Skip to main content
x

बेडेकर, दिनकर केशव

     तत्त्वचिंतक, समीक्षक, विचारवंत, संपादक म्हणून परिचित असलेल्या दिनकर बेडेकरांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांचे आजोबा इंदूरला राहत; त्यामुळे बेडेकरांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण सातारा, इंदूर येथे झाले. त्यांचे वडील इंजिनिअरिंगचे पदवीधर होते. ते कराचीला सरकारी नोकरी करत होते.

     मॅट्रिकनंतर दि.के.बेडेकर दोन वर्षे फर्गसन कॉलेज येथे होते. त्यानंतर ते कराची येथील इंजिनिअरिंग कॉलेजात दाखल झाले. पण कंटाळून ते चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी शांतिनिकेतनला गेले. तिथे मलेरिया झाल्यामुळे त्यांना शांतिनिकेतन सोडावे लागले. त्यानंतर ते बनारस हिंदू विश्वविद्यालयात गेले आणि त्यांनी १९३२ साली तत्त्वज्ञान व अर्थशास्त्र या विषयांत बी.ए.ची पदवी घेतली.

    १९३२ ते १९५० या काळात त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केले. १९४८ सालाच्या सुमारास कम्युनिस्ट पक्षाच्या राजकीय  धोरणांशी मतभेद होऊन १९५० साली त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर बेडेकरांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला. १९५४ साली त्यांनी तत्त्वज्ञान हा विषय घेऊन पुणे विद्यापीठाची, एम.ए.ची परीक्षा दिली. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी नाशिकच्या हंसराज प्रागजी ठाकरसी कॉलेजात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले.

     १९५८ सालापासून पुढची अडीच वर्षे पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेत त्यांनी संशोधक-प्राध्यापक म्हणून काम केले. १९६२ साली विश्वकोशाचे एक संपादक म्हणून, तसेच ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’चे संपादक म्हणून त्यांनी काम केले. गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या ‘अर्थविज्ञान’ या त्रैमासिकाचे ते संपादक होते.

     १९३५ सालाच्या सुमारास दि.के.बेडेकरांनी लेखनाला सुरुवात केली. धार्मिक, तत्त्वज्ञानात्मक, राजकीय व सामाजिक, अशा विविध विषयांवर त्यांनी स्फुट लेख लिहिले. हिंदुधर्म, त्याचे तत्त्वज्ञान, हिंदुधर्मातील धर्मविपाक, सृष्टिकल्पनेचा विकास, संतसाहित्य व त्यातील तत्त्वज्ञान, भारतीय साहित्यशास्त्र या तत्त्वज्ञानपर विषयांवर त्यांनी मोलाचे विचार मांडले. त्यांनी हेगेलच्या तत्त्वज्ञानाची रूपरेषा स्पष्ट केली. त्यांनी आधुनिक तत्त्वज्ञानातील अस्तित्ववाद ह्या विचारसरणीचा परिचय करून देणारे पुस्तक लिहिले, ‘हिंदी उद्योगधंद्यात राबणार्‍या स्त्रिया व मुले’(१९३६), तसेच ‘टूवर्ड्स अंडरस्टँडिंग गांधी’ (१९७७), ‘धर्मचिंतन आणि धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार’ ही त्यांची महत्त्वाची अन्य पुस्तके होत. ‘समाजवाद प्रेरणा व प्रक्रिया’ हा बेडेकरांच्या गौरवार्थ काढण्यात आलेला ग्रंथ १९७१ साली प्रसिद्ध झाला. बेडेकरांच्या सर्व लेखनाची सूची त्यात समाविष्ट केलेली आहे.

     स्वातंत्र्योत्तर काळातील साहित्य आणि संस्कृतीचा सामाजिक दृष्टीने विचार करणारी समीक्षा बेडेकरांनी केली. सामाजिक वर्ग, समजुती, मूल्यविचार यांनी लेखकाची निर्मिती प्रभावित झालेली असते. लेखकाचा वर्ग, लिंग, वैयक्तिक आवडनिवड, युगभान, वाचकांचा सामाजिक वर्ग, तसेच सामाजिक, राजकीय, आर्थिक घडामोडींचे परिणाम, साहित्यकृतीचा रूपबंध, साहित्यकृतीमधून व्यक्त होणारा अनुभव, त्याचा विकास आणि भाषाशैली यांच्यावर होत असतात. हे ध्यानात घेऊन दि.के.बेडेकर यांनी ‘मराठी वाङ्मयाची सामाजिक पार्श्वभूमी’  विशद केली.

     व्यक्तीस्वातंत्र्यवादी सुधारणा, विज्ञानदृष्टी आणि शिक्षक-प्रेषिताची भूमिका या मूल्यांचा प्रभाव आंग्लशिक्षित वर्गावर होता. त्याचा परिणाम १८८० ते १९२०साला पर्यंतच्या मराठी साहित्यनिर्मितीवर झाला. १९२० साला नंतर इथल्या सुशिक्षित वर्गाला आपले नेतृत्व समाजाने स्वीकारले नसल्याची जाणीव झाली.  त्यामुळे १९३० साला पर्यंतचा काळ भ्रमनिरासात गेला. १९३० साला नंतर मराठी सुशिक्षितांच्यासमोर गांधीवाद, फ्रॉइड, रसेल यांच्या नीतिकल्पना, समाजवाद, परंपरागत मूल्ये हे चार आदर्श उभे राहिले. पुरोगामी, ध्येयवादी, रंजनप्रधान साहित्याची निर्मिती या काळात झाली. त्याचबरोबर, ‘विशुद्ध’ कला म्हणून साहित्याकडे वळण्याचा प्रयत्नही याच काळात सुरू झालेला दिसतो.

     नवसाहित्यातील दुर्बोधता, मनोविश्लेषण, साहित्याची स्वायत्तता यांचा समाजमनाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न दि.के.बेडेकर यांनी केलेला आहे.

     १९२० सालापूर्वीच्या प्रेषितपणाच्या अभिनिवेशाचा त्याग केल्यानंतर, आणि त्यानंतरच्या पुरोगामी आवेशातून मुक्त झाल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली. साहित्यिकांच्या मनातील निर्वासन (अ‍ॅलिनिएशन) सर्वंकष भ्रमनिरासातून आलेले होते. एकंदरीत, मराठी सुशिक्षित वर्गच अधांतरी व किङ्कर्तव्यमूढ झालेला होता. हेच या अनवस्थेचे मुख्य कारण होते, असे दि.के.बेडेकर यांनी नमूद केलेले आहे. ‘निर्वासन’ करणे व स्वायत्त कलेची साधना करणे म्हणजे इतर क्षेत्रांत हस्तक्षेप न करणे व दुसर्‍यांचा हस्तक्षेप निवारण करणे होय. स्वायत्त कलावादी लेखकांना दुसर्‍यांचा हस्तक्षेप आक्षेपार्ह वाटतो, असे निरीक्षण त्यांनी मांडलेले आहे.

     दि.के.बेडेकरांनी केलेला साहित्याचा समाजसंबद्ध विचार साहित्यसमीक्षेमध्ये सदैव मोलाचा मानला जातो.

     - प्रा. रूपाली शिंदे

बेडेकर, दिनकर केशव