Skip to main content
x

दोशी, वालचंद हिराचंद

      विसाव्या शतकाच्या प्रारंभात भारताच्या औद्योगिक प्रगतीचा पाया ज्या भारतीय उद्योगपतींनी घातला, त्यांतील एक महत्त्वाचे नाव आहे वालचंद हिराचंद दोशी.

     एकोणिसाव्या शतकात, गुजरातमधील सौराष्ट्र भागातून प्रतिकूल परिस्थितीमुळे दोशी कुटुंब उद्योगासाठी महाराष्ट्रात आले आणि इथेच व्यापारी उद्योग सुरू केले. या दिगंबर जैन, धार्मिक वृत्तीच्या कुटुंबात हिराचंद आणि राजुबाई या दांपत्याच्या पोटी सोलापूर येथे वालचंद यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मानंतर पंधरा दिवसांत मातेचे निधन झाले आणि काकू उमाबाई यांनी त्यांचा पुत्रवत संभाळ केला. बालपणीच त्यांची बुद्धिमान आणि सर्जनशील वृत्ती लक्षात आली आणि वडिलांनी त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरविले. एकत्र धार्मिक कुटुंबामुळे त्यांच्यावर बालवयात सामाजिक बांधीलकीचे पक्के संस्कार झाले. सोलापूर, पुणे, औरंगाबाद येथे त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाले. १८९९ साली ते शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले पण महाविद्यालयात जाऊनही पदवी प्राप्त करता आली नाही. इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी बी.ए. ला प्रवेश घेतला. पण शिक्षण पूर्ण होण्याआधी एका कौटुंबिक आघातामुळे त्यांना घरी परतावे लागले. घरच्या व्यापारात आणि सावकारीत लक्ष घालावे, भाडे घ्यावे, पण हा उद्योग त्यांना करता येत नाही; या टीकेने व्यथित होऊन त्यांनी उत्पादनक्षेत्रात जायचा धाडसी निर्णय घेतला.

     रेल्वेतील एक कारकून लक्ष्मण बळवंत फाटक यांच्या भागीदारीत त्यांनी रेल्वेची लहानमोठी कंत्राटे घेतली आणि भरपूर धन मिळवले. बांधकाम कंत्राटाच्या सर्व व्यावहारिक बाबतीत पारंगत झाल्यावर अधिक मोठी कंत्राटे घेण्यासाठी त्यांनी १९२० साली आपली कंपनी ‘टाटा कन्स्ट्रक्शन्स’मध्ये विलीन केली. या कंपनीने पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर बोरघाटात बांधलेले मोठमोठे बोगदे, तानसा ते मुंबईपर्यंत पाणीपुरवठ्यासाठी घातलेल्या अजस्त्र पाइपलाइन्स, अशी बांधकामे आजही वाखाणली जावीत इतकी परिपूर्ण आहेत.

     उत्कृष्टतेचा ध्यास त्यांच्या सर्व कामांत दिसून येत असे. ब्रिटिश अधिकारीही त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत समाधानी होते. उत्तर भारतात सिंधू नदीवरील कलबाग पूल, ब्रह्मदेशातील इरावती नदीवरील पूल अशी महत्त्वाची कंत्राटे त्यांना मिळाली. १९२९ साली ते कंपनीचे कार्यकारी संचालक झाले. १९३५ साली टाटांनी आपला भाग विकला, कंपनीचे नाव ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी’ असे ठेवले आणि या कंपनीने बांधकाम व्यवसायावर आपल्या नावाची मोहर उठवली. त्यामागे वालचंद हिराचंद यांचे कष्ट होते. 

     जल वाहतूक हा व्यवसाय विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत चांगला फोफावला होता. व्यवसायाचा विस्तार विविध उद्योगांत व्हावा म्हणून वालचंद हिराचंद यांनी पहिल्या महायुद्धानंतर १९१९ साली एस.एस. लॉयल्टी ही बोट ग्वाल्हेरचे राज्यकर्ते शिंदे यांच्याकडून विकत घेतली आणि मालवाहतुकीचा प्रारंभ केला. युद्धकाळात लष्करी सामग्रीची ने-आण करण्यात अनेक कंपन्यांनी प्रचंड पैसा मिळवला होता म्हणून अनेक भारतीय या उद्योगात उतरले; पण ब्रिटिश कंपन्यांनी त्यांना व्यवसाय करू दिला नाही. परदेशी कंपन्यांशी भाड्याच्या दराबाबत टक्कर देत वालचंद हिराचंद यांनी आपल्या व्यावसायिक कौशल्याचा हुशारीने वापर करून हे समुद्रातील साहस यशस्वी केले. ‘सिंदिया स्टीम नेव्हिगेशन’ या कंपनीद्वारे उत्तम व्यवहार करून नावलौकिक मिळवला.

     १९२९ सालापासून १९५० सालापर्यंत ते या कंपनीच्या प्रमुखपदी होते. महात्मा गांधींनी ‘यंग इंडिया’, ‘हरिजन’ या वृत्तपत्रांतून या कंपनीची ‘पहिली स्वदेशी कंपनी’ असा गौरव केला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी १९५० साली हे पद सोडले, तेव्हा एकूण किनारी मालवाहतुकीतील २१ टक्के भाग या कंपनीने पटकावला होता. ५ एप्रिल १९१९ रोजी एम.एस. लॉयल्टीने पहिला मुंबई ते लंडन हा प्रवास केला याचा सन्मान म्हणून ५ एप्रिल हा ‘नौदल दिवस’ म्हणून साजरा होतो.

     १९३९ साली वालचंद हिराचंद यांची भेट अमेरिकेतील विमान उत्पादकाशी झाली. भारतीय लोकांमध्ये देशाला सर्व उद्योगांत स्वयंपूर्ण करायची ताकद आहे असा विश्वास असणाऱ्या वालचंद यांनी त्या वेळच्या मैसूर संस्थानचे दिवाण मिर्झा इस्माईल यांच्याशी बोलणी करून पाठिंबा मिळवला. बंगलोरजवळ ‘हिंदुस्थान एअरक्राफ्ट’ या कारखान्यात विमानाचे उत्पादन सुरू झाले. १९४० साली भारत सरकारची त्यामध्ये एक तृतीयांश मालकी होती. १९४२ साली दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली तेव्हा लष्करी विमानासाठी सुरक्षितता आणि वेगाने विस्तार करायला प्रचंड भांडवलाची गरज निर्माण झाली. हा उद्योग त्या वेळी पूर्ण सरकारी मालकीचा झाला अन् त्याचे नाव ‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ असे बदलण्यात आले. आज तिथे जागतिक दर्जाची विमाने बनतात.

     जल वाहतूक व्यवसायात पाय रोवल्यावर वालचंद यांनी बोटीच्या बांधणीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. १९४० साली विशाखापट्टण येथे त्यांनी ‘हिंदुस्थान शिपयार्ड’ची मुहूर्तमेढ रोवली. स्वातंत्र्यानंतर १९४८ साली ‘जलसा’ ही पहिली स्वदेशी बोट बांधण्यात आली. हा व्यवसायही लष्कराशी संबंधित असल्याने, तसेच देशाच्या आर्थिक भरभराटीशी संलग्न असल्याने टप्प्याटप्प्याने १९६१ साली सरकारकडे पूर्णपणे हस्तांतरित झाला.

      १९३९-४० सालांच्या सुमारास वाहन उद्योगाचे उज्ज्वल भवितव्य वालचंद यांनी जाणले. १९४० साली ख्रायस्लर कंपनीशी करार करून ते या उद्योगात उतरले. १९४८ साली मुंबईजवळ ‘प्रीमियर ऑटोमोबाइल’ या उद्योगाची सुरुवात झाली. सुटे भाग आयात करून इथे एकत्रित बांधणी केली जाई. पुढे १९५५ साली इटालियन फियाट कंपनीशी करार करून १९५६ साली मोठ्या प्रमाणावर वाहननिर्मिती सुरू झाली.

     काही व्यवसायांत त्यांनी पाय रोवायचा प्रयत्न केला; पण अपयश आले, तसे ते उद्योग त्यांनी बंद केले. विमान व्यवसाय त्यांना जमला नाही. तसेच त्यांनी हॉलीवुडला भेट दिली, तेव्हा त्यांना भारतात सिनेस्टुडिओ उभा करायचा होता. व्ही. शांताराम यांच्याशी त्यांची बोलणी झाली; पण प्रत्यक्षात हा प्रकल्प झाला नाही. काही प्रकल्प त्यांनी सुरू केले आणि पुढे वालचंद उद्योग समूहाने ते यशस्वी केले. रावळगाव येथील चॉकलेट निर्मिती, सातारा येथील कूपर इंजिनिअरिंग, कळंब येथील साखर कारखाना, अ‍ॅक्मे मॅन्युफॅक्चरिंग हे ते उद्योग होत. पुण्याजवळ वालचंदनगर येथे त्यांनी उद्योगासाठी लागणाऱ्या यंत्रांची निर्मिती सुरू करायची मुहूर्तमेढ रोवली.

     साखर कारखान्यासाठी लागणारी यंत्रे तिथे निर्माण होऊ लागली. या सुमारास त्यांची प्रकृती बिघडू लागली. १९४९ साली अर्धांगवायूचा झटका आला अन् १९५० साली ते स्वेच्छेने निवृत्त झाले. त्यांना मुलगा नव्हता. पत्नी कस्तुरीबाई व मुलगी कुसुम असे त्यांचे कुटुंबिय होते. मुलीचे एका धनाढ्य कुटुंबात लग्न झाले. पुढे बंधू लालचंद, गुलाबचंद अन रतनचंद यांनी वालचंद हिराचंद उद्योगसमूहाची भरभराट केली.

     वालचंद यांची भारतीय उद्योगाच्या भविष्याबद्दल दृष्टी अजोड होती. काहींनी त्यांना स्वप्ने पाहणारा, चालायला यायच्याआधी धावणारा अशी संभावना केली; पण ते डगमगले नाहीत. त्यांना कुटुंबाकडून आर्थिक पाठबळ नव्हते, तेव्हा त्यांनी जनतेकडून पैसे गोळा करून उद्योग उभे केले. ते माणसे अगदी पारखून निवडत असत आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकून काम करून घेत. एखाद्या व्यवसायातील तांत्रिक माहितीची कमतरता असली तरी त्यांची ऊर्जा, धाडस, योजना आखायचे कौशल्य आणि दूरदृष्टी अजोड होती. सचोटी, दर्जा, प्रामाणिकपणा यांमध्ये तडजोड कधीही न केल्याने, त्यांना प्रसारमाध्यमांचा आणि जनतेचा नेहमीच पाठिंबा मिळाला. अगदी थोडा भाग असला तरी विश्वासाने व्यवसायाच्या नेतेपदी त्यांना निवडण्यात येई. ब्रिटिश अधिकाऱ्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. भारत देशावरील त्यांचे प्रेम, निष्ठा वादातीत होती. स्वातंत्र्य चळवळीला त्यांचा सक्रिय पाठिंबा होता. त्यांच्या प्रकल्पांची उद्घाटने स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नेत्यांकडून होत असत. ब्रिटिश राज्यकर्ते व भारतीय जनता यांच्याशी मैत्रीचा तोल त्यांनी सतत सावरला. ‘मार्शल लॉ’ या सोलापूर येथील गाजलेल्या खटल्यातील आरोपी मल्ल्याप्पा धनदोही, श्रीकिशन सारडा, जगन्नाथ शिंदे, अब्दुल हुसेन यांना सोडवण्यासाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केले. गोलमेज परिषदेपर्यंत हा प्रश्‍न नेला; पण यश आले नाही.

     वक्तशीरपणा आणि कामाचा प्रचंड उरक हे त्यांचे गुण सरकार आणि जनतेला विश्वासार्ह वाटत म्हणून त्यांच्या यशस्वी आणि अयशस्वी प्रयत्नांना जनतेने नेहमीच सहकार्य केले. संपूर्ण शाकाहारी असलेले वालचंद यांची राहणी, वेषभूषा अतिशय साधी होती. सेवकांवर अवलंबून राहणे ही त्यांना गुलामगिरी वाटत असे. अनेक गमतीदार किस्से त्यांच्या संग्रही असल्याने आणि ते खुलवून सांगायची हातोटी असल्याने, त्यांच्याभोवतीचे वातावरण नेहमी हास्यपूर्ण, उत्साही असे.

     देशाची आर्थिक गुलामगिरी संपावी अन् प्रगती व्हावी ही आकांक्षा त्यांच्या प्रत्येक कृतीतून प्रतिबिंबित होत असे. त्यांनी सामाजिक कार्यांना उदारहस्ते मदत आणि दानधर्म केला. निवृत्तीनंतर त्यांनी पत्नीसह धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. गुजरातमधील सिद्धपूर क्षेत्री ८ एप्रिल, १९५३ रोजी त्यांची जीवनयात्रा समाप्त झाली.

     २३ नोव्हेंबर, २००४ रोजी त्यांची एकशे बाविसावी जयंती होती. त्यानिमित्त भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले. वडिलोपार्जित पैसा नसतानाही जनतेकडून पैसे मिळवून उद्योग उभे करणारा पहिला यशस्वी उद्योगपती, अशी वालचंद हिराचंद यांची नोंद देशाच्या औद्योगिक इतिहासात कायमची राहील.

प्रा. माधुरी शानभाग

दोशी, वालचंद हिराचंद