Skip to main content
x

बडगेलवार, प्रभा विठ्ठल

          बी. प्रभा महाराष्ट्रातल्या मोजक्या आणि चांगल्या स्त्री चित्रकारांपैकी एक होत. त्यांचा जन्म नागपूरजवळच्या बेला या लहानशा खेडेगावातील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. प्रभा आगे यांना उपजतच चित्रकलेची आवड होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांनी नागपूर येथे कलाशिक्षण घेतले व १९५३ मध्ये चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी त्या मुंबईला आल्या.  मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यांनी आपले कलाशिक्षण १९५५ मध्ये मोठ्या कष्टाने पूर्ण केले व जी.डी.आर्ट ही पदविका प्राप्त केली. 

          सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना विठ्ठल  बडगेलवार या नवोदित शिल्पकाराशी त्यांची ओळख झाली. नंतर या ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे पुढे विवाहात रूपांतर झाले. बी.विठ्ठल हे त्यांचे गुरूही होते. बी.प्रभा यांना कलावंत म्हणून घडविण्यात बी.विठ्ठल यांचा फार मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे बी.प्रभा यांच्या चित्रशैलीवर रविशंकर रावळ, जे.जे.तील शिक्षक पळशीकर व बी. प्रभा यांचे वर्गमित्र व वीव्हर्स सर्व्हिस सेंटरमधील चित्रकार निकम यांचा सुरुवातीच्या काळात प्रभाव होता; पण पुढील काळात त्यांनी स्वत:ची शैली विकसित केली.

          बी. प्रभा यांनी १९५६ मध्ये विवाहबद्ध झाल्यावर बी. विठ्ठल यांच्या सोबत आपल्या चित्रांचे एक मोठे प्रदर्शन भरविले. त्यांच्या या प्रदर्शनाला कला रसिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. इथूनच पुढे त्यांच्या यशस्वी चित्रकारितेची सुरुवात झाली. बी. प्रभा यांची चित्रे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून अस्सलपणे आकारित झालेली दिसतात. एकाच वेळी त्यात रंगांचा तजेला, आकारांचा धारदारपणा जपलेला असतो आणि रेषेची लय सगळ्या चित्रावकाशात खेळती ठेवलेली असते. बी. प्रभा यांचे बालपण खेडेगावात गेलेले असल्याने ग्रमीण व आदिवासी जीवनाची ओढ त्यांच्या चित्रांमधून दिसून येते.

          ग्रमीण जीवनाबरोबरच सामाजिक विषयही त्यांनी हाताळले आहेत. मासे विकायला बसलेल्या कोळिणी किंवा मातीची भांडी विकायला बसलेल्या खेडूत स्त्रिया अशा कष्टकरी, कामकरी स्त्रीला त्यांनी आपल्या चित्रांतून मनापासून रंगवले आहे.

          बी.प्रभा आपल्या चित्रात पूर्णपणे वास्तववादी पद्धतीने चित्रण करत नसत, तर आकारात, रंगविलेपनात त्या आपल्याला आवडेल असा बदल करून घेत. खेड्यातील काकडीसारखी सडसडीत बांध्याची स्त्री डोळ्यांसमोर ठेवून लांब उंच मान, पातळ कंबर, लांबलचक हातपाय आणि एकूणच लांबट आकाराच्या स्त्री-प्रतिमा त्या रंगवीत असत. त्यांच्या चित्रांतले, या मानवाकृतींबरोबरचे मासे, टोपल्या, मातीची भांडी, फळे, फुले, घरे, झाडे अशा अनेक प्रकारचे तपशीलही रंग, रेषा, आकाराचे सौंदर्यशास्त्रीय भान ठेवून रंगविलेले असत. त्यामुळे चित्राची रचना सहजसुलभ आणि तरीही आकर्षक वाटत असे.

          त्यांच्या चित्रांची रंगसंगती विशेष उठून दिसेल अशी असे. बी. प्रभा चित्रात शुभ्र पांढऱ्या रंगाचा वापर फारच परिणामकारकपणे करीत असत. सावळ्या रंगाच्या खेडूत स्त्रियांचे रंगविलेपन त्या खास आपल्या ढंगदार शैलीने करीत. त्यामुळे त्यांचे चित्र विलोभनीय, आकर्षक दिसे.

          त्यांनी भारतात, तसेच परदेशांतही अनेक ठिकाणी प्रदर्शने भरविली. त्यांच्या नावावर पन्नास प्रदर्शने जमा आहेत. त्यांची चित्रे देशात, परदेशांत अनेक महत्त्वाच्या ठिकाणी संग्रहित आहेत. ‘एअर इंडिया’ने त्यांची सर्वांत जास्त चित्रे विकत घेतली आणि ती लोकप्रियही झाली. बी. प्रभा यांनी स्वत:च्या चित्ररचनांवर आधारित टेराकोटा या माध्यमातील भित्तिचित्रे पंचतारांकित हॉटेलांसाठी तयार केली.

          बी. प्रभा यांना अनेक लहानमोठी पारितोषिके मिळाली; भरपूर पैसा, प्रसिद्धी मिळाली. बी. प्रभा यांच्या मृत्यूपूर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाले होते. महाराष्ट्रातील एक स्वतंत्र शैली असलेली लोकप्रिय चित्रकर्ती म्हणून आजही कलाजगतात बी. प्रभा यांचे नाव टिकून आहे.

- ज्योत्स्ना कदम

बडगेलवार, प्रभा विठ्ठल