Skip to main content
x

देशमुख, शेषराव आप्पाराव

          शेषराव देशमुख यांचा जन्म परभणी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत व उच्च माध्यमिक शिक्षण गव्हर्मेंट हायस्कूल परभणी येथे झाले. त्यानंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षात काम करण्यास सुरुवात केली व या पक्षातर्फे त्यांनी परभणी नगर परिषदेचे १० वर्षे (१९७० पर्यंत) अध्यक्षपद भूषवून शहरातील पायाभूत सुविधा सिमेंट रस्ते, रस्त्यावरील दिवे, ड्रेनेज सिस्टीम, रस्ते, शाळा, हॉस्पिटल्स परिसरातील स्वच्छता इत्यादी कामे व रस्त्याचे दुतर्फा वृक्षारोपण इत्यादी कामे नेटाने केली. त्यामुळे या कामाचा लोकांच्या मनावर चांगला पगडा असून याबाबतीत कित्येक वर्षे लोक त्यांची वाखाणणी करीत असत. १९७०नंतर ते शेतकरी कामगार पक्षाचे आमदार म्हणून शासकीय सामाजिक, कृषीविषयक, सुधारणांवर भर देऊन या कार्यातही आपल्या कार्यपद्धतीची त्यांनी चुणूक दाखवली. १९७७ मध्ये जनता पक्षातर्फे खासदार म्हणून निवडून आले. त्या वेळी त्यांनी लोकसभेमध्ये शेतकर्‍यांच्या अडचणींसंबंधी विषय मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला.

          मराठवाड्यात खरीप ज्वारीचे एकरी उत्पादन सरासरी पाच ते सात क्विंटल होते. रब्बी ज्वारीचे उत्पादन एकरी सरासरी तीन ते पाच क्विंटल होते. १९६४-६५ नंतर ज्वारीचे संकरित वाण शेतकर्‍यांना लागवडीसाठी उपलब्ध झाल्यामुळे खरीप ज्वारीचे उत्पादन सरासरी पंधरा ते वीस क्विंटलपर्यंत पोहोचले. ज्वारीच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या भरपूर फायदा झाला. निरनिराळ्या संकरित वाणांच्या लागवडीमुळे कृषी उत्पादनवाढीत मोलाचा हातभार लावलेला आहे. यामुळे कृषी क्षेत्रात उत्पादनवाढीत मोठी क्रांती घडून आली आहे. वेगवेगळ्या संकरित वाणांचे प्रमाणित बीजोत्पादनाचे कार्यक्रम शेतकी खाते महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला यांच्यातर्फे शेतकर्‍यांच्या शेतावर राबवले.

          देशमुख यांनी आपल्या शेतावर संकरित वाण सी.एच.एच.-१, सी.एच.एच.-४, सी.एच.एच.-५, सी.एच.एच.-६ या ज्वारीच्या संकरित वाणांचे प्रमाणित बीजोत्पादन कार्यक्रम घेतले. तसेच सी.एच.एच.-४ या संकरित वाणांच्या मादी(पी.एम.एस.-१०३६ अ)चा पायाभूत बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवण्यात आला.

          देशमुख यांनी संकरित कापूस एच-४, वरलक्ष्मी या वाणाचे बीजोत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले. अधिक उत्पादन देणारी जी.कॉट-१० या कापसाचे प्रमाणित बियाणे उत्पादन कार्यक्रमही त्यांनी मोठ्या प्रमाणावर राबवला व गरजू शेतकर्‍यांना हे बियाचे उपलब्ध करून दिले. तसेेच त्यांनी एच.बी.-३ या बाजरीच्या संकरित वाणाचे बीजोत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले. हे सर्व बीजोत्पादनाचे कार्यक्रम देशमुख यांनी व त्यांच्या ज्येष्ठ बंधूनीही; जनार्दनरावांनी स्वतःच्या शेतावर राबवले आहेत.

          बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्यात देशमुख यांना ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी.आर. बापट, तसेच डॉ. टी.जी. शहाणे, बीजोत्पादन तज्ज्ञ यांचे तांत्रिक मार्गदर्शन झाल्यामुळे हे कार्यक्रम राबवण्यात ते यशस्वी झाले. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला भागधारकांचा प्रतिनिधी म्हणून ७ वर्षे संचालक मंडळावर देशमुख यांची निवड करण्यात आली होती.

- संपादित

देशमुख, शेषराव आप्पाराव