Skip to main content
x

आरोळकर, शरच्चंद्र आत्माराम

शरच्चंद्र आत्माराम आरोळकर यांचा जन्म कराचीमध्ये झाला. बालपणी घरात संगीताला पोषक वातावरण नव्हते. परंतु गाण्याची ओढ असल्यामुळे कराचीतच विष्णू दिगंबर पलुस्करांचे शिष्य लक्ष्मणराव बोडस यांच्याकडे आरोळकर यांनी गायनाचे प्राथमिक धडे गिरविले. वडिलांच्या बदलीमुळे सोलापुरात आल्यावर शालेय शिक्षण चालू असतानाच त्यांनी रहिमत खाँच्या ध्वनिमुद्रिका ऐकल्या. याचा त्यांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला व या गायकीचा ध्यास घेतलेल्या त्यांनी कुवलयानंद स्वामींचा आदेश घेण्यासाठी लोणावळ्यास प्रयाण केले. स्वामींच्या आदेशानुसार ते कृष्णराव शंकर पंडित यांच्याकडे तालीम घेण्यासाठी ग्वाल्हेरला गेले.

त्यांच्याकडे शिक्षण घेत असतानाच पंडितजींचे चुलते एकनाथ पंडित यांचे गाणे ऐकण्याचा योग आरोळकरांना आला. हार्मोनिअमवर उत्तम हात असल्यामुळे त्या मैफलीत आरोळकर परवानगी घेऊन त्यांच्या साथीला बसले. त्या वेळी त्यांनी गायलेल्या ललत रागातल्या ‘मन सुमिरन’ या ख्यालाने आरोळकरांवर जबरदस्त मोहिनी पाडली व हेच ते आपल्याला अभिप्रेत असलेले गाणे याची त्यांना खात्री पटली. पुढे एकनाथजी मुंबईत खार येथे स्थायिक झाले. चरितार्थासाठी वणवण फिरून बिकट परिस्थितीत शिकवण्या करताकरता वेळ काढून आरोळकर एकनाथजींकडे शिकत असत. आरोळकरांचे आयुष्य घडण्यास हेच शिक्षण कारणीभूत झाले. शिकताना बंदिशीचे शब्द, नोटेशन, टिपण इत्यादी माहिती एखाद्या कागदाच्या कपट्यावर आरोळकर लिहून घेत. रात्री घरी परतल्यावर शिकलेल्या बंदिशींचे चिंतन, मनन व त्यावरचा रियाज असा त्यांचा  नित्यक्रम अनेक वर्षे असे. विषयाच्या शास्त्रीय अभ्यासासाठी त्यांना प्रसिद्ध संगीतज्ञ व बीनकार कृष्णराव मुळे यांच्याकडून उत्तम मार्गदर्शन मिळाले. मुळ्यांकडे त्यांनी ख्यालाव्यतिरिक्त ठुमरीचाही अभ्यास केला. बाबा दीक्षितांचे शिष्य गणपतराव आपटे व ठुमरीगायक गणपतभैय्या यांचे गुरुबंधू असल्यामुळे मुळ्यांकडे परंपरेचा वारसा चालत आलेला होता.

ख्यालाप्रमाणेच टप्पा, तराणा, ठुमरी, होरी, भजन हेही गायनप्रकार गाण्यात आरोळकर वाकबगार होते. गायला अवघड, पण ऐकायला सोपे असे त्यांचे गाणे होते. आपल्या विद्येचे आणि कलेचे त्यांनी कधी बाजारी प्रदर्शन केले नाही. आपल्या तत्त्वाशी ते अखेरपर्यंत प्रामाणिक राहिले. त्यांचे विचार मार्मिक आहेत. स्वर-धुन-राग, अक्षर-शब्द-कविता आणि मात्रा-ताल-ठेका या त्रयींचा म्हणजेच राग, कविता व ठेका यांचा एकसमन्वयाच्छेदे केलेला आविष्कार म्हणजे ‘ख्यालगायन’, हा त्यांचा सिद्धान्त होता.

अभिजात सौंदर्याचा शोध घेणे ही आरोळकरांच्या जीवनाची मुख्य प्रेरणा होती. या सौंदर्याचे अथांग स्वरूप ग्वाल्हेर गायकीच्या अगदी जवळ येते म्हणून त्यांनी ग्वाल्हेर घराण्याला श्रेष्ठ मानले. आपण घेतलेल्या शिक्षणाला स्वत:च्या विचारप्रणालीची उत्तम जोड देऊन त्यांनी श्रोत्यांना सात्त्विक आनंद दिला. यात केसरबाई केरकर, रातंजनकर, विलायत हुसेन, अंतूबुवा जोशी, मिराशीबुवा, मल्लिकार्जुन मन्सूर, सिंदे खाँ, बालगंधर्व, पु.ल. देशपांडे, शिल्पकार र.कृ.फडके अशा अनेक दिग्गजांनी आरोळकरांना उत्स्फूर्तपणे दिलेली दाद म्हणजे बुवांच्या गाण्याचे योग्य मूल्यमापनच म्हटले पाहिजे.

आरोळकरांच्या संगीतातील योगदानाबद्दल त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार, ‘तानसेन’ पुरस्कार, ‘महाराष्ट्राचा गौरव’ पुरस्कार, ‘संगीत रिसर्च अकादमी’ पुरस्कार, ‘सुरसिंगार संसद’ची फेलोशिप हे त्यांतील काही विशेष. त्यांच्याकडील अनेक बंदिशींचे ध्वनिमुद्रण संगीत रिसर्च अकादमीने, तसेच नॅशनल सेंटरनेही आपल्या संग्रहासाठी केले आहे. भोपाळच्या कला परिषदेने त्यांच्यांवर एक फिल्म तयार केली असून गोएंका फाउण्डेशननेही बुवांवर एक लघुपट तयार केला आहे. आकाशवाणी, संगीत नाटक अकादमी व संगीत रिसर्च अकादमीने त्यांच्या मुलाखती ध्वनिमुद्रित केल्या आहेत. शरद साठे, नीला भागवत हे त्यांचे प्रमुख शिष्य होत.

आरोळकर विद्याव्यासंगी, निर्व्यसनी, शिस्तप्रिय असे आदर्श गुरू होते. साधना हीच त्यांची आराधना होती. अविवाहित असल्यामुळे ‘एकला चालो रे’ हा त्यांचा जीवनप्रवास शेवटपर्यंत अव्याहतपणे चालू होता.

— शरद साठे

आरोळकर, शरच्चंद्र आत्माराम