Skip to main content
x

देव, रवींद्र गजानन

         चित्रकलेच्या प्रचारासाठी साप्ताहिक चित्रकला वर्ग, सामूहिक चित्रप्रदर्शने, प्रात्यक्षिके, व्याख्याने, कलाकारांचे एकत्रीकरण आणि भारतभर प्रवास अशा उपक्रमांतून सातत्याने काम करणारे व त्यासोबतच स्वतःचा उपयोजित-कलेचा व्यवसाय सांभाळून चित्रकार म्हणून कार्यरत असलेले पुण्यातील उत्साही तरुण व्यक्तिमत्त्व म्हणजे रवींद्र गजानन देव.

         आई कुमुदिनी जुन्नरच्या सराफ व्यावसायिक जोशी कुटुंबातल्या होत्या, तर वडील गजानन हेरंब देव व्यवसायाने वकील व सामाजिक कार्यकर्ते होते. पुण्यातल्या शिवाजीनगर गावठाण भागात, एकत्र कुटुंबपद्धतीत देव वाड्यात रवींद्र लहानाचे मोठे झाले. गल्लीत अठरापगड जातींची वस्ती, अनेक धर्मांचे लोक व घरातले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वातावरण अशा संस्कारात घडलेल्या रवींद्र देव यांना सामाजिक समरसतेचे धडे इथेच मिळत होते.

         त्यांचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण मॉडर्न विद्यालयात झाले. त्यांनी शालेय जीवनात अरुण फडणीस यांच्याकडून चित्रकलेचे प्राथमिक धडे गिरवले. वयाच्या तेराव्या वर्षापासूनच चित्रकलेत रवींद्र देवांना चांगली गती होती. त्यांच्या आई-वडिलांनी, तसेच थोरले काका चिंतामणी देव यांनी चित्रकलेचे साहित्य देऊन रवींद्रच्या चित्रकलेला सतत प्रोत्साहन दिले. वयाच्या तेराव्या वर्षी चिंचवड संस्थानाने मोरया गोसावींच्या आणि चिंतामणी महाराजांच्या जीवनावरील प्रसंगचित्रे काढण्याची संधी त्यांना दिली. फडणीस सरांनी त्यांच्यातील गुण हेरून अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेण्यापर्यंत सतत केलेला पाठपुरावा या क्षेत्रात स्थिरावण्यास त्यांना मार्गदर्शक ठरला आणि निसर्गचित्रण व स्केचिंगसाठी त्यांनी सामूहिक प्रयत्न केले. शिस्त, अनुशासन, काटेकोरपणा, वेळ पाळणे व सातत्य या संस्कारांमुळे शिक्षण, व्यवसाय व सामाजिक जीवन यांमध्ये ते यशस्वी झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर चित्रकलेत प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. लंडन येथील राम अगरवाल यांच्यासाठी 'भारतीय संस्कृती' या विषयावर चित्र काढण्याची संधी त्यांना मिळाली.

         नवे बदल, नवे माध्यम यांमुळे चित्रकलेचे उपयोजित अंग असणार्‍या जाहिरात क्षेत्राच्या व्यवसायात देव उतरले. प्रथम घर, घरातून वाड्याची ओसरी, नंतर स्वतःचे आधुनिक कार्यालय अशी त्यांची व्यावसायिक प्रगती झाली. त्यांनी १९८६ मध्ये ‘ग्रफी अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड मार्केटिंग’ या नावाने फर्म सुरू केली व व्यावसायिक क्षेत्रात चित्रकलेचा समर्पक उपयोग केला. त्याचबरोबर ‘संस्कार भारती’ या कलाक्षेत्रातील संघटनेत समाजात कलाविषयक जाण वाढावी व कलावंतांनी एकत्र येऊन कलाविषयक कार्यक्रम करावेत, या दृष्टीने संघटक म्हणून ते काम करू लागले.

         संस्कार भारतीमुळे त्यांना चित्रकलेचा प्रचार-प्रसार करण्याची संधी मिळाली. या माध्यमाद्वारे ते चित्रकला या विषयात विविध प्रयोग करत राहिले. त्यातून त्यांनी साप्ताहिक चित्रकला वर्ग हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबवला. कलावंतांचा व्यक्तिगत अहंकार बाजूला सारून कलाकारांचे संघटन झाले व या प्रयोगामुळे या क्षेत्रात अनेक मान्यवर व सामान्य कलाकार एकत्र आले. अनेक चित्रकार तयार झाले. कला व विचार यांची देवाणघेवाण झाली. चांगला संवाद घडून आला. कामात सुसूत्रता व उत्तम नियोजन यांमुळे निसर्गचित्रणाचे वर्गही सुरू झाले. संकुचितता कमी झाली. कलाकारांमध्ये आत्मीयता व सहकारीवृत्ती वाढली. विविध वयांचे लोक एकत्र आल्याने लहान-मोठे हे वयाचे अंतर गळून पडले आणि सर्व चित्रकार समभावनेने, सामूहिकतेने काम करू लागल्याने सहभागी कलाकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मिळू लागली. त्यांच्यात सामाजिक जाणीवही निर्माण झाली.

         स्थानिक पातळीवर काम करताना देशाच्या इतर प्रांतांत : कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, अरुणाचल, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली अशा अनेक ठिकाणी चित्रकला या विषयासाठी त्यांनी वर्षानुवर्षे प्रवास करून प्रात्यक्षिके, व्याख्याने, कला व संघटन, विविध उपक्रम यांसाठी मार्गदर्शन केले. या प्रांतांत त्यांनी अनेक ठिकाणी साप्ताहिक चित्रकला व निसर्गचित्रण वर्गाचा उपक्रम सुरू केला.

         असे विविध उपक्रम सुरू असतानाच रवींद्र देव यांनी स्वतःचा चित्रकलेचा सराव सुरू ठेवला व विविध माध्यमे हाताळली. पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिकाचे ते सदस्य आहेत. फिलाडेल्फिया येथे २००८ मध्ये झालेल्या व्यक्तिचित्रण कार्यशाळेत ते सहभागी झाले होते. त्यांच्या मासिकासाठी रवींद्र देव यांचे चित्रही निवडले गेले होते. दक्षिण कर्नाटक, तवांग, आसाम, मेघालय या ठिकाणी ते प्रत्यक्ष पेंटिंगसाठी जाऊन आले. त्यांची पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर, आर्ट टू डे गॅलरी, जहांगीर आर्ट गॅलरी, तसेच चित्रकला परिषद, बंगळुरू येथे वैयक्तिक व सामूहिक चित्रप्रदर्शने झाली आहेत.

         याशिवाय अनेक सामाजिक व स्वयंसेवी संस्थांमध्ये ते प्रत्यक्ष कामांत सहभागी आहेत. अखिल भारतीय चित्रकला संयोजक म्हणून संस्कार भारतीची मोठी जबाबदारी रवींद्र देव पार पाडत आहेत. त्यांचा व्यवसाय सांभाळताना, सामाजिक व सांस्कृतिक जबाबदार्‍यांत कमर्शिअल आर्टिस्ट व शास्त्रीय गायिका असलेली त्यांच्या पत्नी स्वाती, (पूर्वाश्रमीच्या करंदीकर) यांची सदैव उत्तम साथ असते. प्रचंड धावपळीच्या जीवनातही रोज नेमाने चित्रकलेचा रियाज हे त्यांचे वैशिष्ट्य होय. त्यांच्या संघटन व संवाद या कौशल्यांमुळे, तर निगर्वी व साधी राहणी-उच्च विचारसरणी यांमुळे अनेक माणसांशी व कुटुंबांशी ते नाती जोडून आहेत. 

         - नयना कासखेडीकर

देव, रवींद्र गजानन