Skip to main content
x

भाटे, शमा सनतकुमार

मा सनतकुमार भाटे यांचा जन्म बेळगाव (कर्नाटक) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आबाजी नाईक व आईचे नाव गुलाब होते. पुण्यातील शनिवार पेठेतील मुलींच्या अहिल्यादेवी हायस्कूल या शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून रसायनशास्त्र या विषयात बी.एस्सी. ही पदवी संपादन केली. मात्र, हे सर्व करत असतानाच शालेय पातळीवर विविध खेळांमध्ये भाग घेणे व त्यांच्या गुरू पं.रोहिणी भाटे यांच्याकडे कथक नृत्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेणे सुरू होते. बी.एस्सी. झाल्यानंतर मात्र त्या काळी अत्यंत अप्रचलित असलेल्या नृत्याच्या क्षेत्रातच कार्य करण्याचे त्यांनी निश्चित केले व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मिरज येथील ‘नृत्य अलंकार’ ही पदवी त्यांनी संपादन केली.

या सर्व औपचारिक शिक्षणाच्या बरोबरीने शमा भाटे यांनी त्यांच्या गुरू पं.रोहिणी भाटे यांच्याकडे प्रदीर्घ काळ कथक नृत्याची तालीम घेतली. रोहिणी भाटे यांच्या ‘नृत्यभारती’ या संस्थेमध्ये शिकत असताना त्यांच्या दोन्ही गुरूंकडून : पं.मोहनराव कल्याणपूरकर व पं.लच्छू महाराजजी यांच्याकडून प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कथक नृत्यातील बारकावे शिकण्याचे भाग्य शमा भाटे यांना लाभले. याच काळात आपल्या गुरूंच्या अनेक नृत्यसंरचनांमधून भाग घेत त्यांनी एकल, युगल (आपल्या गुरुभगिनी प्रणती प्रताप यांच्या समवेत) व समूह नृत्यप्रस्तुतींसाठी दौरे केले. १९८५ पर्यंत त्या ‘नृत्यभारती’मध्येच नृत्याच्या शिक्षिका म्हणूनही कार्यरत होत्या.

ताल व लयीचा सखोल अभ्यास करण्याच्या हेतूने शमा भाटे यांनी तालयोगी पं.सुरेश तळवलकर यांचे शिष्यत्व स्वीकारले. पाच वर्षे सुरेशजींच्या मार्गदर्शनाखाली लय-तालाचा अत्यंत सखोल अभ्यास शमाताईंनी केला. याशिवाय त्यांनी गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे गायनाचे शिक्षणही घेतले.

या सर्व तालमींची परिणती म्हणून त्यांनी स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण शैली निर्माण केली . कथक हे अनिवार्यत: दृक्-श्राव्य माध्यम आहे हा विचार त्यांनी आपल्या शैलीतून रुजवला आणि त्यामुळेच कथकमधील परंपरागत सौंदर्य व लालित्याच्या बरोबरीने लयकारीतील अचूकता व छंदांतील श्राव्यविविधता त्यांच्या नृत्यशैलीची वैशिष्ट्ये होत. तबल्याच्या परंपरेत प्रचलित असलेल्या ‘धाकिड्तक धुमकिड्तक धेत्ता किड्धेत्ता’, ‘धाकिट धिन् ताकिट धिन् ता’ आदी बंदिशी, तबल्याच्याच फरूखाबादी बंदिशी, विविध तालांतील नवनवीन छंद, अनेक प्रकारचे अवघड व अप्रचलित दम असलेल्या तिहाई / बंदिशी त्यांनी कथकच्या परंपरेत आणल्या. त्याचबरोबर ‘भस्मासुर-मोहिनी’, ‘रेणुका-गौतम’, ‘समुद्रमंथन’ अशा अनवट कथांवर रचलेले गतभाव, पंचजाती तीनताल हे त्यांचे कथकच्या क्षेत्राला योगदान म्हणता येईल.

त्या कथक नृत्यातील अग्रगण्य नृत्यसंरचनाकार म्हणून ओळखल्या जातात. पारंपरिक ते आधुनिक अशा बहुविध विषयांवरील त्यांच्या अनेक नृत्यसंरचनांपैकी काही  : ‘पर्स्पेक्टिव्ह’ (उ. शाहिद परवेझ यांच्या सतारीवर आधारित), ‘दुर्गाम् त्रिनेत्राम् भजे’ (देवी दुर्गेची विविध रूपे), ‘एन्काउण्टर’ (जॉन मॅक्लॉलिन यांच्या जॅझ संगीतावर आधारित), ‘कृष्णगान’, ‘रिदम कोलाज’ (ऑस्ट्रियन जॅझ बॅण्ड अक्कूबरोबर), ‘फ्रेंच पोएम्स’ (चार्ल्स बोदलेर या फ्रेंच कवीच्या कवितांवर आधारित), ‘नाद-बिंदू’ (सैयद हैदर रझा यांच्या चित्रांवर आधारित), ‘नि:शब्द भेद’ (‘ल मोन्द द्यू सीलाँस’ या समुद्री जीवनावरील माहितीपटावर आधारित), ‘पीड पराई जाणे रे’ (कस्तुरबा गांधींच्या जीवनावर आधारित), ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ (स्त्री-भ्रूणहत्या) इ. १९९३ साली त्यांनी ‘नाद-रूप’ ही नृत्य व संगीताचे शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. गेल्या २५ वर्षांत या संस्थेने अनेक व्यावसायिक नर्तिका कथक नृत्याच्या क्षेत्राला दिल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून शमा भाटे यांनी अनेक नामांकित नर्तकांना कार्यक्रम, कार्यशाळा, व्याख्यानांच्या निमित्ताने पुण्यात आमंत्रित केले, तसेच अनेक प्रख्यात गायक-वादक कलाकारांनाही आमंत्रित केले.

सवाई गंधर्व संगीत महोत्सवातील व्यासपीठावर त्यांनी आपली कला सादर केली . आज त्या ‘नाद-रूप’च्या संस्थापिका-संचालिका म्हणून कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त ललित कला केंद्र (पुणे विद्यापीठ), कला अकादमी (गोवा), कथक केंद्र (दिल्ली) यांच्या सल्लागार समित्यांतही त्या कार्यरत आहेत. ललित कला केंद्राच्या त्या मानद गुरू आहेत, तसेच नालंदा डान्स रिसर्च सेंटर (मुंबई) व कला अकादमी (गोवा) येथे त्या अध्यागत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त कार्यक्रम-कार्यशाळा इ.च्या निमित्ताने भारतभर, तसेच इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रिया, मलेशिया, सिंगापूर इ. देशांत त्यांचे दौरे झाले आहेत. मतिमंद व स्पॅस्टिक मुलांसाठी नृत्याद्वारे उपचार यांसारख्या कार्यशाळांद्वारे त्यांचे कार्य विस्तारताना दिसते. त्यांच्या या कार्याची दखल घेत २०११ साली  महाराष्ट्र राज्य सरकारच्या संस्कृती विभागाचा पुरस्कार ,२०१२ साली कृष्णा मुलगुर स्मृती प्रतिष्ठानच्या तर्फे कला संवर्धन पुरस्कार,२०१३ साली कलानिधी संस्थेतर्फे कला गौरव पुरस्कार , २०१८ मध्ये पुणे महानगरपालिकेतर्फे रोहिणी भाटे पुरस्कार तसेच वाय.यु.व्ही.ए पुरस्कार ,नेहरू युवा केंद्र पुरस्कार आणि २०१९ साली श्री कुंदनलाल गंगाणी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत.

        — शिल्पा भिडे    

भाटे, शमा सनतकुमार