Skip to main content
x

आंबेडकर, भीमराव रामजी

बाबासाहेब आंबेडकर

     सामाजिक परिवर्तनाचे उद्गाते, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतातील बौद्धधर्माचे पुनरुज्जीवनकार अशा कर्तृत्वशाली भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म मध्यभारतातील महू येथे झाला. तीव्र बुद्धिमत्ता, तिला उच्च शिक्षणाची जोड, कठोर प्रयत्नवाद, संघर्षाची तयारी आणि समताप्रस्थापनेची तळमळ यांमुळे हे शक्य झाले. त्यांनी केलेल्या समाजपरिवर्तक चळवळींना विस्तृत आणि सखोल विद्याव्यासंगाचा आधार होता. याचाच भाग म्हणून त्यांनी प्राच्यविद्येच्या क्षेत्रात केलेले संशोधनाधारित लिखाण हे गतानुगतिक समाजाच्या डोळ्यांत अंजन घालणारे आणि विद्वानांनाही विचार करायला लावणारे आहे. प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास मुख्यतः ३ विषयांभोवती केंद्रित झालेला दिसतो - जातिव्यवस्था, हिंदुधर्म, बौद्धधर्म.

       कोलंबिया विद्यापीठात १९१० साली झालेल्या एका मानवशास्त्रविषयक चर्चासत्रात त्यांनी ‘भारतातील जाती - त्यांची यंत्रणा, उगम आणि विकास’ हा निबंध सादर केला. त्यात जातीव्यवस्थेची कारणमीमांसा त्यांनी एंडोगॅमीच्या म्हणजे गटांतर्गत विवाहप्रथेच्या संदर्भात केली. तसेच सतीप्रथा, बालविवाह यांसारख्या प्रथांचे मूळ याच प्रथेत असल्याची मांडणी त्यांनी केली.

      पुढे १९३६ मध्ये जातपाततोडक मंडळाच्या परिषदेपुढे सादर करण्यासाठी लिहिलेल्या भाषणात त्यांनी जातिव्यवस्थेची बुद्धिनिष्ठ चिकित्सा केली. धर्मशास्त्रावरील श्रद्धेच्या आधारे कशा प्रकारे जातीव्यवस्था टिकवून ठेवली गेली आहे त्याचे त्यांनी विवेचन केले, तसेच जाती निर्मूलनाच्या मार्गाचेही मूलगामी विवेचन केले.

    एकूण जातिव्यवस्थेच्या अभ्यासाच्या जोडीला त्यांनी शूद्र आणि अतिशूद्र (अस्पृश्य) जातींच्या उगमाचा व त्यांना समाजात दिल्या गेलेल्या स्थानाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला. या अभ्यासाच्या आधारे त्यांनी, ‘शूद्र कोण होते?’ आणि ‘अस्पृश्य कोण होते आणि ते अस्पृश्य का झाले’, अशी दोन पुस्तके लिहिली. त्यात त्यांनी दावा केला, की शूद्रांना एके काळी भारतीय-आर्य-समाजात क्षत्रियवर्णाचा दर्जा होता; पण ब्राह्मण-क्षत्रिय संघर्षाचा परिणाम म्हणून ब्राह्मणांनी काही क्षत्रियांवर उपनयनसंस्कार करण्यास नकार दिला. त्यातून चवथ्या वर्णाची उत्पत्ती झाली. अस्पृश्यतेचे मूळ बौद्ध संस्कृती व ब्राह्मणी संस्कृती यांच्यातील संघर्षात असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

       डॉ. आंबेडकर यांनी हिंदुधर्माची चिकित्सा वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, अस्पृश्यता या प्रांच्या अंगाने तर केलीच, पण त्या निमित्ताने त्यांनी हिंदुधर्माच्या आधारग्रंथांचे चिकित्सक वाचन केले. हे करत असताना त्यांना अनेक कोडी पडली. ही कोडी म्हणजे या स्रोतग्रंथांतील आंतरिक विसंगतींचा, शंकास्पद गृहीतकांचा शोध होता. या शोधांची मांडणी त्यांनी ‘रिडल्स इन हिंदुइझम’ या पुस्तकातून, तसेच ‘द रिडल ऑफ राम अ‍ॅण्ड कृष्ण’ या निबंधातून केली. त्यातून डॉ. आंबेडकर यांनी वेद, वेदान्त, स्मार्तधर्म व तांत्रिक धर्म, चातुर्वर्ण्य, कलिवर्ज, ब्रह्मवाद, तसेच रामायण व महाभारतातून दिसणारी अनुक्रमे राम व कृष्ण यांची व्यक्तिरेखा या संदर्भात अनेक चिकीत्सक प्रश्न उपस्थित केले. हिंदूंनी आपल्या परंपरेकडे अधिक डोळसपणे पाहावे व विवेकवादाचा अंगीकार करावा, असा त्यांचा, त्यामागील दृष्टिकोन दिसतो.

     भारताच्या सांस्कृतिक इतिहासात वैदिक परंपरेचा बौद्ध संस्कृतीशी झालेला संघर्ष व बौद्ध संस्कृतीचे क्रांतिकारी योगदान यांचीही चर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुख्यत्वे, ‘रेव्होल्यूशन अ‍ॅण्ड काउण्टर रेव्होल्यूशन’ या ग्रंथातून केली.

     १९५६ साली डॉ.आंबेडकर यांनी स्वतः बौद्धधर्म स्वीकारला व आपल्या लाखो अनुयायांना बौद्धधर्माची दीक्षा दिली. अर्थात, बौद्धधर्माला ‘रिलिजन’ या अर्थाने ‘धर्म’ न म्हणता, ‘धम्म’ म्हणणे त्यांनी पसंत केले. हे धर्मांतर करण्यापूर्वी, आपण ज्या बौद्धधम्मात प्रवेश करणार आहोत, त्याचे नेमके स्वरूप स्पष्ट करण्याची त्यांना गरज वाटली. त्या गरजेतून ‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ची त्यांनी रचना केली. या ग्रंथाची धाटणी एखाद्या धर्मग्रंथासारखी होती. पण तो एक प्रचंड व्यासंग करून लिहिलेला, संशोधनाधारित ग्रंथ होता. या दृष्टिकोनातून या ग्रंथाकडेही आंबेडकर यांच्या प्राच्यविद्येतील कामगिरीचा भाग म्हणून पाहिले पाहिजे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी पारंपरिक बौद्ध धर्माच्या संंदर्भात काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले व ग्रंथातील प्रतिपादनाद्वारे या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. अशा रीतीने वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, हिंदुधर्म व बौद्धधर्म या संदर्भांत मूलभूत प्रश्नांना हात घालणारे संशोधन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्राच्यविद्येच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण योगदान होय.

डॉ. प्रदीप गोखले

आंबेडकर, भीमराव रामजी