Skip to main content
x

बहुळकर, सुहास वसंत

          महाराष्ट्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले सुहास बहुळकर चित्रकार, व्यक्ति-चित्रकार, अध्यापक, लेखक म्हणून विशेष परिचित आहेत. महाराष्ट्रातील भित्तिचित्रशैली व ब्रिटिश अकॅडमिक-वास्तववादी शैली या दोहोंचा वापर करून त्यांनी स्वतंत्र शैली विकसित केली. याशिवाय अनेक सहकाऱ्यांच्या साथीने कला व लेखनविषयक प्रकल्पही त्यांनी यशस्विरीत्या पूर्णत्वास नेले आहेत.

          सुहास वसंत बहुळकर यांचा जन्म पुणे येथे झाला. स्वत: चित्रकार बनण्याचे स्वप्न प्रत्यक्षात न आलेले वडील वसंत बहुळकर हे कारखान्यात टर्नरचे काम करीत. आई सुशीला हॅण्डमेड कागदाच्या कारखान्यात काम करत. सुहास यांना चित्रकलेची बालपणापासून आवड आहे हे लक्षात आल्यावर आई-वडिलांनी त्यांस प्रोत्साहन दिले. त्यामुळे शालेय वयातच त्यांची चित्रप्रदर्शने झाली व बालचित्रकार म्हणून त्यांस प्रसिद्धी मिळाली. ‘शंकर्स वीकली’,  ‘रॉयल ड्रॉइंग सोसायटी’सारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक चित्रकला स्पर्धांतून त्यांनी बक्षिसे मिळवली. शालेय शिक्षण पुण्याच्या पेरुगेट भावे स्कूलमधून झाल्यानंतर सुहास बहुळकर मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये १९७० मध्ये दाखल झाले. १९७५ मध्ये त्यांंनी फाइन आर्टची पदविका प्रथम वर्गात प्राप्त केली व फेलोशिपचा बहुमान मिळवला. शैक्षणिक कालखंडात चरितार्थाकरिता म्हणून त्यांनी जाहिरातफलक रंगविले, व्यावसायिक व्यक्तिचित्रणे केली व घरोघरी दर महिन्याला वेगळी चित्रे देणाऱ्या फिरत्या चित्र लायब्ररीसारख्या संकल्पना राबवल्या. जे.जे. मध्ये अध्यापक म्हणून १९७५ ते १९९५ या कालखंडात ते कार्यरत होते. वीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर १९९५ मध्ये त्यांनी पूर्णवेळ पेंटिंगकरिता देता यावा म्हणून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. या दरम्यान १९८४ मध्ये त्यांचा विवाह साधना खडपेकर यांच्याशी झाला. त्या चित्रकला व चित्रकार यांच्याबद्दल लेखन करतात. त्या चित्रकला शिक्षिका होत्या.

          सुहास बहुळकर हे एक कुशल व्यक्तिचित्रकार आहेत. अनेक चित्र-शिल्पकारांच्या आणि अभ्यासू कलावंतांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होत गेले. त्यांचा मानवी आकृतीचा सखोल अभ्यास, व्यक्तिचित्रणातील तंत्र-कौशल्य आणि प्रयोगशीलता यातून त्यांनी व्यक्तिचित्रणात स्वत:ची शैली प्रस्थापित केली आहे. चित्रकलेच्या अन्य माध्यमांसोबतच तैलरंग आणि अ‍ॅक्रिलिक रंग या दोन्ही माध्यमांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १९७९ च्या प्रदर्शनातील सर्वोत्तम कलाकृतीचे पारितोषिक मिळालेले वृद्ध महिलेचे चित्र या दृष्टीने पाहता येईल. अॅक्रिलिक माध्यमातील रंगलेपनात लहान लहान ब्रशच्या फटकाऱ्यांनी  , छाया-प्रकाशाच्या विविध रंगांच्या छटांच्या रचनेमधून ते चित्र घडवतात.

          सुहास बहुळकरांनी अनेक व्यावसायिक व्यक्तिचित्रे केलेली आहेत व ती राष्ट्रपती भवन, संसद भवन, अनेक स्मारके, तसेच विविध संस्था व उद्योगसमूहांच्या संग्रहांत आहेत. लोकमान्य टिळक, विनोबा भावे, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, जे.आर.डी.टाटा अशा व्यक्तींची चित्रे करताना त्यांची जनमानसात रूढ झालेली प्रतिमा सांभाळावी लागते, तसेच व्यक्तीच्या कार्याचे सूचन, स्वभाव इत्यादीही व्यक्त करावे लागतात. चित्रनिर्मितीपूर्वी सुहास बहुळकर याचा अभ्यास करून चित्रे साकारतात. राष्ट्रपती भवनात असलेल्या लोकमान्य टिळकांच्या व गागोदे या गावी असलेल्या विनोबा भावे यांच्या व्यक्तिचित्रांचा या संदर्भात उल्लेख करावा लागेल.

          गेली काही वर्षे सुहास बहुळकर आपली अभिव्यक्ती काहीशा स्मरणरंजनात्मक कथनशैलीच्या रूपाचा आधार घेऊन करत आहेत. ‘आकार संस्कृती’ (१९९२) या प्रदर्शनातील चित्रमालिकेतून त्यांनी प्रथमच या शैलीतील चित्रे प्रदर्शित केली. विस्मृतीत जाऊ पाहणार्‍या साठवणींचा तो एक प्रतीकात्मक आविष्कार होता.

          एकोणिसाव्या शतकातील पेशवेकालीन वाड्यांचा होणारा ऱ्हास व त्यावरील आधुनिक जीवनपद्धतीचे सावट यांसोबतच तत्कालीन वेशभूषेतील स्त्री-पुरुषांची, कुटुंबाची ‘सेपिया’ रंगातील जुन्या छायाचित्रांसारख्या दिसणार्‍या चित्रप्रतिमांमधून ही चित्रे साकारली होती. जुन्या वाड्यातील भिंतीवरील पुराणातील प्रसंगांची, देवदेवतांची पुसट होत गेलेली भित्तिचित्रे, आलंकारिक खांब, वाड्याच्या कमानीदार खिडक्या, गेरूच्या लालसर रंगावर पांढर्‍या रंगाचे गुलदस्ते अशा घटकांसोबत या चित्रांतून गजांना लावलेला निळा चमकदार एनॅमल रंग, संगणकांच्या जाहिरातींचे फलक, वाळत घातलेले आधुनिक कपडे, वाड्याच्या जवळच उभी असलेली गाई, गुरे अशा संस्कृतिसंकराचे बहुळकरांनी चित्रण केले. बदलत जाणारे हे वास्तव आणि ते पाहून येणारी अस्वस्थता या सोबतच स्मरणरंजनाचा खेळ विविध प्रतिमांमधून मांडण्याचा प्रयत्न यात होता.

          ब्रिटिश अकॅडमिक पद्धतीतील व्यक्तिचित्रण, भित्तिचित्रांतील भारतीय शैलीतील रेषाप्रधान चित्रण, अलंकरणातले तपशील, निसर्गचित्रातील वातावरण या सर्वांचा कौशल्याने उपयोग करून बहुळकरांनी चित्राची रचना केली आहे. कालगती, नियती आणि वास्तवापलीकडची शाश्‍वतता व्यक्त करणारी  चित्रमालिका  ‘आकार संस्कृती’, ‘देवाचे पाऊलठसे’, ‘परिवर्तन व नियती’ अशा शीर्षकाने देशापरदेशांत झालेल्या प्रदर्शनांतून १९९२ ते २००६ या काळात प्रदर्शित झाली.

          कलावंताची सामाजिक जीवनात काही ठोस भूमिका असावी, असे मानणाऱ्या बहुळकरांनी विविध सहकाऱ्यांच्या मदतीने काही प्रकल्पही केले आहेत. याची सुरुवात गणपती उत्सवातील सजावट किंवा प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या दिल्लीतील सोहळ्यासाठी केलेल्या चित्ररथांपासून झाली. त्यांनी १९८१ ते १९९० या काळात महाराष्ट्र राज्य, माझगाव डॉक व अणुशक्ती विभागासाठी चित्ररथ तयार केले. यांत संकल्पना, संरचना ते सादरीकरणापर्यंतची जबाबदारी बहुळकरांनी यशस्वीरीत्या पेलली. त्यांतील १९८१ व १९८३ मधील चित्ररथ सुवर्णचषकाचे मानकरी ठरले. याशिवाय लोकमान्य टिळक म्युझियम, पुणे; क्रांतिकारक चाफेकर स्मारक, चिंचवड; स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्यासाठी केलेले भव्य भित्तिचित्र व तेथील प्रत्यक्षात न आलेल्या राष्ट्रीय क्रांतिकारक संग्रहालयाची अंतिम कल्पना व मांडणीचे स्वरूप यांचा त्यांत समावेश आहे.

          या सर्वांत महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे चित्रकूट येथे साकारलेला, रामायणाचा नैतिक संदेश देणारा ‘रामदर्शन’ हा प्रकल्प! ‘रामदर्शन’ या प्रकल्पावर ते १९९५ ते २००१ अशी तब्बल साडेपाच वर्षे आपल्या सहकाऱ्यांसह काम करत होते. यात डायोरामा, उठावशिल्पे, भित्तिचित्रे, सिरॅमिक म्युरल अशा विविध कलारूपांचा वापर करून रामायणातील निवडक प्रसंग  प्रदर्शित केले आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व देशातील मागासलेल्या भागात उभारला गेला. विशेष म्हणजे या प्रकल्पाचा उद्देश रामाचे देऊळ बांधण्याचा नसून रामायणातील नैतिक संदेश सामान्यजनांपर्यंत पोहोचवण्याचा होता. अशा प्रकल्पात ते त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांची नोंद आवर्जून करतात. याशिवाय बहुळकरांनी राजा केळकर म्युझियममधील मस्तानी महालातील, तसेच मुंबईच्या नेहरू सेंटरमधील ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या कायमस्वरूपी प्रदर्शनातील भित्तिचित्रांचे काम केले आहे.

          सुहास बहुळकर जे.जे.त शिकवत असताना, १९७६ ते १९९३ या काळात ते सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या चित्रसंग्रहाची निवड, जतन व संवर्धन या संदर्भात स्वेच्छेने कार्यरत होते. नेहमीचे कलाशिक्षणाचे काम सांभाळून उर्वरित वेळात व सुट्टीच्या दिवशी ते हे काम करीत. यामागे कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांची प्रेरणा होती व प्रा. मृगांक जोशी आणि प्रा. श्रीकांत जाधव यांचे सहकार्य होते. या प्रयत्नातून १८८५ ते १९९५ अशी एकशेदहा वर्षांची बॉम्बे स्कूलची जे.जे.च्या कपाटांत बंदिस्त असलेली कलापरंपरा काही प्रमाणात महाराष्ट्रात व देशात प्रदर्शित झाली.

          बहुळकरांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर या कलासंग्रहाकडे दुर्लक्ष झाले. बहुळकरांनी हा कलासंग्रह समाजापुढे यावा म्हणून शासनाशी पत्रव्यवहार करून, वृत्तपत्रात लेख लिहून सतत पाठपुरावा केला. त्यातून बहुळकरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली व हा संग्रह खाजगी आयोजकतेतून जे.जे.मधील अधिष्ठात्यांच्या बंगल्यात कायमस्वरूपी प्रदर्शित करण्याचा करारही करण्यात आला. बहुळकरांनी जे.जे.तील प्रा. श्रीकांत जाधव, तसेच समितीतील इतर सदस्यांच्या मदतीने हे काम नेटाने पूर्ण केले. त्यामुळेच मार्च २००८ मध्ये जे.जे. स्कूलच्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या कलासंग्रहाचे प्रदर्शन होऊ शकले व गाजले. पण आजही हा कलासंग्रह कायमस्वरूपी प्रदर्शित होऊ शकलेला नाही.

          सुहास बहुळकरांचे एक महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी जहांगीर आर्ट गॅलरीच्या निधी संकलनासाठी केलेली ‘मास्टर स्ट्रोक्स’  ही प्रदर्शनमालिका. यात २००२ ते २०१० या काळात आठ प्रदर्शने झाली त्यांत बॉम्बे स्कूलच्या एके काळी गाजलेल्या, परंतु आज विस्मरणात गेलेल्या कलावंतांच्या कलाकृती प्रदर्शित केल्या गेल्या. या प्रयत्नातून बॉम्बे स्कूलच्या सतरा कलावंतांच्या आजच्या कलाजगताला अज्ञात असलेल्या कलाकृती प्रकाशात आणल्या गेल्या.

          सुहास बहुळकरांनी चित्रकलाविषयक विपुल लेखन केले आहे. विशेषत: त्यांचे मुंबईच्या चित्रकला क्षेत्रातील भारतीयत्व जपणारे बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल व बॉम्बे स्कूल यांविषयी इतिहासात्मक व अभ्यासपूर्ण लेखन महत्त्वाचे आहे.

          सुहास बहुळकर हे कला क्षेत्रातील अनेक घटनांचे साक्षीदार आहेत. बाबूराव सडवेलकर व संभाजी कदमांसारख्या चित्रकार आणि अभ्यासू कलावंतांचा सहवास त्यांना लाभला. त्यामुळे चित्रकला क्षेत्रातील अनेक निरीक्षणे व तपशिलांची नोंद त्यांनी विचक्षण दृष्टीने केली आहे.

          भारतातील रंग बनविणाऱ्या ‘कॅमल’ कंपनीतर्फे ‘कॅम्लिन फाउण्डेशन’ स्थापन करण्यात आले. या फाउंडेशन तर्फे अखिल भारतीय स्तरावर चार विभागीय प्रदर्शने १९९८ पासून भरवली जातात. त्यांतील निवडक पारितोषिक विजेत्या चित्रकार व विद्यार्थ्यांना युरोपमधील कलासंग्रह अभ्यासण्यासाठी पाठविले जाते. ही संपूर्ण योजना सुहास बहुळकर यांनी तयार केली असून २००७ पर्यंत ते ‘युरोटूर’ या निवड समितीचे कार्याध्यक्ष म्हणून ते काम करीत होते.

          सुहास बहुळकरांची १९६६ पासून ते २००६ पर्यंत जवळपास चौदा एकल प्रदर्शने झाली असून देश-परदेशांत चाळीसच्या वर समूह प्रदर्शनांमधून त्यांनी सहभाग घेतला आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १९७९च्या प्रदर्शनात सर्वोत्तम कलाकृतीसाठी रौप्यपदक व १९८९ च्या शतक महोत्सवी प्रदर्शनातील त्यांच्या चित्राला सर्वोत्तम कलाकृतीचे पारितोषिक मिळाले. महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनात त्यांना १९८२ व १९८४ मध्ये पारितोषिके मिळाली आहेत. त्यांना १९८६-८७ च्या प्रदर्शनात उत्तम व्यक्तिचित्रणाचे पारितोषिक लाभले होते. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या (१९७६-७७-७९-८९-९३) या प्रदर्शनांतूनही त्यांना पारितोषिके मिळाली असून २०११ मध्ये आर्ट सोसायटी ऑफ इंडियाने कलाकारकिर्दीतील योगदानाबद्दल त्यांचा सत्कार केला.

— माधव इमारते

बहुळकर, सुहास वसंत