आपटे, दत्तात्रय विष्णू
इतिहासाचार्य राजवाड्यांनी स्थापन केलेल्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे वटवृक्षात रूपांतर करण्यात ज्या कर्तबगार व्यक्तींचा हातभार लागला, त्यांत दत्तोपंत आपट्यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. अनेक संशोधकांना एखाद्या कामात एकत्र आणून ते काम तडीला नेण्याची दत्तोपंतांची हातोटी ‘शिवाजी निबंधावली’, ‘शिवचरित्र निबंधावली’, ‘शिवचरित्रप्रदीप’ यांसारख्या त्यांनी संपादित केलेल्या लेखसंग्रहांवरून दिसून येते. कामात सर्वांच्या पुढे आणि मानमरातबाच्या वेळी सर्वांच्या मागे या त्यांच्या स्वभावामुळे एककल्ली संशोधकही त्यांना वश होत. अनेक वर्षे मंडळाच्या कारभाराची सूत्रे अप्रत्यक्षपणे त्यांच्या हातात होती. पण त्यांचे चित्र मंडळात लावण्याचा त्यांच्या चाहत्यांचा बेत त्यांनी स्वत:च्या हयातीत यशस्वी होऊ दिला नाही १८९७ मध्ये ते मॅट्रिक झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात आणि पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात झाले. गणित हा ऐच्छिक विषय घेऊन ते १९०२ मध्ये फर्गसन महाविद्यालयातून बी.ए. झाले.
इंग्रज सरकारची नोकरी करायची नाही असा त्यांनी निश्चय केला होता. बी.ए. झाल्यावर ते यवतमाळ येथे एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करू लागले. तिथे ते तपस्वी बाबासाहेब परांजपे यांच्या संपर्कात आले आणि बाबासाहेबांनी त्यांना सार्वजनिक कामाची गोडी लावली. बंगालच्या फाळणीला विरोध करण्याकरिता सुरू झालेल्या चळवळीत यवतमाळ येथे जी राष्ट्रीय शाळा सुरू झाली, तिचे ते तीन वर्षे मुख्याध्यापक होते. पुढे १९०९ मध्ये मुंबईला येऊन त्यांनी तिथल्या ‘राष्ट्रमत’ नावाच्या दैनिकाचे संपादक म्हणून सहा महिने काम केले. त्यानंतर ते गोव्याला गेले आणि तिथे चार वर्षे त्यांनी एक शिक्षणसंस्था चालविली.
दत्तोपंत गोव्याला असताना कागदपत्रांच्या संशोधनासाठी चाललेल्या त्यांच्या भ्रमंतीत राजवाडे तिकडे गेले होते. तिथेच दत्तोपंतांची व त्यांची गाठ पडली आणि त्यांनी दत्तोपंतांना इतिहास संशोधनाची दीक्षा दिली. राजवाड्यांबरोबर दत्तोपंत रत्नागिरी जिल्ह्यात हिंडले आणि जुनी मोडी कागदपत्रे, पोथ्या, ताम्रपट व शिलालेख वाचण्यात प्रवीण झाले.
बहुधा राजवाड्यांच्या प्रभावामुळेच दत्तोपंत १९१५ मध्ये गोव्याहून पुण्याला आले. तेव्हापासून त्यांचा भारत इतिहास संशोधक मंडळाशी जो संबंध जडला, तो कायमचाच. पुण्याला ‘चिन्मय जगत्’चे ते सात वर्षे संपादक होते. संस्कृत भाषेतील ग्रंथांचा संग्रह करून त्यांचे प्रकाशन करणे अशा उद्देशाने स्थापन झालेल्या आनंदाश्रमाचे जानेवारी १९२४ पासून आयुष्याच्या अखेरीपर्यंत दत्तोपंत व्यवस्थापक होते. ते तिथेच राहत असत.
गणित, संस्कृत आणि इतिहास या तीनही विषयांमध्ये दत्तोपंतांना गती होती. ‘लीलावती’, ‘ग्रहगणित’, ‘गोलाध्याय’ या भास्कराचार्यांच्या ग्रंथांच्या आनंदाश्रमाने प्रकाशित केलेल्या आवृत्तींच्या मुद्रणप्रती दत्तोपंतांच्या देखरेखीखालीच तयार झाल्या. शिवाजी महाराजांच्या आश्रयाला असलेल्या कृष्ण ज्योतिषी या पंडिताने ‘करणकौस्तुभ’ हा ग्रहगणितावरील ग्रंथ शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून लिहिला. आनंदाश्रमाने त्या ग्रंथाची जी छापील आवृत्ती १९२७ मध्ये प्रकाशित केली, ती दत्तोपंतांनीच संपादित केलेली आहे.
पुण्याला आल्यापासूनच दत्तोपंत भारत इतिहास संशोधक मंडळाच्या कार्यात भाग घेत होतेच. १९२४ पासून १९३८ पर्यंत ते मंडळाच्या कारभारी मंडळाचे सदस्य होते आणि १९३८ पासून १९४१ पर्यंत मंडळाचे उपाध्यक्ष होते. पण त्यांचे काम पदांपुरते मर्यादित नव्हते. शिवचरित्राची साधने संशोधून ती प्रकाशित करण्याच्या कामाला मंडळाने सुरुवातीपासूनच प्राधान्य दिले होते. त्याकरिता मंडळाने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या सहकार्याने शिवचरित्र कार्यालय नावाची वेगळी संस्थाच स्थापन केली होती. दत्तात्रेय आपटे हे त्या कार्यालयाचे एक चिटणीस आणि मोठे आधारस्तंभ होते.
दत्तोपंतांची स्वतंत्र अशी ग्रंथरचना कमी आहे; पण ‘दोस्तांची श्रीरंगपट्टणमवर मोहीम’ अथवा ‘सव्वाशे वर्षांपूर्वीचा दक्षिण हिंदुस्थान’ हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या व्यासंगाची कल्पना येण्यास पुरेसा आहे. त्यांच्या विद्वत्तेची अधिक चांगली कल्पना विविध नियतकालिकांमधील आणि लेखसंग्रहांमधील त्यांच्या लेखांमधून येते. ‘शिवाजी महाराजांची खरी जन्मतिथी’ हा शिवचरित्रप्रदीप या ग्रंथातील त्यांचा लेख त्यांच्या उत्कृष्ट लेखांपैकी एक आहे. त्यांच्या अशा काही निवडक लेखांचा संग्रह त्यांच्या निधनानंतर दत्तोपंत आपटे स्मारक मंडळाने ‘दत्तोपंत आपटे लेखसंग्रह’ अशा नावाने प्रकाशित केला आहे. खाजगी कागदपत्रांमध्ये आलेले ओझरते उल्लेख देखील राजकीय घडामोडींची सुसंगत हकिकत देण्यास कसे उपयोगी पडतात हे ज्यांना पाहावयाचे असेल, त्यांनी शिवचरित्र साहित्य, खंड १ या ग्रंथाला जोडलेली त्यांची लहानशीच, पण मार्मिक प्रस्तावना अवश्य वाचावी.
असा हा प्रखर राष्ट्राभिमानी, प्रसिद्धी पराङ्गमुख, समतोल विचारांचा विद्वान इतिहास संशोधक पुण्याच्या आनंदाश्रमात निधन पावला.