बढे, राजा नीलकंठ
राजा नीलकंठ बढे यांचा जन्म नागपूरला व प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे झाले. पंजाब विद्यापीठातून मॅट्रिक तसेच नागपूरच्या मॉरीस कॉलेजमधून पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले. ‘कोंडिबा’ या नावाने हलक्याफुलक्या शैलीत केलेले स्तंभलेखन खूप गाजले. ‘सकाळ’, ‘महाराष्ट्र’, ‘वागीश्वरी’ या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. राजा बढे यांचा कल मुख्यतः कवित्वाकडे झुकणारा असल्याने त्यांच्या कविता आणि गीते अवीट गोडीची, मधुर शब्दांची पेरणी असल्याने सरस ठरली. ‘माझिया माहेरा जा’ (१९४२), ‘हसले मनी चांदणे’ (१९४८), ‘क्रांतिमाला’ (१९५२), ‘मखमल’ (१९७६) इत्यादी गीतसंग्रह प्रसिद्ध आहेत. याबरोबरच ‘रायगडाचा राजबंदी’ या माहितीपटाची निर्मितीही त्यांनी केली.
राजा बढेंच्या कवीमनाची साक्ष आपल्याला प्रामुख्याने त्यांनी केलेल्या अनुवादात पटते. जयदेवांच्या ‘गीतगोविंद’ या काव्याचे ‘शृंगार श्रीरंग’ या नावाने, महाकवी बिहारी यांच्या ‘सतसई’ या हिंदी काव्याचे ‘रसलीना’ या नावाने तर सातवाहनकालीन हाल राजाने संपादित केलेल्या ‘गाथासप्तशती’चे ‘शेफालिका’ या नावाने मराठीत अनुवाद केले आहेत. सौंदर्य व लालित्य ह्यांमुळे हे अनुवाद आनंददायी ठरले आहेत, तसेच भाषांतर करताना मूळ वाङ्मयाचे सौंदर्य अबाधित ठेवले आहे. प्रतिभेच्या जोरावर त्या गाथांचे रूपांतर मनोहारी ठरले आहे.
बढे एक कुशल चित्रकारही होते. विशेषतः नखचित्रे अतिशय सुरेख काढीत. चित्राप्रमाणेच ते काव्यातही रस, गंध, स्पर्श, नादमयता कायम ठेवीत.
- संपादक मंडळ