Skip to main content
x

गोखले, अरविंद विष्णू

 

रविंद गोखले हे आधुनिक मराठी कथासृष्टीतील प्रस्थापित नाव आहे. सतत पन्नास वर्षे एका अव्यभिचारी निष्ठेने गोखल्यांनी कथालेखन केले. एकान्तिक तपस्व्याच्या मनोभूमिकेतून अनन्यपणे असे कथालेखन करणारा त्यांच्यासारखा लेखक विरळा! या तपश्चर्येतून ३५ लघुकथा संग्रह, ५ लघुतम कथा संग्रह, ६ दीर्घकथा संग्रह, १० ललित लेखसंग्रह इतकी विपुल साहित्य निर्मिती त्यांनी केली. या निर्मितीमागे एक विशिष्ट व वैशिष्ट्यपूर्ण कथादृष्टी असल्याचा प्रत्यय येतो. कथेच्या क्षेत्रात विविध प्रयोग करत असतानाही आपल्या कथेची कांती सतत सतेज ठेवण्याचा व तिला विविध परिमाणांनी समृद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या असाधारण प्रयत्नांमुळे समग्र मराठी कथासृष्टीवर त्यांची प्रसन्न मुद्रा उमटली आहे.

गोखले घराणे मूळचे कोकणातल्या चिपळूणजवळच्या बल्लाळेश्वर गावचे. त्यांचे वडील विष्णू नारायण गोखले हे लंडन विद्यापीठाचे पीएच.डी होते तर आई सुमती ही रविकिरण मंडळातील श्री.बा.रानडे सुप्रसिद्ध कवीची बहीण! अशा उच्च विद्याविभूषित दाम्पत्याच्या पोटी अरविंद गोखले यांचा जन्म इस्लामपूरला आजोळी झाला. मातुल घराण्यातून प्राप्त झालेली वंशदत्त सर्जनशील वाङ्मयीन परंपरा आणि गोखल्यांच्या घरातील सुधारक व सुसंपन्न वातावरण यांमुळे गोखल्यांचा वाङ्मयीन पिंड घडला. अर्थात गोखल्यांच्या वडिलांना त्यांनी वाङ्मयात रमावे हे रुचणारे नव्हते. मुलाने डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे ही त्यांची इच्छा! पण वैद्यकीय महाविद्यालयमध्ये प्रवेश न मिळाल्याने ते बी.एस्सी. झाले. बी.एस्सी.ला विद्यापीठात प्रथम श्रेणीत प्रथम येऊन त्यांनी सुवर्ण पदक पटकावले. नंतर दिल्लीच्या इंपिरिअल अ‍ॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये सायटो जेनेटिक्स व प्लान्ट ब्रीडिंगवर त्यांनी संशोधन केले. या काळात अरुणा असफअल्ली ह्यांच्या प्रेरणेने त्यांनी एक गुप्त रोडिओ स्टेशन चालवून स्वातंत्र्याच्या चळवळीत आपला सहभाग नोंदवला. १९४३ मध्ये पुण्याच्या शेतकी महाविद्यालयात ते रुजू झाले. १९५७-५८ मध्ये उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. १९६३ मध्ये सरकारी नोकरी सोडून ते मुंबईला खासगी आस्थापनेत रुजू झाले.

अगदी बालवयात गोखल्यांनी कथालेखनाला सुरुवात केली. शाळेच्या हस्तलिखितात व सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या वार्षिकात त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या. दिल्लीला शिक्षणासाठी असतानाही त्यांच्या ७-८ कथा प्रकाशित झाल्या. १९४५ मध्ये सत्यकथेच्या कथा विशेषांकात त्यांची ‘कोकराची कथा’ नावाची कथा प्रकाशित झाली. पूर्वापार चालत आलेले कथेचे साचे मोडीत काढत, आशय आणि अभिव्यक्ती ह्यांच्या पूर्णतः नवीन वाटा या कथेत गोखल्यांना गवसल्या; व आघाडीचे नवकथाकार म्हणून त्यांना मान्यता मिळाली. एखाद्या पात्राच्या मनात शिरून तेथील आंदोलने टिपत योग्य प्रतिमांचा वापर करून गोखले कथा लिहू लागले. एका पात्राच्या दृष्टीकोनातून कथेचे निवेदन करणे हा कथालेखनाचा प्रकार रुजविण्याचे श्रेय फार मोठ्या प्रमाणात गोखल्यांचेच आहे. त्यांचे समकालीन नवकथाकार गंगाधर गाडगीळ, पु.भा.भावे आणि व्यंकटेश माडगूळकर ह्यांच्या कथांपेक्षा त्यांची कथा वेगळी आहे.

आपल्या वासनांना पवित्र मानत जपू पाहणारी, पर्यायाने माणसातील पशुत्व नाकारू पाहणारी ‘मंजुळा’ ही कथा त्या काळात खूपच गाजली. नवनिर्मितीसाठी आसुसलेला, स्वतःसारखी एक मुलगी हवी असलेला पण त्यासाठी ‘वासनांचे वाफे’ बांधायची तयारी नसणारा एक ‘नर’ त्यांनी कथांकित केला व स्त्री-पुरुष संबंधांच्या एका वेगळ्याच पैलूचे दर्शन वाचकांना घडविले. एका दीड खणी खोलीत राहणार्‍या ७-८ माणसांमधील - त्यांच्या ताण-तणावांचे चित्रण एका ‘आरामखुर्ची’च्या माध्यमातून करत त्यांनी कथालेखनाला एक नवा आयाम दिला. तारुण्यातील प्रेमभावनेचे पार्थिव व अपार्थिव स्वरूप स्पष्ट करणार्‍या ‘कमळण’, ‘गिलावा’, ‘मिथिला’, ‘डाग’, ‘अधर्म’, ‘उमा’ या त्यांचे प्रेमविषयक तत्त्वज्ञान स्पष्ट करणार्‍या काही कथा. ‘विघ्नहर्ता’ या त्यांच्या गाजलेल्या कथेत त्यांनी एका चमत्कृतीपूर्ण अनुभवास कथारूप दिले आहे.

गोखल्यांची प्रतिभा सतत नाविन्याच्या शोधात असे. कथालेखनच करायचे हे ठरवून त्यांनी कथा लिहिल्या. परंतु त्यात विविध प्रयोगही केले. लघुतम कथा, दीर्घकथा हे कथेच्या आकारावरून पडलेले प्रकार. साखळी कथा हा तीच पात्रे पुन्हा पुन्हा घेऊन लिहिलेल्या सहा कथांचा संग्रह ‘उजेडाचं वेड’ नावाने प्रसिद्ध झाला. एकाच अनुभवाच्या दोन बाजू दाखवणार्‍या जुळ्या कथांचा संग्रह ‘जोडाक्षर’ तर एकाच अनुभवाच्या तीन बाजू दाखविणारा ‘त्रिधा’ आणि शेवटी ‘कथाष्टक’. त्यांच्या ‘त्रेपन्न पत्ते’ या कथा संग्रहात एकाच अनुभवावर लिहिलेल्या ५ ते ७ लघुतम कथा एकत्र आहेत.

१९५० ते १९५७ हा कालावधी गोखल्यांच्या कथा लेखनाच्या दृष्टीने अत्यंत बहराचा होता. १९५७-५८ला ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले होते. त्यांनी विस्कॉन्सिन विद्यापीठातून एम.एस्.सी. पदवी घेतली. १९५९ ला भारतात परतल्यावर त्यांनी नव्या जोमाने कथालेखनाला सुरुवात केली. त्या काळातच त्यांनी लघुतम कथा लिहिल्या. त्यांच्या जोडीलाच लघुकथाही लिहिल्या. १९७५ मध्ये गोखले दीर्घकथा लेखनाकडे वळले. त्यांनी या वेळी पंधरा दीर्घकथा लिहिल्या. अनुभवाची एकापेक्षा जास्त केंद्रे, अनुभवातील व्यामिश्रता, काळाचा अवकाश, कथानकाचा विस्तार हे घटक लक्षात घेतले, तर यांतील अनेक दीर्घकथा या कथा नसून लघुकादंबर्‍या आहेत, हे सहज लक्षात येते. परंतु कथा या वाङ्मय प्रकारावरील आपली अव्यभिचारी निष्ठा प्रकट करण्यासाठी गोखले त्यांना दीर्घकथाच म्हणत.

माणसा-माणसांतील संबंधांच्या अनेक परींचा शोध गोखले या दीर्घकथांमधून घेतात. जीवनाबद्दल व वेगवेगळ्या माणसांबद्दल त्यांना प्रचंड कुतूहल होते. व्यक्तिमनातील सूक्ष्म ताणतणाव ते बारकाईने टिपतात. विषयातील विविधता हा गोखल्यांचा विशेष या कथांमध्येही जाणवतो.

गोखले यांना प्राप्त झालेले महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार-

१) आशियाई, आफ्रिकी, अरबी कथा स्पर्धा एन्काउंटर मासिक, लंडन- प्रथम पारितोषिक, ‘गंधवार्ता’ या कथेला १९६०.

२) केंद्र सरकार सांस्कृतिक मंत्रालय - एमिरेटस फेलोशीप १९८४ ते १९८६

३) महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद - सुदीर्घ वाङ्मय सेवेबद्दल विशेष पुरस्कार १९९१.

२४ ऑक्टोबर १९९२ मध्ये एका छोट्याशा अपघाताचे निमित्त होऊन त्यांचे पुणे येथे निधन झाले.

- डॉ.छाया नाईक

संदर्भ :
१.डॉ.नाईक, छाया; ‘अरविंद गोखले यांच्या कथा वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास’, नागपूर विद्यापीठाला पी.एच.डी.साठी सादर करण्यात आलेला प्रबंध, १९९३. , २.डॉ.नाईक, छाया; ‘एकान्ताचा अंतर्नाद’, विकेता प्रकाशन, नागपूर १९९९.

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].