Skip to main content
x

बाष्टे, रघुनाथ गणेश

शिल्पकार

            स्वातंत्र्यपूर्व काळात विदर्भात वास्तववादी व्यावसायिक व्यक्तिशिल्पे व स्मारक-शिल्पांची परंपरा सुरू करणारे शिल्पकार म्हणून रघुनाथ गणेश बाष्टे परिचित आहेत.

            बाष्टे घराणे मूळचे रत्नागिरीजवळच्या माखजनचे होते. वडील गणेश भाऊशेट बाष्टे यांचे दुकान होते. लहानपणापासूनच रघुनाथला मातीची चित्रे बनविण्याचा छंद होता व पुढेही तो कायम राहिला. आपल्या मुलाने दुकानाच्या कामात मदत करावी व हाच व्यवसाय पुढे चालवावा असे वडिलांना वाटत असे. साहजिकच या छंदाला घरातून प्रोत्साहन नव्हते; परंतु  विदर्भातील, अमरावती येथे चित्रकला शिक्षक असलेले रघुनाथचे मामा काशिनाथ गणेश खातू यांनी प्रोत्साहन दिले व आठवीनंतर ते आपल्या या भाच्याला पुढील शिक्षणासाठी अमरावतीस घेऊन गेले. नागपूर आर्ट सर्कलच्या प्रदर्शनात १९२९ मध्ये रघुनाथच्या शिल्पाला शालेय जीवनातच पारितोषिक मिळाले. त्यातून मॅट्रिकनंतर शिल्पकलेचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बाष्टे १९३० ते १९३५ या काळात मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकले व त्यांनी शिल्पकलेची पदविका प्राप्त केली. प्रसिद्ध शिल्पकार प्रभाकर पाणसरे हे त्यांचे सहाध्यायी होते.

            त्यानंतर ते कोल्हापूर येथे प्रभात फिल्म कंपनीत शिल्पकार म्हणून काम करू लागले. त्यांचा १९३६ मध्ये  त्यांचे मामा काशिनाथ गणेश खातू यांची कन्या कमलिनी हिच्याशी विवाह झाला. याच काळात त्यांचे काम गुजरातमधील राजपिपला संस्थानाचे जर्मन आर्किटेक्ट यांच्या नजरेस पडले व त्यांनी बाष्टे यांना आमंत्रित केले. १९३६ च्या अखेरीस बाष्टे राजपिपला येथे स्थलांतरित झाले. तेथील वास्तव्यात त्यांनी संस्थानासाठी अनेक व्यक्तिशिल्पे व सजावटीसाठी वास्तुशिल्पे तयार केली. त्यांत राजवाड्याच्या बागेतील शिल्पांसह उत्थित भित्तिशिल्पांचाही समावेश होता.

            याच दरम्यान दुसर्‍या महायुद्धाच्या झळा भारतापर्यंत पोहोचल्या व येथील ब्रिटिश सरकारने राजपिपला येथील जर्मन आर्किटेक्टला अटक करून तेथील काम बंद केले. महायुद्धामुळे सर्वच वस्तूंची टंचाई निर्माण होऊन महागाई वाढली व मंदी पसरली. गुजरातमधील त्या छोेट्याशा संस्थानात चरितार्थ चालविणे कठीण झाले, त्यामुळे १९३८ च्या सुरुवातीस बाष्टे विदर्भात आपले सासरे व मार्गदर्शक खातू यांच्याकडे आपल्या कुटुंबासह परतले.

            त्या काळात विदर्भातील शेतकरी व मालगुजार मंडळी जरी श्रीमंत असली व त्यांचा संगीत-नाट्यादी कलांना आश्रय असला, तरी चित्र-शिल्पकलेबाबतची परिस्थिती वेगळीच होती. चित्र-शिल्पांसाठी पैसे खर्च करणे त्यांना पटत नसे. त्यामुळे समृद्ध अशा विदर्भात जाऊनही त्यांना शिल्पकलेची कामे मिळेनात. अशा वेळी या तरुण शिल्पकाराने शेंदुर्जना या गावी झालेल्या वर्‍हाड प्रांतिक काँग्रेस अधिवेशनात लोकमान्य टिळक, जोतिबा फुले व दादासाहेब खापर्डे यांचे अर्धपुतळे तयार करून अधिवेशनाची शोभा वाढविली. ते पुतळे इतके उत्तम होते, की त्यांतील साधर्म्य अनुभवून शिल्पकाराची वाहवा होऊ लागली व बाष्टे यांना सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

            त्यातून हळूहळू त्यांच्याकडे कामे येऊ लागली. यातूनच त्यांना १९३८ मधील फैजपूर काँग्रेस अधिवेशनात सजावटीसाठी त्यांची शिल्पे देण्याची सूचना करण्यात आली. तेथे त्यांनी प्रदर्शित केलेले व हुबेहूब वाटणारे देशभक्त नेत्यांचे पुतळे बघून अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस, शरच्चंद्र बोस, कर्नाटक केसरी गंगाधरराव देशपांडे, डॉ. खरे, स्वामी सहजानंद यांनी प्रशंसोद्गार काढले व पुतळ्यांबद्दलचे कौतुक लेखी स्वरूपात केले. परंतु यामुळे थोडी फार कामे मिळाली तरी खर्च वजा जाता त्यातून फारशी अर्थप्राप्ती होत नसे. त्यामुळे विदर्भातील अनेक सिनेमागृहांत हा शिल्पकार आपल्या शिल्पांच्या स्लाइड्स दाखवून जाहिरात करू लागला. हळूहळू कामाचा ओघ वाढला व विदर्भातील विविध ठिकाणी त्यांची व्यक्तिशिल्पे स्थापित करण्यात आली. अकोला, अमरावती, एलिचपूर, धामणगाव, दर्यापूर, गोंदिया अशा अनेक ठिकाणी त्यांची शिल्पे लागली आहेत.

            बाष्टे यांना व्यक्तीचे साधर्म्य साधण्याचे कौशल्य उत्तम प्रकारे साधले होते; पण त्या काळात मुंबईत पूर्वीपासून ख्यातनाम झालेल्या व नव्याने प्रस्थापित होणाऱ्या शिल्पकारांच्या तुलनेत, दूर विदर्भातील अमरावतीत व्यवसाय करणाऱ्या या शिल्पकाराचा फारसा नावलौकिक झाला नाही. शिवाय त्या भागात कलेचे वातावरण नसल्यामुळे शैक्षणिक काळात मिळवलेले ज्ञान व दर्जा यांत ते पुढील काळात फारशी भर घालू शकले नाहीत. त्यांनी माती, प्लास्टर, ब्राँझ व पाषाण या सर्वच माध्यमांत शिल्पे घडविली असली तरी ब्राँझ व संगमरवरी पुतळ्यांत रूपांतर करण्यासाठी त्यांना मुंबईतील प्रस्थापित शिल्पकारांच्या स्टूडिओचाच आधार घ्यावा लागे. त्यामुळे विदर्भात बरीच कामे करूनही आर्थिकदृष्ट्या त्यांची परिस्थिती ओढग्रस्तीचीच राहिली.

            स्वातंत्र्योत्तर काळात तर निविदा मागविण्याच्या पद्धतीमुळे ते बाजूलाच पडले व अखेरीस १९७१ च्या दरम्यान साठाव्या वर्षी ते व्यवसायातून निवृत्त होऊन मुंबईजवळ डोंबिवलीस मुलाकडे परतले. महाराष्ट्र शासनाच्या वृद्ध व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलावंतांसाठी असणाऱ्या सेवानिवृत्तीवेतन योजनेतून त्यांना अखेरपर्यंत निवृत्तीवेतन मिळत असे.

            त्यांची पत्नी कमलिनी यांनी रेशमाच्या भरतकामात प्रावीण्य मिळवले होते. या उभयतांना विविध ठिकाणच्या औद्योगिक, तसेच प्रांतिक प्रदर्शनांमधून पारितोषिकेही मिळाली होती. स्वातंत्र्यपूर्वकाळात विदर्भात बाष्टे यांनी आपल्या हुबेहूब साधर्म्य दाखविणार्‍या व्यक्तिशिल्पांनी व्यावसायिक व्यक्तिशिल्पकलेच्या व्यवसायाला १९४० ते १९६५ या काळात चालना दिली व त्यातून विदर्भात हा व्यवसाय करण्यास अनेक शिल्पकारांनी सुरुवात केली.

 - सुहास बहुळकर

संदर्भ
‘मनोहर’; १९३९. २. प्रा. शास्त्री, संगम; ‘आपले रंगतरंग’; ३ मार्च १९९८. ३. शिल्पकार बाष्टे यांचे चिरंजीव प्रकाश बाष्टे यांची प्रत्यक्ष मुलाखत.
बाष्टे, रघुनाथ गणेश