Skip to main content
x

गवाणकर, वसंत देवराव

             संत देवराव गवाणकर यांचा जन्म वसई येथे झाला. शालेय शिक्षण गिरगाव-दादरमधून पूर्ण केल्यावर त्यांनी सिडन्हॅम महाविद्यालयामधून मुंबई विद्यापीठाची बी.कॉम. पदवी घेतली. एक वर्ष राज्य-सरकारची नोकरी केल्यावर ते मुंबईत रिझर्व्ह बँकेत नोकरीला लागले. ते १९८५ मध्ये निवृत्त झाले.

             कोणत्याही संस्थेमधून चित्रकलेचे शास्त्रोक्त शिक्षण न घेता त्यांना व्यंगचित्रकलेकडे वळावेसे वाटले ते त्यांच्यातील विनोदबुद्धीमुळे. प्रत्यक्षात बाह्यत: गंभीर वाटणारे व्यक्तिमत्त्व असणाऱ्या; पण तल्लख विनोदबुद्धीची उपजत देणगी लाभलेल्या गवाणकरांनी जवळजवळ पन्नास वर्षे सातत्याने हास्यचित्रनिर्मिती केली, ती आजूबाजूच्या प्रसंगांमधील विसंगती अचूक हेरण्याच्या व सर्वसाधारणपणे अपवादाने आढळणाऱ्या , त्यांच्यामधील मार्मिक निरीक्षणशक्तीमुळेच.

             गवाणकरांचे पहिले हास्यचित्र १९५१ मध्ये ‘शंकर्स वीकली’ या इंग्रजी साप्ताहिकामधून प्रसिद्ध झाले. त्यानंतर काही काळ ‘कॅरॅव्हान’ या इंग्रजी नियतकालिकात त्यांनी चित्रे दिली. रिझर्व्ह बँकेच्या ‘विदाउट रिझर्व्ह’ या हाउस मॅगझिनमध्येही ते चित्रे देत; परंतु त्यांची महत्त्वाची आणि लक्षणीय कामगिरी झाली ती मराठी हास्यचित्रांच्या क्षेत्रात. ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘दीपावली’, ‘आवाज’, ‘दीपलक्ष्मी’ यांसारख्या प्रस्थापित आणि प्रतिष्ठित नियतकालिकांपासून ते ‘आकाशकंदील’, ‘जादूगार’, ‘ग्रहांकित’ यांसारख्या सामान्य वाचकांना फारशा परिचित नसलेल्या नियतकालिकांतून त्यांची हास्यचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. शिवाय ‘टॉनिक’, ‘ढिशाँव ढिशाँव’ या मुलांसाठीच्या मासिकांतून, गुजराती ‘चक्रम’ साप्ताहिकातून आणि ‘बेळगाव समाचार’, ‘गावकरी’ या वृत्तपत्रांतूनही त्यांची हास्यचित्रे प्रसिद्ध झाली. एकूण ३० वेगवेगळ्या प्रकाशनांमधून प्रसिद्ध झालेल्या गवाणकरांच्या हास्यचित्रांची संख्या पाच हजारांहून अधिक भरेल.

             एवढे विपुल काम करूनही त्यांच्या हास्यचित्रांमधील गुणवत्ता सुरुवातीच्या चित्रांपासून अखेरपर्यंत टिकून राहिली. सर्वसामान्य माणसांच्याच परिचयाचा प्रसंग, त्यामधील गमतीदार विसंगती किंवा कल्पकतेने सूचित केलेली विसंगतीची शक्यता ते आपल्या हास्यचित्रांतून सादर करतात, तेव्हा वाचकाला हास्यचित्रामधला विनोद चटकन कळतो. अनेक वेळा आपल्यालासुद्धा असे सुचले असते असे वाटावे इतकी ती कल्पना सहजसोपी असते आणि तत्काळ दाद मिळवून जाते. विशेष गोष्ट अशी, की भाषांतरातसुद्धा त्यांच्या चित्राची ही खासियत नाहीशी होत नाही. त्यामुळे परभाषिकां-कडूनही गवाणकरांना तशीच पसंती मिळून जाते.

             पांढरपेशा जगातील मध्यमवर्गीय, नोकरदार, संसारी पात्रे व त्यांचे प्रश्न, त्यांकडे पाहण्याची त्यांची वृत्ती; सोडवणूक करण्याचे मार्ग; तोंडाळ, कजाग, लठ्ठ बायको; तिचे स्वयंपाकातील (अ)कौशल्य; पुुरुषांचे परस्त्रीबद्दलचे दिवास्वप्न; ऑफिसमधील साहेबावरचा राग इ. इ. विषय गवाणकरांच्या चित्रांमधून भेटत राहतात. काही पात्रे गवाणकरांच्या विशेष आवडीची आहेत. उदाहरणार्थ, पोलीस खात्यामधील कर्मचारी,  साधा शिपाई गडी, सखाराम; उंच, लांबटांग्या माणूस, इत्यादी. सामान्यत: कौटुंबिक प्रसंगांवर आधारलेली त्यांची चित्रे बहुसंख्य असली तरी काही चित्रांतून, विशेषत: गवाणकरांनी निवृत्तीनंतर काढलेल्या चित्रांमधून सिमेंटमधील भ्रष्टाचार, दहशतवाद, घराणेशाही, विमान अपहरण, अतिश्रीमंत मंत्री-नेत्याकडील किंवा व्यापाऱ्याकडील  अफाट खर्चिक विवाह-समारंभ... अशा काही तत्कालीन घटनांवर आधारलेले विषयही आढळतात.

             व्यंगचित्रकलेएवढाच त्यांना छायाचित्रणासारख्या कलाप्रकारांत तसेच टेनिस आणि बॅडमिंटन या खेळांतही रस होता. बॅडमिंटनमध्ये त्यांनी बरीच पारितोषिकेही  मिळवली  होती.  एका  वाद्यवृंदामध्ये भाग घेऊन त्यांनी काही वर्षे मँडोलिन हे वाद्यही वाजवले होते. त्यांच्या विपुल हास्यचित्र-निर्मितीचे रहस्य त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वात कदाचित शोधता येईल.

             एकाच जाडीची, फार जोर न देता काढलेली रेषा ते आपल्या हास्यचित्रातून वापरत. चित्रात आवश्यक ते तपशील घेऊन चित्राची रचना ते अशा प्रकारे करत, की इच्छित आशय व्यक्त व्हावा. रेषेच्या अथवा चित्रांच्या सौंदर्यापेक्षा अचूक आशय व्यक्त करण्यावर त्यांचा भर असे. आशयानुरूप पात्रांची शरीरयष्टी, हावभाव, हातवारे यांची विचारपूर्वक योजना करणे त्यांनी अधिक महत्त्वाचे मानले.

             बऱ्याचदा त्यांचे विनोद हे आजूबाजूच्या घटना-प्रसंगांवरून सुचलेले असल्यामुळे आणि पात्रांच्या दृश्यरूपाबद्दल जाणीवपूर्वक विचार केलेला असल्यामुळे त्यांची चित्रे एकसारखी साच्यातील होत नसत, पात्रेही तशी होत नसत. पोलीस, डॉक्टर, गृहिणी किंवा दुसरे कोणतेही पात्र त्या-त्या चित्राच्या मागणीनुसार वेगवेगळे रेखाटले जाई. त्यात साचेबद्धता नसे.

             गवाणकरांच्या आयुष्यभरातील विपुल चित्रनिर्मितीमधून ‘हास्यधारा’ हा हास्यचित्रसंग्रह,  ‘खट्याळ’ हा लहान मुलांच्या खोड्यांवर आधारलेल्या हास्यचित्रांचा संग्रह आणि ‘हॅपी मोमेंट्स विथ कार्टून्स’  हा इंडिया बुक हाउसने प्रकाशित केलेला इंग्रजीतील हास्यचित्रांचा संग्रह, हे संग्रह प्रकाशित झाले.

- वसंत सरवटे

गवाणकर, वसंत देवराव