Skip to main content
x

दा कुन्हा, जोस गेर्सन

     जोस गेर्सन दा कुन्हा यांचा जन्म गोव्यातील एका गोवन कॅथलिक कुटुंबात झाला. एकूण बारा भावंडांपैकी जोस गेर्सन हे सर्वांत ज्येष्ठ होते. त्यांचे वडील फ्रान्सिस्को हे पोर्तुगीज सैन्यात होते. या घराण्याची वंशपरंपरा बाळकृष्ण शेणॉय या कुट्ठाळी  गावातील सोळाव्या शतकातील गौड सारस्वत ब्राह्मण व्यक्तीपर्यंत जाते. बाळकृष्ण शेणॉय १५५५ साली पोर्तुगीज चाकरीमध्ये बार्देस येथे स्थलांतरित झाले आणि कालांतराने ख्रिस्ती धर्म स्वीकारून त्यांनी ‘दा कुन्हा’ हे उपनाम धारण केले.

     जोस गेर्सन दा कुन्हा यांनी आपले प्राथमिक शिक्षण पणजी येथे संपवून वैद्यक शास्त्रातील पुढील अध्ययनासाठी मुंबईतील ग्रॅण्ड मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, येथे त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली. १८६४ साली ते मुंबई विद्यापीठातून लंडनला गेले आणि १८६७ साली त्यांनी एल.आर.सी.पी., लंडन (Licentiate of the Royal Collage of Physicians) आणि एम.आर.सी.एस., इंग्लड (Membership of the Royal Collage of Surgeons) या दोन पदविका घेतल्या. १८६८ साली ते मुंबईत येऊन वैद्यकी करू लागले. त्यांनी वैद्यकशास्त्रातील अनेक विषयांवर शोधनिबंध लिहिले; परंतु याव्यतिरिक्त इतिहास, भाषाशास्त्र, नाणकशास्त्र, संस्कृत अशा विविध विषयांची त्यांना आवड व गती होती. त्यांनी या विषयांशी संबंधित अनेक प्रबंध, शोधनिबंध व वीसहून अधिक पुस्तके लिहिली.

     तत्कालीन गोव्यातील लेखक त्यांचे ग्रंथ पोर्तुगीज भाषेत लिहीत असत; परंतु जोस गेर्सन दा कुन्हा यांनी त्यांचे साहित्य इंग्रजी भाषेत लिहिण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे साहित्य जगभर पोहोचू शकले. ‘The Origin of Bombay’ हा त्यांचा पहिला ग्रंथ प्रकाशित होण्यास वेळ लागला व त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १९०० मध्ये तो Bombay Branch of the Royal Asiatic Society (एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई) यांनी प्रकाशित केला. परंतु त्यांचे इतिहास, संस्कृती, पुरातत्त्व यांच्याशी संबंधित ग्रंथ Memoir on the History of the Tooth-Relic of Ceylon, with a Preliminary Essay on Gautam Buddha,The life and System of Gautam Buddha (१८७५), ‘The History and Antiquities of Chaul and Bassein(१८७६)  यांच्यामुळे ते अधिक नावारूपास आले. त्यांनी १८८१ साली ‘The Konkani Language and literature’ हा ग्रंथ लिहिला. यातून त्यांचे भाषाशास्त्राचे सखोल ज्ञान प्रत्ययास येते. यात त्यांनी कोकणी भाषेची वैशिष्ट्ये, तिचा उगम यांसंबंधी चर्चा केली आहे. या ग्रंथात ते कोकणी ही स्वतंत्र भाषा असून कुडाळीसारख्या इतर बोलीही त्यात अंतर्भूत होतात, असे मत मांडतात. कोकणी व मराठीत साम्य असले, तरी ती मराठीपेक्षा भिन्न असून त्या भाषेवर मराठी-व्यतिरिक्त संस्कृत, पर्शियन, कन्नड, पोर्तुगीज या भाषांचा मोठा प्रभाव व शब्दसंपत्ती जाणवते.

     १८७६ मध्ये जोस गेर्सन दा कुन्हा यांनी प्राचीन नाणी संकलनाला सुरुवात केली. त्याव्यतिरिक्त त्यांनी जेम्स गिब्स व भाऊ दाजी लाड यांचे संकलित नाणेसंचय विकत घेतले. त्यांचे स्वत:चे संकलन सत्तावीस हजार नाण्यांपेक्षा जास्त असून ते तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यातील सर्वोत्कृष्ट खासगी संकलन मानले गेले. त्यांनी १८८८ साली या नाण्यांचा कॅटलॉग प्रकाशित केला. त्यांनी हा ग्रंथही प्रकाशित केला.

      या सर्व कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले. ते मुंबईतील वैद्यकशास्त्राशी संबंधित असलेल्या अनेक संस्थांशी संलग्न होते. त्यांना गोव्यातील Instituto Vasco da Gama (१८७१) आणि  Bombay Branch of Royal Asiatic Society (१८७३) यांचे सन्माननीय सदस्यत्व बहाल केले गेले. त्यांनी मुंबईतील Asiatic Society व Anthropological Society यांचे अध्यक्षपदही भूषविले होते. त्यांना १८७७ व १८९९ साली अनुक्रमे फ्लॉरेन्स आणि रोम येथे भरलेल्या ‘Congress of Orientalists’ मध्ये सन्मानित करण्यात आले. १८७७ साली त्यांनी, त्यांना उपलब्ध असलेल्या स्कंदपुराणातील सह्याद्री खंडाच्या पोथ्यांचे संकलन - संपादन करून ‘The Sahyadri Khanda of the Skanda Purane: a Mythological Historical & Geographical Account of Western India’ हा ग्रंथ प्रकाशित केला. एक आघाडीचे प्राच्यविद्याकार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. प्राच्यविद्येत अतुलनीय योगदान देणार्‍या या विद्वानाचे गोव्यात देहावसान झाले.

प्राची चौधरी

दा कुन्हा, जोस गेर्सन