Skip to main content
x

भोळे, ज्योत्स्ना केशव

ज्योत्स्ना केशव भोळे या पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर होत. त्यांचा जन्म गोव्यातल्या बांदिवडे या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव वामन केळेकर होते. एकूण चौदा भावंडांपैकी त्या एक होत्या. त्यांना गाण्याचे उपजतच अंग आणि फार वेड होते.

वयाच्या आठव्या वर्षी पहिल्या दोन इयत्ता बांदिवड्याच्या शाळेत पूर्ण करून दुर्गा आपल्या थोरल्या गायिका भगिनी गिरिजाबाई यांच्यासह मुंबईत वास्तव्यास आल्या. संगीत शिक्षणासाठी मुंबईस येणे भागच होते. त्या लॅमिंग्टन रोडवर राहत असत व तिथल्याच महानगरपालिकेच्या शाळेत त्यांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतले. संगीत हेच मुख्य ध्येय असल्याने त्यांनी शाळा सोडली.

गिरिजाबाई आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गवई खाँसाहेब विलायत हुसेन यांच्याकडे तालीम घेत असत. ज्योत्स्नाबाईही आग्रा घराण्याचे खादिम हुसेन खाँ यांची तालीम घेऊ लागल्या. मुंबईत शालेय, आंतरशालेय गायनस्पर्धांमध्ये नेहमीच पहिला नंबर पटकावून त्यांचे बरेच नाव झाले होते. ‘बॉम्बे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ या आकाशवाणीवर ज्योत्स्नाबाई महिन्यातून तीन-चार वेळा गात असत. बालगायिका म्हणून त्या खूपच प्रसिद्ध झाल्या. तेराव्या-चौदाव्या वर्षापर्यंत त्या रागदारी संगीतातही उत्तमपणे पारंगत झाल्या.

याच सुमारास महाराष्ट्रात, खास करून मुंबईत काव्यगायन, त्यातूनच निर्माण होऊ पाहणारे ‘भावगीत’ हा गानप्रकार मूळ धरू लागला होता. केशवराव भोळे हे यात अग्रेसर असून, भावगीत गायक म्हणून संगीत शौकिनांमध्ये चांगलेच प्रसिद्ध व लोकप्रिय होते. त्यांच्या नाट्यपदांनी त्यांनी अगोदरच नाव मिळविले होते. केशव ‘एकलव्य’ या टोपणनावाने संगीतावर समीक्षापर लेखनही करीत होते. त्यामुळे याही क्षेत्रात त्यांच्या नावाची खूप चर्चा होती. ज्योत्स्नाबाईंचा भाऊ रामराय हा केशवराव भोळ्यांचा मित्र व चहाता होता. त्याने केशवराव भोळ्यांना आपल्या बहिणीला भावगीत शिकवण्याची विनंती केली. या वेगळ्याच, नवीन व सुंदर गानप्रकाराचे ज्योत्स्नाबाईंना वेडच लागले. मनापासून, लक्षपूर्वक शिकून घेऊन त्यांनी ‘भावगीत’ आत्मसात केले. गाण्यातले भावनेचे महत्त्व त्यांना जाणीवपूर्वक असे प्रथमच या वेळी कळले. तोवरचे त्यांचे गायन हे नकळतपणे स्वाभाविक भावनेने होत असे. लवकरच ज्योत्स्नाबाई भावगीत गायिका म्हणूनही अतिशय लोकप्रिय झाल्या.

केशवराव भोळ्यांशी १९३२ साली त्यांचा विवाह झाला. केशव भोळे यांचे संगीत असलेल्या ‘कृष्ण सिनेटोन’ या कंपनीच्या ‘संत सखू’ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. ज्योत्स्नाबाई यात सखूची भूमिका करीत होत्या. त्या वेळी त्यांचे नाव दुर्गा भोळे असेच होते; पण सिनेमात आणखी एक दुर्गा शिरोडकर नावाच्या नटी काम करीत होत्या. या दोन दुर्गांमुळे जरा गोंधळ होऊ लागल्याने लहान दुर्गाचे ‘ज्योत्स्ना’ असे नामकरण झाले व त्या ज्योत्स्ना भोळे झाल्या.

केशवराव भोळ्यांचेे, ज्योत्स्नाबाईंच्या सांगीतिक आयुष्यातलेही स्थान आत्यंतिक महत्त्वाचे होते. विवाहानंतर त्यांचे कलागुण अधिकच बहरू लागले. विवाहसमयी त्या जेमतेम अठरा वर्षांच्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांतच प्रो.बा.र.देवधर यांच्या म्युझिक सर्कलमध्ये मैफल करून ज्योत्स्नाबाईंनी देवधर मास्तर व जाणकार श्रोत्यांची दाद मिळवली. 

केशवराव भोळे यांचा मंजी खाँ, रामकृष्णबुवा वझे, मल्लिकार्जुन मन्सूर, मास्तर कृष्णराव इ. अनेक गवयांशी स्नेह होता. त्यांनी अनेक बंदिशींचा संग्रह केला. वेगवेगळ्या घराण्यांच्या रंगांमुळे ज्योत्स्नाबाईंच्या गायकीचे एक स्वतंत्र, प्रभावी असे रसायन तयार झाले. पक्का सूर, लय-तालावरची पकड, तडफ, लालित्य आणि माधुर्य या गुणांनी युक्त असे त्यांचे गायन श्रोत्यांना खिळवून ठेवी.

बशीर खाँ, घम्मन खाँ (ठुमरीची तालीम) या उस्तादांकडेही त्यांनी थोडी तालीम घेतली. बरीच वर्षे त्या ‘तानरस खाँ’ घराण्याचे खाँसाहेब इनायत हुसेन यांच्याकडे शिक्षण घेत होत्या. त्यांनी अनेक गुरूंकडे  डोळसपणे तालीम घेतली.

गोरख कल्याण, भीम, मधमाद सारंग, शुद्ध भटियार, शामकल्याण, जलधर-केदार इ. काही राग खास ज्योत्स्नाबाईंचे म्हणून लोकप्रिय झाले. भेंडीबाजार घराण्याचे मोहंमद हुसेन खाँ (सारंगिये कादरबक्ष यांचे चिरंजीव) यांनी बांधलेला ‘शिवकंस’ हा रागही ज्योत्स्नाबाईंनी गाऊन लोकप्रिय केला.

ज्योत्स्नाबाईंनी देशभरातल्या महत्त्वाच्या संगीत सभांमधून अनेक वर्षे गायन केले. असरदार गायन, तसेच आवाजावरची हुकमत, उत्तम दमसास, सूक्ष्म सांगीतिक जाण, रंगतदार आलापी, प्रभावी तानक्रिया,  शास्त्र आणि भाव यांचा सहजसुंदर मेळ आणि सुधमुद्रा-सुधबानी म्हणजेच ज्योत्स्नाबाई.

लग्नानंतर वर्षभरातच, म्हणजे १९३३ मध्ये ज्योत्स्नाबाईंना नाटकात काम करण्याचा योग आला. ‘आंधळ्यांची शाळा’ हे ते नाटक. लेखक वर्तक, के.नारायण काळे, पार्श्वनाथ आळतेकर, केशवराव दाते, केशवराव भोळे या नवमतवादी मंडळींनी ‘नाट्य मन्वंतर’ ही संस्था स्थापन केली. रंगभूमीवर स्त्रियांनीच स्त्रियांची कामे करावीत या आग्रहाने ज्योत्स्नाबाई व वर्तकांची पत्नी रंगभूमीवर उभ्या राहिल्या. यापूर्वीही हिराबाई बडोदेकर व त्यांच्या भगिनींनी नाटकमंडळी काढून रंगभूमीवर कामे केली होती. पण ‘आंधळ्यांची शाळा’ हे सर्वार्थाने आधुनिक नाटक तर होतेच; पण यात संगीत म्हणजे अनंत काणेकरांची भावगीते घेतली होती व ती फार परिणामकारक, प्रसंगोचित होती. त्यामध्ये पार्श्वसंगीताचा वापरही प्रथमच केला होता. केशवराव भोळेच याचे संगीतकार होते.

ज्योत्स्नाबाईंचे हे प्रथम पदार्पण त्यांच्या ठायी असलेल्या रूप, संगीत व अभिनय या त्रिवेणी संगमामुळे ऐतिहासिक महत्त्वाचे ठरले. पुढे १९४१ साली ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेत प्रवेश केल्यावर संगीत अभिनेत्री म्हणून त्या चांगल्याच प्रस्थापित झाल्या. त्यांनी या संस्थेत एकूण अकरा नाटकांतून प्रमुख भूमिका केल्या, पैकी ‘संगीत कुलवधू’ने त्यांना अजरामर कीर्ती दिली. मास्तर कृष्णरावांचे संगीत या नाटकाचे महत्त्वाचे यश होते.

ज्योत्स्नाबाईंचे अभिनयमंडित गायन, तेही संयम ठेवून नेटके व वेधक असे. हा बदल घडवून आणण्याचे मोठे श्रेय ज्योत्स्नाबाईंना, लेखक-दिग्दर्शक मो.ग.रांगणेकरांना, तसेच मास्तर केशव, श्रीधर पार्सेकर, स्नेहल भाटकर इ. संगीतकारांनाही जाते. ज्योत्स्नाबाईंच्या अत्यंत लोकप्रिय नाट्यपदांमध्ये, ‘कुलवधू’तील सर्व पदे, ‘क्षण आला भाग्याचा’, ‘मन रमणा मधुसूदना’, ‘बोला अमृत बोला’; ‘एक होता म्हातारा’मधील ‘छंद तुझा मजला’, ‘ये झणी येरे माघारी’; ‘कोणे एके काळी’मधील ‘का रे ऐसी माया’ ही भैरवी; ‘राधामाई’ या नाटकातले ‘खेळेल का देव माझिया अंगणी’; ‘भूमिकन्या सीता’मधील ‘मी पुन्हा वनांतरी फिरेन’, ‘मानसी राजहंस पोहतो’ इ. वानगीदाखल सांगता येतील. ‘कुलवधू’तील ‘बोला अमृत बोला’ने लोकांच्या अंत:करणाचा ठाव घेतला.

ज्योत्स्नाबाईंना उत्कृष्ट भावगीत गायिकेचाही मान मिळाला. आकाशवाणीवरही त्यांच्या भावगीतांना वाढती मागणी येऊन अधिक प्रसार झाला. त्या बहुतांशी राजा बढे, अनंत काणेकर, कवी अनिल, मो.ग.रांगणेकर अशा कवी-गीतकारांच्या रचना गात असत. त्यांच्या लोकप्रिय भावगीतांमध्ये राजा बढे यांची ‘माहेर’विषयीची तीन गीते, यांतील ‘माझिया माहेरा जा’ हे पुलंनी चाल दिलेले फारच लोकप्रिय झाले. अनंत काणेकरांचे ‘किती गोड गोड वदला’ व ‘आला खुशीत समींदर’; मो.ग.रांगणेकरांचे ‘नको वळून बघू माघारी’ इ.च्या ‘यंग इंडिया’, ‘कोलंबिया’, ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ अशा कंपन्यांनी ध्वनिमुद्रिकाही काढल्या.

ज्योत्स्नाबाईंच्या भावगीतांत विस्तार-शक्यता असूनही त्या खूप तारतम्याने, जडपणा आणू न देता, चालीच्या अंगाने आकर्षकपणे गायल्या याची प्रचिती त्यांची कोणतीही ध्वनिमुद्रिका ऐकताना येते. खानदानी गाण्याच्या तालमीमुळे आवाजाला जी झिलई व तेज लाभले, त्याचा त्यांनी नाट्यपदे व भावगीते यांत वेगळा आणि खुबीने वापर केला. त्यांनी गीतांचा व नाट्यगीतांचाही दर्जा जो प्रथमच उंच करून ठेवला, याचे महत्त्व फार मोठे आहे. ती त्यांची या क्षेत्राला देणगी आहे. कारण त्यामुळेच श्रोत्यांना विशिष्ट दर्जाची भावगीते ऐकण्याची चोखंदळ वृत्ती आली. त्यांची अभिरुची घडली.

ज्योत्स्नाबाईंनी गीतापासून भावगीत, भावगीतापासून पद, पदापासून ख्याल ही सगळी स्थित्यंतरे मोठ्या सहजपणे केली. सुगम संगीत पुढे नेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यात एक पद्धत अशी की, आकार तोच ठेवायचा; पण त्यात स्वत:च्या आवाजाच्या पोताची भर घालायची, आणि हे ज्योत्स्नाबाईंनी केले.

ज्योत्स्नाबाईंनी थोडे लेखनही केले. १९६० च्या सुमाराला त्यांनी ‘आराधना’ हे संगीत नाटक लिहिले. निर्मिती, दिग्दर्शन, काव्य, संगीत सर्वकाही त्यांचेच होते. चारएक वर्षांनी ‘अंतरीच्या खुणा’ हे पत्ररूपी पुस्तक, तसेच नभोवाणीसाठी ‘घराण्याचा पीळ’ ही नाटिका लिहिली व १९९९ मध्ये, त्यांच्या निधनाच्या तीन वर्षे आधी ‘तुमची ज्योत्स्ना भोळे’ हे आत्मचरित्र लिहिले.

अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार, ‘विष्णुदास भावे’ पुरस्कार (१९८०), संगीत नाटक अकादमीचा संगीत अभिनेत्रीचा पुरस्कार (१९७७), ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार, चौसष्टाव्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा म्हणून १९८४ साली बिनविरोध निवड, गोमंतक मराठी अकादमीचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार (१९९५), महाराष्ट्र सरकारचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार (१९९९) असे काही महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. त्यांचे पुण्यात ८६व्या वर्षी निधन झाले.

वंदना खांडेकर

संदर्भ
१. मोटे, ह.वि. (संपा ह.वि. ); ‘विश्रब्ध शारदा’, खंड -२; प्रकाशक : मोटे; १९७५.

२. भोळे, ज्योत्स्ना; ‘तुमची ज्योत्स्ना भोळे’; अनुबंध प्रकाशन, पुणे; १९९८
भोळे, ज्योत्स्ना केशव