद्ध झाला. आयुर्वेदाच्या आठ अंगांचा अभ्यास व आयुर्वेदाची सैद्धान्तिक दृष्टी आणि क्रियात्मक अनुभव यांसाठी देखील या ग्रंथाचा उपयोग होतो. याशिवाय आयुर्वेदासंबंधीचे अनेक लेख आयुर्विद्या या नियतकालिकामधून वेळोवेळी प्रकाशित झाले आहेत. आयुर्वेदासारख्या शास्त्रीय विषयावरील एवढ्या प्रचंड ग्रंथसंभाराचे लेखन पू.अप्पांनी वयाच्या केवळ चाळिशीत पूर्ण केले.

विलक्षण नियोजन कौशल्यामुळे श्रीदासगणू परंपरेबरोबरच पू.अप्पांचे आयुर्वेद कार्य समर्थपणे चालू होते. दासगणू परिवारातील संबंध टिकणे आणि दृढ करणे या उद्देशाने  मिरजेचे राजे पटवर्धन, इंदूरचे होळकर, औंधचे पंतप्रतिनिधी, सरदार पाटणकर, फलटणचे निंबाळकर या सर्व मंडळींशी त्यांचा संपर्क होता.  पंढरपूरचा श्री ज्ञानेश्वर पुण्यतिथीचा आणि श्रीदासगणू जयंतीचा उत्सव हे विशेषत्वाने साजरे होत असत.

पू.दादांच्या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले, तरीही पू.अप्पांची आयुर्वेदावरील निष्ठा तसूभरदेखील कमी झाली नाही.

गुरुवर्य मामा गोखले यांच्या निधनानंतर  पू.अप्पांनीही परंपरा रक्षणार्थ प्राचार्यपदाचा त्याग केला.  १९५८ ते १९६३ या पाच वर्षांच्या कालावधीत आयुर्वेदावर एक पुस्तक प्रतिवर्षी प्रकाशित करत. त्याचबरोबर  श्रीदासगणू महाराज समग्र वाङ्मयाच्या खंडांच्या प्रकाशनाचे कार्यही पूर्ण केले. सोबतच हिमालयाची यात्रा आणि प्रपंचाची जबाबदारी अशा विविध आघाड्यांवर ते लढत होते. दिनांक ३ जून १९६७रोजी पू.अप्पांनी राष्ट्रीय शिक्षण मंडळातील आजीव सेवकत्व आणि तदंगभूत प्राध्यापक चिकित्सक या सेवेचे देेखील त्यागपत्र दिले.

त्यांचे सर्वश्री पू.पांडुरंगशास्त्री आठवले, पू.रामचंद्र महाराज डोंगरे, पू.गोळवलकर गुरूजी, पू.किशोरजी व्यास, पू.धुंडामहाराज देगलुरकर, पू.सोनोपंत दांडेकर आदी मान्यवर मंडळींशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अंत:करणात देवभक्तीप्रमाणेच देशभक्तीदेखील प्रखर होती. त्यामुळेच त्यांनी युवा पिढीला जागृत करण्यासाठी राष्ट्र संरक्षण पोवाडा रचला व समाजाला सतत प्रेरित करण्याचे अविरत कार्य केले.

पू.अप्पांनी सन १९९१साली आपल्या परंपरेनुसार चतुर्थ आश्रमात प्रवेश केला. उत्तरकाशी येथे पू. स्वामी उमानंद गिरी यांच्या उपस्थितीत पू. स्वामी विद्यानंद गिरी यांच्याकडून संन्यासदीक्षा ग्रहण केली आणि आपले सद्गुरू संतकवी दासगणू महाराजांची संन्यास घेण्याची अपूर्ण राहिलेली इच्छा एक प्रकारे पूर्ण केली.

पू.अप्पा हे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या भावार्चनाया ग्रंथातील काव्यात त्यांना अनेक वेळा भगवद्दर्शन व भगवद्संभाषण झाल्याचे त्यांनी व्यक्त केलेले आपणास दिसते. ते साधकाचे सिद्ध झाले असे नसून आम्ही वैकुंठवासी । आलो याच कारणासी । बोलले जे ऋषी । साच यावे वर्तावया ॥ याप्रमाणे वैकुंठातून भगवद्कार्यासाठी ते प्रतिनियुक्तीवर आले होते. परंपरेनुसार, चारही आश्रमानुसार जीवन व्यतीत करून श्रावण वद्य त्रयोदशीला म्हणजे ५ सप्टेंबर, २००२ रोजी त्यांनी आपल्या जिवलग नारायणाचे चरणी मिठी देत देह ठेवला. पू.अप्पांनी उत्तरकाशी येथे आपल्या प्रिय भागिरथी मातेच्या साक्षीने समाधी घेतली.

त्यांच्यावरील  प्रकाशित संदर्भग्रंथ अशा प्रकारे आहेत- ‘संतकवी श्रीदासगणू महाराज: व्यक्ती आणि वाङ्मय’ (१९५५),‘तेजाचं चांदणं : प्राचार्य अ.दा.आठवले तथा पू.स्वामी वरदानंद भारती यांचे जीवन चरित्रलेखक समिती, श्री राधादामोदर प्रतिष्ठान, पुणे (२००७), ‘तेजोनिधी : .पू.अनंत दामोदर आठवले तथा स्वामी वरदानंद भारती यांचे संक्षिप्त चरित्र’, सौ.वसुधा महेश देशपांडे, श्रीदासगणू प्रतिष्ठान, गोरटे, ता. उमरी, जिल्हा नांदेड (जुलै २०१३),

स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्राचार्य अ. दा. आठवले) यांची प्रकाशित ग्रंथसंपदा अशा प्रकारे- ‘श्री शालिवाहन महाकाव्य १५ सर्ग’ (अपूर्ण), ‘उपनिषदर्थ कौमुदी १ ते ५ खंड’, ‘अनुवाद ज्ञानेश्वरी’, ‘मनोबोध’, ‘वाटा आपुल्या हिताच्या’, ‘महाभारताचे वास्तव दर्शन’,‘कमयोग’ (श्री गीता तिसरा अध्याय) ,‘आत्मसंयमन योग’ (श्री गीता सहावा अध्याय), ‘तत्त्वविज्ञान’ (श्री गीता तेरावा अध्याय), ‘पुरुषोत्तमयोग’ (श्री गीता पंधरावा अध्याय),‘जीवनसाधना’ (श्री गीता अठरावा अध्याय), ‘भगवान श्रीकृष्ण एक दर्शन’ (राजनीती), ‘श्रीकृष्ण कथामृत’ (महाकाव्य), ‘भावार्चना’, ‘श्रीरुक्मिणी स्वयंवर’ (कीर्तनोपयोगी आख्यान), ‘हिंदू धर्म समजून घ्या’, ‘विराण्या’, साधकाची चिंतनिका’ (चित्तप्रसाद व प्रात:स्मरण), ‘आत्मानुसंधान’ (योगतारावली-ओवीबद्ध-परापूजा गद्य), ‘श्रीविष्णुसहस्रनाम (सार्थ): (हिन्दी अनुवाद देखील प्रकाशित), ‘श्रीसद्गुरू षोडशोपचार पूजा’ (ओवीबद्ध), ‘राष्ट्र संरक्षण पोवाडा’, ‘संतकवी श्रीदासगणू महाराज: व्यक्ती आणि वाङ्मय’ (१९५५), श्री महाराजांच्या निर्वाणानंतर  हाच ग्रंथ श्रीदासगणू महाराज: चरित्र आणि काव्य विवेचनया नावाने पुन:प्रकाशित झाला (१९७४), ‘यक्षप्रश्न’, ‘पूर्वरंग तरंग’, ‘पूर्वराग तरंगिणी’, ‘संघ प्रार्थना’ श्रीरुक्मिणी स्वयंवर’ (ओवीबद्ध), कर्मविचार’, ‘साधकसाधना’, ‘कथा संस्कारांच्या-संस्कृतीच्या’, ‘श्री ब्रह्मसूत्रार्थ दर्शिनी’, ‘श्रीदाहीर राजा’ (कीर्तनोपयोगी आख्यान) ‘श्रीनारद भक्तिसूत्रार्थदर्शिनी’, ‘गंगालहरी’ (गंगातीर विहारिणी टीका), ‘दासगणू महाराज समग्र वाङ्मय’ (संपादित- १ ते १० खंड), ‘आयुर्वेदीय व्याधिविनिश्चय’, ‘अष्टांगसंग्रह’, ‘गीता प्रवेश’, ‘स्थितप्रज्ञायोग’ (श्रीगीता दुसरा अध्याय), ‘निर्वाणष्टकम्’, वाटा आपल्या हिताच्या (हिन्दी अनुवाद देखील प्रकाशित), ‘भगवान श्रीकृष्ण एक  दर्शन’ (इंग्रजी अनुवाद देखील प्रकाशित), ‘श्री. लोकमान्य टिळक चरित्र  (कीर्तनोपयोगी आख्यान), ‘मनुस्मृती’ (सार्थ-सभाष्य), ‘मनोबोध’ (मनाचे श्लोक भाष्य) याशिवाय अनेक प्रस्तावना, निबंध, लेख, अनुवाद, स्वतंत्र काव्य रचना, सुभाषिते, मंगलाष्टके, पाळणे, मकर-संक्रमण श्लोक, काव्य, स्फुट लेखन अशा अनेक  प्रकाशित लेखनासह प्रचंड अप्रकाशित वाङ्मय अशी त्यांच्या लेखनाची व्याप्ती आहे.

—  प्रा. नंदकुमार मेगदे

Add Your Comment

Amol Ratnakar … (not verified)

1 July 2020

Param pujya Dasganu maharaj mazya ajobanche guru hote. Mazya aai vadilanni Shree Anant Damodar yanchya baddal sangitle ani me Google search kele tar hi apratim lekhachi link milali. Ghari sarvanna vachun dakhavla. Sarv prasanna zale. Dhanyawad...

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].