चौहान, देवीसिंग व्यंकटसिंग
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद मुक्ती लढा लढवीत असता दोन वर्षे उस्मानाबादच्या तुरुंगात डांबले गेल्यावर, तुरुंग फोडून बाहेर पडल्यावर पुन्हा अटक होऊन जुलूम सहन करणारा काँग्रेस कार्यकर्ता, महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात दाखल झाल्यावर पक्षाकडून अपमान होताच राजकारण सोडून प्राच्यविद्येच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नाव मिळवणारा मराठवाड्यातील एक विद्वान पंडित प्रा. देवीसिंग चौहान यांची जन्मशताब्दी २०११ या वर्षात झाली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शंभर उंबर्याचे नागरसोगे हे गाव, तिथले व्यंकटसिंग एक अशिक्षित पण उमदे शेतकरी, पत्नी अंबिकाबाई, मूळचे घराणे उत्तर प्रदेशातील क्षत्रिय ठाकुरांचे. राजे जयसिंगांच्या महाराष्ट्र स्वारीत ही कुटुंबे इकडे आली. व्यंकटसिंग-अंबिकाबाईंचे सुपुत्र देवीसिंग, एक भाऊ आणि दोन बहिणी त्यांच्या आधी जन्माला आल्या, पण लवकरच निवर्तल्या. जवळच्या तीन गावात मिळून दोनशे एकर जमीन, बैल-बारदान; जमीन कसायची एवढेच ध्येय लहानपणी होते.
देवीसिंग यांचे औसामधील उर्दू माध्यमाच्या शाळेत प्राथमिक-माध्यमिक शिक्षण झाले. त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली. सातवीनंतर ते हिप्परगा येथे राष्ट्रीय शाळेत शिक्षणासाठी दाखल झाले. महात्मा गांधींच्या आवाहनावरून राष्ट्रीय चळवळीत ही शाळा स्थापन झाली होती. १९३१ मध्ये देवीसिंग मॅट्रिक झाले आणि १९४६ मध्ये शाळा बंद पडली. आज तिथे स्वामी रामानंदांच्या नावे एक हायस्कूल उभे आहे. राष्ट्रीय शाळेच्या वसतिगृहात दोनशे विद्यार्थी होते. संस्थापक अ. गो. कुलकर्णी आणि व्यं. मा. देशमुख महात्मा गांधींच्या आंदोलनात दोनदा तुरुंगवास भोगून आले होते. देवीसिंग यांनी याच शाळेत २५ रुपये महिना पगारावर तीन वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली. १९२७ मध्ये स्वदेशाची शपथ घेतल्याने त्यांनी मरेपर्यंत खादीचा वापर केला. साखर खाणे बंद केले होते, पण नगरला साखर कारखाना (पहिला) सुरू झाला आणि ते साखर वापरू लागले.
जून १९३४ मध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले. म.म. द.वा. पोतदार यांच्या प्रोत्साहनाने स.प. महाविद्यालयात दाखल झाले. ह.भ.प. मामा दांडेकरांनी वार लावून जेवायची सोय केली. १९३८ मध्ये गणित घेऊन देवीसिंग बी.ए. झाले. १९३७ मध्ये हैदराबाद संस्थानात राजकीय काँग्रेस निघाली. त्यावर पुढे बंदी आली. पण २-३ वर्षाच्या काळात भूमिगत होऊन त्यांनी काम केले. मध्य प्रदेशचे डी.पी. मिश्रा आणि रविशंकर शुक्ल यांच्या परिचयातून कायदा शिकण्यासाठी १९३९ मध्ये नागपूरला गेले. पुढे वकिली न करता त्यांनी उमरग्याला १९४१ मध्ये राष्ट्रीय शाळा स्थापन केली. १९४४ मध्ये ते मुख्याध्यापक झाले. स्वदेश-स्वधर्म-स्वभाषा यावर निष्ठा हे त्यांचे ध्येय होते. पण स्वामी रामानंदांचा एक नेता म्हणून निजाम सरकारने त्यांना १९४७ मध्ये उस्मानाबादच्या तुरुंगात टाकले. त्यातून ते तुरुंग फोडून बाहेर पडले, पण पुन्हा पकडले गेले. सप्टेंबर १९४८ मध्ये पोलीस कारवाईमध्ये तुरुंग फोडून त्यांनी स्वत:ची सुटका केली. मधल्या काळात देवीसिंगांना महात्माजी गेल्याचे मोठे दु:ख झाले.
हैदराबाद काँग्रेसचे ते सक्रिय कार्यकर्ते झाले व औसामधून आमदार म्हणून निवडून आले. बी. रामकृष्ण रावांच्या मंत्रिमंडळात सहकार आणि शिक्षण खात्याचे मंत्री झाले. पुढे मुख्यमंत्र्यांशी त्यांचे मतभेद झाले आणि ते बाहेर पडले. पण मराठवाडा आणि विदर्भ महाराष्ट्रात सामील करावा यासाठी १९५३मध्ये नागपूर करार झाला, त्यामध्ये मराठवाड्याच्या वतीने देवीसिंगांनी स्वाक्षरी केली. १९५६ मध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकांत पुन्हा औसा मतदारसंघातून ते निवडून आले, पण भाऊसाहेब हिरे आणि यशवंतराव चव्हाण यांच्या सत्ता-स्पर्धेत ते मागे पडले. नाइलाज म्हणून त्यांना शेती खात्याचे उपमंत्रिपद देऊ केले. अपमानास्पद वागणूक असूनही त्यांनी ते पद स्वीकारले. लोकाग्रहास्तव १९५७ ते १९६२ या कालावधीत ते सांभाळले. १९६३ मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. ते काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले. राज्यकर्त्यांना ते नको होते. सच्चा काँग्रेसवाला असूनही त्यांना अंतर्गत राजकारणातून अपयश पत्करावे लागले.
सततच्या कार्यमग्न जीवनातून थोडी उसंत मिळताच रिकामपणात त्यांना वाचनाची संधी मिळाली. ऐतिहासिक उर्दू दस्तऐवज, संस्कृत नाटके, वैदिक संहिता यात ते गढून गेले. अगदी प्रथमच त्यांनी मुल्ला नुस्त्रुतीच्या ‘तारीख-इ-सिकंदरी’ काव्याचे संपादन केले. प्रा. ग.ह. खरे यांनी त्यांचे प्रकट कौतुक केले. ‘‘इतिहास आणि भाषा संशोधनात लक्ष घाला’’ असे त्यांना म्हटले. त्यांना दख्खनी हिंदीची गोडी लागली. देविसिंगांनीच मराठी भाषेला या हिंदीची प्रथमच ओळख करून दिली. नंतरच्या काळात ‘इब्राहिम नामा’, ‘मराठी आणि दख्खनी हिंदी’ तसेच ‘दख्खनी हिंदीतील मराठा इतिहासही मौल्यवान ग्रंथसंपदा त्यांच्या लेखणीतून जन्माला आली. तसेच ‘भारत इराणी संश्लेष’ भाग १-२, पन्हाळगडासंबंधीचे संस्कृत काव्य ‘पर्नाल पर्वत ग्रहणाख्यान’ असे काही ग्रंथ त्यांनी लिहिले. १९६४ ते १९७० या काळात ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य होते. राष्ट्रभाषा सभेच्या मराठवाडा विभागाचे पुढे ते अध्यक्ष झाले. त्यानिमित्ताने त्यांनी मराठवाडा-पुणे एक सांस्कृतिक साखळी जोडली. पुण्यातील राष्ट्रभाषा सभेच्या अतिथिगृहातील वास्तव्य आणि जवळच वास्तव्य करणारे आचार्य लिमये यांचा घनिष्ट परिचय यातून त्यांच्या नवीन अभ्यासाला वाव मिळाला. संस्कृत आणि भांडारकर संशोधन संस्था यांच्याशी ते संलग्न झाले. डॉ. दांडेकर (रा.ना.) यांच्या मार्गदर्शनाने ऋग्वेदाचा भाषाशास्त्रीय अभ्यास सुरू झाला. फारसी-संस्कृत भाषांचा तौलनिक अभ्यास सुरू केला. हिस्टरी काँग्रेसबरोबर ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्सच्या अधिवेशनाला जाऊन ते संशोधनात्मक निबंध सादर करू लागले.
त्यांनी १९३३ पासून प्रा. ग.ह. खरे यांना गुरू मानले होते. नंतर पुण्यात आल्यावर भाषाशास्त्राच्या अभ्यासासाठी आचार्य वि.प्र. लिमये यांना आणि भांडारकरमध्ये आल्यावर डॉ. रा.ना. दांडेकरांना वेदाभ्यासासाठी गुरू मानले. ‘अंडरस्टँडिंग ऋग्वेद’ हा त्यांचा ग्रंथ भांडारकर संस्थेने प्रकाशित केला. ‘ऋग्वेद समस्या आणि उकल’ हा त्यांचा मराठी ग्रंथ त्यापाठोपाठ प्रसिद्ध झाला आणि मग भौतिक पातळीवरून वेदांचा अभ्यास करण्याची नवी दृष्टी देवीसिंगांनी संशोधकांना, भाषणे आणि शोधनिबंध याद्वारा करून दिली. या विषयाच्या अभ्यासाठी एखादी संस्था स्थापन करावी असा त्यांचा संकल्प होता, तो अपूर्णच राहिला.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मराठवाडा विद्यापीठाने १९८७ मध्ये त्यांना डी.लिट्. दिली व त्यांच्या संशोधन कार्याचा गौरव केला. संशोधन क्षेत्रातील त्यांचे कार्य पाहून त्यांचे टीकाकार; देवीसिंगाना, ‘वाट चुकलेला पुढारी’ म्हणत असत. राजकारण व समाजकारण सोडून त्यांनी विद्याव्यासंग केला.भांडारकर संस्थेला आपली ग्रंथसंपत्ती देऊन ते ऋणातून मुक्त झाले. वयाच्या ९०च्या सुमारास ते लातूरमध्ये निवर्तले.