दोडिया, अतुल बच्चूभाई
भारतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आघाडीचे समकालीन चित्रकार अतुल बच्चूभाई दोडिया यांचा जन्म मुंबईतील घाटकोपर येथे एका गुजराती कुटुंबात झाला. वडील बच्चूभाई इमारतींचे ठेकेदार (कॉन्ट्रॅक्टर) होते. त्यांच्या आईचे नाव नंदकुंवर होते. चित्रकलेचा वारसा नसला तरी त्यांना वडिलांचे प्रोत्साहन होते. चित्रकलेबरोबरच दोडियांना साहित्य, काव्य यांचीही आवड होती. त्यांचे शालेय शिक्षण घाटकोपरच्या गुरुकुल विद्यालयात झाले. वयाच्या अकराव्या वर्षी चित्रकला क्षेत्रातच जायचे असे त्यांनी ठरवून टाकले.
अतुल दोडिया यांनी १९७७ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला व १९८२ मध्ये त्यांनी पेंटिंगची पदवी (बी.एफ.ए.) प्राप्त केली. जे.जे.त असताना आपल्या जवळच्या व भोवतालच्या लोकांची ते व्यक्तिचित्रणे करत असत. कलाशिक्षण सुरू असताना त्यांना १९७९ मध्ये आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या हीरकमहोत्सवी प्रदर्शनात प्रथम पारितोषिक, १९८२ मध्ये महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक तर १९८४ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचे पारितोषिक मिळाले. १९८२-८३ या वर्षात त्यांनी जे.जे. ची फेलोशिप मिळाली.
अतुल दोडियांचे पहिले एकल प्रदर्शन १९८९ मध्ये झाले. त्याआधी त्यांनी काही समूह प्रदर्शनांतून आपली चित्रे प्रदर्शित केली होती. या प्रदर्शनांतील चित्रे पूर्णत: वास्तववादी होती. डेव्हिड हॉकनी व एडवर्ड हॉपर यांचा प्रभाव त्या काळात दोडिया यांच्यावर होता. ‘दोज शूज ऑफ माईन’, ‘सौरभ सोसायटी—दुपार १२’ इत्यादी चित्रांमधून त्यांची वास्तववादी चित्रणावरील पकड दिसते.
१९९१ मध्ये फ्रेंच सरकारची शिष्यवृत्ती मिळाली व ते पॅरिसला इकोल द ब्यू आर्टमध्ये शिक्षणाकरिता गेले. या दरम्यान त्यांनी पॅरिसमधील अनेक मोठ्या संग्रहालयांना भेटी दिल्या. तसेच इटली, हॉलंड, इंग्लंड, जर्मनीमध्ये प्रवास केला. या अनुभवातून पेंटिंगकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला व पेंटिंगचे रूपही बदलत गेले.
अतुल दोडिया यांना अनेक गोष्टींत रस होता. चायनीज कॅलिग्रफी, मध्ययुगीन युरोपियन टॅपेस्ट्री, हस्तलिखिते, वुडकट्स, प्रबोधनकाळातील इटालिअन चित्रकार, भारतीय लघुचित्रशैली, पोस्टर्स, जाहिरातींचे फलक, कॅलेंडर्स यांशिवाय हिंदी चित्रपट, इंग्रजी, गुजराती साहित्य, कविता इत्यादी गोष्टी त्यांच्या चित्रांत येत गेल्या आणि त्यानुरूप त्यांची शैली ठरत गेली व त्यांची पुढील चित्रनिर्मिती सुरू झाली.
त्यांच्या एकल प्रदर्शनांतून त्यांनी अनेक वेगवेगळे विषय घेऊन काम केलेले दिसते. अतुल दोडियांच्या चित्रांत सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ, वर्तमानात घडलेल्या घटना, अनेक भारतीय/पाश्चात्त्य चित्रे-चित्रकारांचे संदर्भ, स्वत:चे खाजगी अनुभव, तसेच दैनंदिन जीवनातील दृश्य-अनुभव या सगळ्यांचा एक समग्र रचनाबंध दिसतो. जलरंग, तैलरंग, अॅक्रेलिक, एनॅमल इत्यादी रंगमाध्यमे, कॅनव्हास, कागद, धातूचे पत्रे, विविध पृष्ठभाग, चारकोल, मार्बल डस्ट (संगमरवरी पावडर), इत्यादींचा त्यांनी वापर केला. काही ठिकाणी कोलाज वगैरे तंत्रांचाही वापर त्यांनी आपल्या चित्रांतून केलेला दिसतो. वास्तववादी रेखाटनावरील प्रभुत्व, रंगलेपनाची विविधता व अनेक घटकांची वैचित्र्यपूर्ण रचना त्यांच्या चित्रांमध्ये असते. यातून दोडियांची आपली अशी एक चित्रभाषा निर्माण झाली.
पॅरिसमधून १९९५ मध्ये परत आल्यावर दोडियांचे पहिले प्रदर्शन केमोल्डमध्ये झाले. या प्रदर्शनातील चित्रे तैलरंगात होती. त्यात व्यक्तिगत भावना आणि अनुभव रूपकांद्वारे आला होता. यातील ‘ओ नयना’ या चित्रात हॉस्पिटलमधील एक रिकामी कॉट, त्यावर शहाळे, विविध हत्यारे, फळे वगैरे अनेक गोष्टी होत्या. दुसऱ्या एका सेल्फ-पोट्रेट मध्ये दोडिया यांनी स्वत:ला जेम्स बाँडच्या वेशात रंगवले होते व गॉगलमध्ये डेव्हिड हॉकनी आणि भूपेन खक्कर या त्यांच्या आवडत्या चित्रकारांच्या प्रतिमा रंगवल्या होत्या.
‘अॅन आर्टिस्ट ऑफ नॉन व्हायलन्स’ हे १९९९ मध्ये झालेले दोडियांचे एक महत्त्वाचे प्रदर्शन होते. यातील सर्व चित्रे जलरंगात होती व आकाराने ती ४५’’द ७०’’ एवढी मोठी होती. ही चित्रमालिका दोडियांना गांधीजींच्या ‘मी काही एखादा ऋषी नाही व अहिंसेचा तत्त्वज्ञानीही नाही, परंतु अहिंसेचा कलाकार (आर्टिस्ट ऑफ नॉन व्हायलन्स) आहे’ या विधानावरून सुचली. या मालिकेच्या आधीपासूनच अतुल दोडिया ‘गांधी’ या विषयावर काम करत होते. या प्रदर्शनात गांधीजींच्या जीवनातील प्रसंग निवडून दोडिया यांनी कलावंताच्या दृष्टिकोनातून गांधीजींचे एक वेगळे दर्शन घडवले होते.
‘सेल ऑफ खादी’ या चित्रात ‘शुद्ध स्वदेशी भांडार’ या दुकानातली पावती दाखविली आहे. यात ‘पैसा घेणारे’ (कॅशिअर) म्हणून अतुल दोडियांची सही आहे आणि विक्रेता म्हणून गांधींची. याशिवाय ‘मॉर्निंग वॉक ऑफ जुहू बीच’ या चित्रात गांधीजींच्या हातातली काठी धरून पळणारा मुलगा दाखवला असून हे चित्र प्रतिबिंबासारखे उलटे दाखवले आहे. याच चित्रात स्टिकरसारख्या रंगीत छोट्या आकारावर एक म्हातारा (माकडासारखा) हातात तराजू घेऊन बसला असून त्याच्या शेजारी दोन्ही बाजूंना दोन बोके आहेत. ‘बापू अॅट रेने ब्लॉक गॅलरी, न्यूयॉर्क’ हे चित्र कल्पनेतले असून जोसेफ बॉइज आणि गांधीजी यांना त्यात एकत्र आणले आहे. गांधीजी न्यूयॉर्क गॅलरीच्या दरवाज्याजवळ उभे आहेत व ब्लँकेट लपेटून बसलेला जोसेफ बॉइज काठीने खुणावत आहे. जवळ एक लांडग्यासारखा प्राणी उभा आहे. जलरंगाचा पारदर्शकपणा ठेवून केलेली मुक्त, पण संयमित हाताळणी, बर्न्ट अंबर, यलो ऑकर, बर्न्ट सायना, सेपिया अशा उष्ण सौम्य रंगांचा वापर, ही या चित्रांची गुणवैशिष्ट्ये आहेत.
त्यांनी २००० मध्ये ‘रोलर शटर्स’ ही मालिका लंडनच्या ‘टेट मॉडर्न’ या गॅलरीकरिता केली. मुंबईतील उद्योग वसाहतीतील गाळ्यांना लागणारे शटर्स (रोल होणारे दार) वापरून त्यांनी काम केले होते. हे काम एनॅमल रंगात होते. शटरवर एक प्रतिमा व शटर गुंडाळला गेल्यावर आत दुसरी प्रतिमा, असे त्याचे स्वरूप होते. व्यवसायातील दिखाऊ आकर्षक चित्र आणि त्यापाठी असलेले काळ्या कृत्यांचे वास्तव, असा काहीसा या चित्रांचा आशय होता. दर्शनी भागावर कॅलेंडरवरील लक्ष्मीचे बटबटीत रंगातील चित्र, तर आतील भागात हुंड्याअभावी तिघा बहिणींनी स्वत:ला टांगून घेऊन केलेल्या आत्महत्येच्या वृत्तावर आधारित चित्र असा विरोधाभास त्यांनी दाखवला होता. हे काम इंटरअॅक्टिव्ह होते. म्हणजे प्रेक्षक स्वत: ते शटर्स उघडू व बंद करू शकत होते. टोकियोच्या ‘बॉम्बे लेबिरिन्थ/लेबॉरेटरी’ या प्रदर्शनात या शटर्सबरोबर शिड्या, सरकणारे दरवाजे, इत्यादींचा वापरही त्यांनी केला होता.
‘लिटीअर-स्केप’ ही २००१ मधील मालिका कारगिल युद्ध आणि गुजरातमधील हत्याकांड यांवर आधारित होती. ही चित्रे काहीशी प्रतीकात्मक होती. या चित्रमालिकेतील प्रमुख प्रतिमा चेटकिणीसारख्या दिसणाऱ्या हडकुळ्या, कृश स्त्रीची होती. यात भारताचा नकाशा, गर्भ (भ्रूण), मानवी कवट्या, कासव, मासे अशा जलचर प्राण्यांच्या, तसेच पौराणिक प्रतिमा समाविष्ट होत्या. जलरंगाबरोबरच यात मार्बल डस्टचाही वापर केला होता. ही मालिका बर्लिनला फाइन आर्ट रिसोर्समध्ये दाखविली होती.
‘ब्रोकन ब्रँचेस’ हे १९९३ मधील प्रदर्शन म्हणजे एक प्रकारचे मांडणशिल्प होते. कुटुंबातील जुनी छायाचित्रे, निरनिराळी अवजारे, कृत्रिम हात-पाय, खेळणी, निरनिराळी हाडे, घराचे जुने प्लॅन्स, जमविलेली चित्रे, अशा अनेक वस्तूंची निरनिराळ्या शोकेसेसमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रितीने मांडणी केली होती. या प्रदर्शनानंतर त्यांच्या निर्मितीमध्ये कपाटांचा आणि मांडणशिल्पांचा वापर अधिक प्रमाणात होऊ लागला.
याव्यतिरिक्त त्यांनी देशात-परदेशात केलेली काही प्रदर्शने अशी आहेत: न्यूयॉर्कमधील ‘बोस पॅशिया’ गॅलरीतील ‘क्रॅक्स इन मॉन्द्रिआन’ यात पीट मॉन्द्रिआन या पाश्चात्त्य चित्रकाराच्या १९२०-३० या काळातील भौमितिक अमूर्तवादी चित्रांचा आधार घेऊन केलेली मालिका होती. काळ्या जाड रेषांनी बांधलेले भौमितिक आकार आणि लाल-निळा-पिवळा यांसारखे रंग वापरून केलेल्या मॉन्द्रिआनच्या रचनांवर आधारित अतुल दोडियांची ही मालिका म्हणजे अनेक गोष्टींना दिलेला संकल्पनात्मक प्रतिसाद होता. जुन्या भक्कम इमारतींना पडत जाणारे तडे, भिन्न समाजामधील झगडा, सीमारेषेवरील लढाया, भूकंप इत्यादी गोष्टी या मालिकेतून सांकेतिक रूपाने आविष्कृत करण्याचा प्रयत्न होता. पीव्हीसी ड्रेनेज पाइपला अडकविलेल्या या चित्रकृती अॅक्रिलिक रंग व मार्बल डस्टचा उपयोग करून साकारल्या होत्या. या चित्रांना क्रॅक्स इन मॉन्द्रिआन-बंगाल, क्रॅक्स इन मॉन्द्रिआन-काश्मीर, क्रॅक्स इन मॉन्द्रिआन-गुजरात, अशी शीर्षके दिली होती.
‘सप्तपदी’ ही चित्रमालिका कनू देसाई या चित्रपटासाठी सेट करणार्या चित्रकाराच्या विवाहदृश्याच्या ड्रॉइंग्जवरून दोडिया यांना सुचली. त्यांनी ही मालिका वृत्तपत्रातील काही खर्या व विचित्र लग्नांच्या गोष्टी शोधून केली. उदाहरणार्थ, सतरा-अठरा बायका करणारा पुरुष, आपल्या पत्नीच्या साडीच्या डिझाइनचा शर्ट नेहमी वापरणारा नवरा इ. यात राजा रविवर्माची ओलिओग्राफ्स (मुद्रित चित्रे), सत्यजित रायच्या चित्रपटातील दृश्ये, रेने मॅग्रीट या अतिवास्तववादी चित्रकाराच्या चित्रांतील प्रतिमा, हिंदी चित्रपटातील पोस्टर्स, दुकानावरील जाहिराती यांचा उपयोग केलेला आहे. धातूच्या पत्र्यावर (लॅमिनेट) केलेली ही चित्रे काहीशी गमतीदार व काही वेळा विनोदीही वाटतात.
बर्याच वेळा विविध संदर्भांमुळे दोडिया यांची चित्रे बघणार्याला बुचकळ्यात टाकतात. पाश्चात्त्य चित्रकारांच्या चित्रांचे व त्यातील प्रतिमांचे, कला इतिहासातील घटनांचे संदर्भ, तसेच व्यक्तिगत जीवनातील घटना अशा अनेक दृश्य-प्रतिमा त्यांच्या चित्रांत समाविष्ट असतात.
‘दी वेट स्लीव्हज् ऑफ माय पेपर रोब’: शबरी इन हर यूथ- आफ्टर नंदलाल बोस, (२००६), ‘श्री खख्खर प्रसन्न’ (२००७) अशा एकल प्रदर्शनांमधून तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनांतून त्यांनी सातत्याने आपली चित्रे प्रदर्शित केली आहेत व त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.
अतुल दोडिया यांचा आजवरचा कलाप्रवास अनेक संदर्भांनी आणि दृश्यजाणिवांनी समृद्ध झालेला आहे. त्यांच्या चित्रांमध्ये प्रयोगशीलतेबरोबरच विचारशीलताही आढळते. जनसामान्यांशी असलेले सांस्कृतिक बंध कायम ठेवून ते कलेच्या जागतिक संदर्भांना आपलेसे करून घेतात आणि स्वत:च्या दृश्यभाषेतून हा अनुभव मांडतात. त्यामुळे त्याला एक वेगळे परिमाण प्राप्त होते.
- माधव इमारते