अवचट, सुभाष त्र्यंबक
मुखपृष्ठांसारख्या उपयोजित कलेपासून सुरुवात करून अभिजात चित्रकलेच्या प्रांतात स्थिरावलेले आणि साहित्य जगताबद्दल विशेष आस्था असलेले चित्रकार सुभाष त्र्यंबक अवचट यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ओतूरला व माध्यमिक शिक्षण पुण्याच्या भावे स्कूलमध्ये झाल्यावर त्यांना फाइन आर्टला जायचे होते; पण प्रथम ते आर्किटेक्चरला गेले. नंतर त्यांनी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात अप्लाइड आर्टला प्रवेश घेतला आणि पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी उपयोजित कलेतील पदविका प्राप्त केली.
काही काळ त्यांनी तिथेच अध्यापक म्हणून काम केले व लगेचच स्वत:चा स्टूडिओ सुरू केला. त्यांचा स्टूडिओ म्हणजे एक नवनिर्मितीचे केंद्र (क्रिएटिव्ह वर्कशॉप) बनले ते अवचट करीत असलेल्या कामांमुळे. मराठी पुस्तकांची मुखपृष्ठे हा त्यांच्या त्या काळच्या कलानिर्मितीमधला महत्त्वाचा भाग होता. माहितीपट, टाइम्स ऑफ इंडिया, एचएमव्ही, तसेच अनेक जाहिरात संस्थांची कामे अवचट करीत असत. बँका, उद्योगसमूहांचे वार्षिक अहवाल, दिनदर्शिका, जाहिरात मोहिमा अशी अनेक प्रकारची कामे अवचटांनी त्या काळात केली. ‘कॅग’ वार्षिकात त्यांच्या मुखपृष्ठकलेची दखल घेतली गेली आणि त्यांना जाहिरात क्षेत्रातली प्रतिष्ठेची पारितोषिकेही मिळाली.
१९७० च्या दशकातला काळ हा महाराष्ट्रातला सांस्कृतिक परिवर्तनाचा आणि चैतन्याचा काळ होता. कविता, कथा, दलित आत्मकथने, प्रायोगिक नाटके आणि कलात्मक चित्रपटांचा तो जमाना होता. सुभाष अवचटांची यामुळे अनेक कवी, लेखकांशी मैत्री झाली. कलाकार व दिग्दर्शकांचा अवचटांच्या स्टुडिओतला राबता वाढला. त्यातून अवचटांमधल्या कलावंताला सामाजिक-सांस्कृतिक उलथापालथींचे एक सम्यक भान येत गेले.
उपयोजित कलेत अवचटांना व्यावसायिक यश मोठ्या प्रमाणात मिळाले. मुखपृष्ठ संकल्पनात तर त्यांनी मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठांना एक वेगळे वळण दिले. असे असूनही त्यांच्यातला अभिजात कलावंत आतून अस्वस्थ होता. वेळ मिळेल तेव्हा ते पेंटिंग करत होते. उपयोजित कलेत केलेले काम हे दुसर्यासाठी केलेले असते. उत्स्फूर्तता आणि कलावंताच्या आविष्कार स्वातंत्र्याला त्यामुळे मर्यादा पडतात असे अवचटांना वाटे.
उपयोजित कलेचे क्षेत्र सोडून अभिजात कलेकडे वळण्याचा निर्णायक क्षण अवचटांच्या आयुष्यात आला तो त्यांच्या अमेरिकेच्या प्रवासामुळे. त्यांनी केलेल्या उपयोजित कलेतील कामाचा ‘पोर्टफोलिओ’ अवचटांनी बरोबर नेला होता. तो एका आर्ट डीलरला त्यांनी दाखवला. त्यावर त्याने विचारले, ‘‘पण, तुमची ड्रॉइंग्ज कुठे आहेत?’’ अवचटांनी त्याच क्षणी उपयोजित कलेचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आणि ते भारतात परतले.
उपयोजित कलेचा व्यवसाय बंद केल्याने सुरुवातीला अनेक आर्थिक अडचणी आल्या. पण अवचटांनी त्यात स्वत:ला झोकून दिले. त्याबद्दल अवचट यांनी लिहिले आहे की, ‘सहजपणे फूल उमलावे तसा नवनिर्मितीचा नादब्रह्मासारखा तो आनंदी क्षण मी अनुभवला.’
मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत १९८६ मध्ये त्यांच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन झाले. भोवतालच्या सामाजिक जीवनातील स्थित्यंतरांचे, जीवनशैलीचे विषय त्यांना सापडत गेले आणि ती चित्रे आपल्या स्वतंत्र शैलीत ते रंगवत राहिले. प्रत्येक प्रदर्शनासाठी एखादा वेगळा विषय घेऊन अवचटांनी तैलरंग, जलरंग, डिजिटल प्रिंटिंग अशा विविध माध्यमांमध्ये चित्रे केली. यांमध्ये वारकरी, रेल्वे स्थानकावरचे हमाल, नट, विदूषक यांपासून ते छापखाना, परंपरा, शंकराचार्य, गणेश यांसारख्या सांस्कृतिक प्रतीकांपर्यंत त्यांनी विविध विषय हाताळले. भगवा, सोनेरी व काळा अशा रंगांना अवचटांच्या आविष्कारकलेत विशिष्ट स्थान आहे.
सुभाष अवचट यांच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वात एक लेखकही दडलेला आहे. ‘धुरकटलेली’, ‘मॅडम’, ‘स्टूडिओ’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ‘स्टूडिओ’ हा रोजनिशीच्या स्वरूपात असलेला टिपणांचा संग्रह आहे. एका कलावंताची, कला आणि जीवनविषयक कलंदर वृत्तीने केलेली ही टिपणे आहेत. ओतूर गावात गेलेले बालपण, साहित्यातील आई, वहिनी, निरांजन यांच्या भाबड्या प्रतिमा, ‘साधना’ परिवारातील समाजवादी विचार, जी.ए. कुलकर्णी, नारायण सुर्वे, ग्रेस यांचे साहित्य अशा अनेकविध संस्कारांनी आपण कसे घडत गेलो ते अवचटांनी इथे सांगितले आहे. जी.ए. कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारे ‘जी.ए. एक पोटेर्र्ट’ हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे.
अवचटांच्या कार्यक्षेत्राचे दोन भाग पडतात. उपयोजित आणि अभिजात अशा दोन्ही क्षेत्रांत त्यांनी आपल्या प्रतिभेचा स्वतंत्र ठसा उमटवलेला आहे. मराठी पुस्तकांची मांडणी आणि मुखपृष्ठांचे संकल्पन यांत दलाल-मुळगावकरांनंतर जर कोणी मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणला असेल, तर तो सुभाष अवचटांनी. दलालांप्रमाणेच अवचटांची मुखपृष्ठे तत्कालीन वाङ्मयीन अभिरुचीचा अविभाज्य भाग बनलेली आहेत. ग्रेस आणि जी.ए. कुलकर्णी मराठीतील प्रतिभावान, पण वेगळी ओळख असलेले साहित्यिक. ग्रेस यांच्या काव्यसंग्रहासाठी अवचटांनी कोमल भावविभ्रमांची तरलता टिपणार्या रंगांचा वापर केलेला आहे. याउलट जी.एं.च्या ‘काजळमाया’ संग्रहासाठी अवचटांनी काळ्या-पांढर्या रंगात जे चित्र केले आहे, ते मितभाषी, थेट अशा आदिम कलेला जवळचे आहे.
अशा प्रकारे अवचटांनी मुखपृष्ठे करताना मांडणीचे, तंत्राचे अनेक प्रयोग केले आणि दलालांच्या काळातल्या वर्णनात्मकतेऐवजी संकल्पनात्मक मांडणीला (थीमॅटिक) अधिक महत्त्व दिले. दलालांच्या काळात तत्कालीन यथार्थवादी चित्रकला आणि मुखपृष्ठे यांच्यात जसे नाते दिसते, तसेच नाते हुसेन, बेंद्रे, पळशीकर इत्यादींच्या नवचित्रकलेमध्ये आणि मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठांच्या शैलीमध्ये अवचटांनी प्रस्थापित केले. जीवनातील विरूपता, उपरोध आणि सामाजिक अभिसरण व्यक्त करणार्या नवसाहित्याला स्वतंत्र अस्तित्व असलेल्या सजावटीच्या नव्या दृश्यभाषेची गरज होती. ती अवचट यांच्यासारख्या चित्रकारांनी दिली. आज जेव्हा अवचट आपली पेंटिंग्ज पुस्तकांच्या मुखपृष्ठांसाठी वापरतात (उदा. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’चे मुखपृष्ठ), तेव्हा समकालीन अभिजात चित्रकला आणि मराठी साहित्यातले दुवे नव्याने स्पष्ट होतात.
सुभाष अवचटांनी अभिजात कलेच्या क्षेत्रातही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रांनी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांची चित्रे मानवाकृतिप्रधान (फिगरेटिव्ह) चित्रांकनाच्या पद्धतीत बसतात. माणूस, मग तो कष्टकरी असेल, वारकरी असेल, नट किंवा विदूषक असेल, त्याचे माणूसपण चित्रांच्या केंद्रस्थानी असते. रोजच्या जीवनातल्या प्रतिमा त्यांच्या चित्रांमध्ये एक वेगळे रूप घेऊन येतात. त्यांच्या चित्रांमध्ये रंगांचा केलेला वापर आणि त्यांची रंगसंगती ही वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रतीकात्मक असते. रंगभ्ाूमीवरील अभिनेता किंवा नटांवरच्या चित्रमालिकेत त्यांनी मुखवट्यांमागे दडलेला, माणसाचा खरा चेहरा शोधला आहे. प्रेमिक, खलनायक अशा वेगवेगळया मुखवट्यांमधून माणसाचे स्वभावदर्शन त्यात येते. वारकरी संप्रदाय, हिंदू परंपरेबरोबरच येशूच्या प्रतिमांमधूनही त्यांनी मानवी मूल्यांचा एक व्यापक शोध घेतला आहे. या चित्रांमध्ये ख्रिस्तजीवनावरील चित्रांची मंद रंगसंगती आणि लाकडी फळ्या, लोखंडी बार यांसारख्या रांगड्या माध्यमांतून अवचटांनी एक वेगळाच आशयपूर्ण दृश्य परिणाम साधला आहे.
सुभाष अवचट यांची चित्रे ही आकृतिप्रधान असली, त्यात कथनात्मकता असली आणि यथार्थवादी चित्रणाच्या खुणा त्यात दिसत असल्या, तरी या सगळ्या प्रवाहांपासून ती वेगळी आणि स्वतंत्रपणे घडलेली आहेत. बडोदा स्कूल प्रवाहातील चित्रकारांचे उपरोधिक समाज-वास्तव आणि अवचटांच्या चित्रांमधल्या सामाजिक चित्रणामध्ये मूलत:च फरक आहे. त्यांच्या चित्रांमधली कथनात्मकता ही कथाचित्रे, मुखपृष्ठे यांसारख्या इलस्ट्रेटिव्ह आर्टमधून आल्यासारखी वाटते. काही वेळा त्यात सुलेखनाचाही चित्रघटक म्हणून वापर केलेला आढळतो. कधीकधी त्यांच्या चित्रांच्या मांडणीमध्ये, रंगलेपनामध्ये एक प्रकारची काव्यात्मकताही आढळते.
उपयोजित, अभिजात ही वर्गवारी केवळ विश्लेषणाच्या सोयीसाठी असते. अवचटांच्या कलेमधल्या अभिजाततेच्या खुणा त्यांच्या यशस्वी मुखपृष्ठांमध्येही आढळतात हे वेगळे सांगायला नको. दलालांनी जसे सर्वसाधारण मराठी वाचकावर दृश्यकलेचे संस्कार केले, अभिरुची घडवली, त्याचप्रमाणे नंतरच्या पिढीवर अवचटांनी आधुनिक दृश्यकलेतील प्रयोगांचे संस्कार घडवले आणि नवी जाण निर्माण केली. मराठी वाचकांशी आणि साहित्याशी त्यांचे नाते कायम आहे. अवचट यांचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी व कलंदर आहे.
- दीपक घारे