Skip to main content
x

दलाल , दीनानाथ दामोदर

                नसामान्यांपासून ते जाणकारांपर्यंत लोकप्रिय असलेले आणि पुस्तकांची मुखपृष्ठे, कथाचित्रे, व्यंगचित्रे, दिनदर्शिका आणि दिवाळी अंकांमधील चित्रमालिकांच्या माध्यमातून दृश्यजाणिवा समृद्ध करणारे चित्रकार म्हणून दीनानाथ दलाल सर्वांना परिचित आहेत.

               दीनानाथ दलाल यांचा जन्म निसर्गसौंदर्याने संपन्न आणि कलासौंदर्याने नटलेल्या गोव्याच्या मडगावातील कोम्ब या पाड्यात झाला. नृसिंंह दामोदर दलाल-नाईक हे त्यांचे मूळ नाव. ‘दीनानाथ दलाल’ या टोपणनावाने त्यांनी पुढे व्यवसाय केला. त्यांचे घर धार्मिक सणवार साजरे करणारे, सारस्वत ब्राह्मणाचे होते. त्यामुळे घरात कोकणी भाषा व शाळेत इंग्रजी व पोर्तुगीज भाषा होती. पुढे मुंबईत आल्यावर ते मराठी भाषा शिकले. निसर्ग, कला आणि भाषा यांचे लहानपणापासूनच त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांना संवेदनक्षम मन व प्रतिभेचे वरदान लाभले होते. त्यामुळे लहान वयातच शाळेच्या हेडमास्तरांची व पुढाऱ्यांची रेखाचित्रे त्यांनी सहजतेने रेखाटली.

               अभिजात चित्रकलेचे रीतसर शिक्षण मुंबईतील केतकर आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये घेऊन दलालांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टची पदविका बहि:स्थ विद्यार्थी म्हणून १९३७ मध्ये मिळविली. त्यांनी जैन, गुजराती, राजस्थानी इत्यादी भारतीय लघुचित्रशैलींचा अभ्यास केला. भारतीय पोथ्या, हस्तलिखिते, अजिंठा, वेरूळ येथील भित्तिचित्रांच्या रंगरेषा, रचना, आकारांचे तंत्र अभ्यासले. राजा रविवर्मा, अमृता शेरगील, अवनींद्रनाथ टागोर, हळदणकर, चिमुलकर, एन.एस. बेंद्रे हे त्यांचे आवडते भारतीय चित्रकार होते. व्हॅन गॉ, रेम्ब्रां, कॉन्स्टेबल, टर्नर अशा युरोपियन पाश्‍चात्त्य कलाकारांची कलाही दलालांनी अभ्यासली.

               भारतीय व पाश्चात्य शैलींच्या समन्वयातून त्यांची मुखपृष्ठे व दिनदर्शिकांची चित्रे यांसाठी स्वत:ची अशी शैली निर्माण झाली. त्यात वास्तववादी चित्रशैलीपासून नवआविष्कारवादाच्या शैलीपर्यंतचे वैविध्य होते.

               अखिल भारतीय चित्रप्रदर्शनांतून त्यांच्या चित्रांना कांस्य, रौप्य, सुवर्ण अशी मानाची पदके मिळत गेली. त्यांना १९३९, १९४२, १९४७ व १९५३ या वर्षी बॉम्बे आर्ट सोसायटीची पारितोषिके मिळाली. त्यांना १९४० मध्ये वास्को-द-गामा (गोवा) संस्थेकडून रौप्यपदक, तर १९४९ मध्ये हैद्राबाद सोसायटीकडून ब्रॉन्झ पदक मिळाले, तसेच १९५५ मध्ये ऑल इंडिया आर्ट एक्झिबिशनमध्ये राष्ट्रपती पारितोषिक, तर १९५६ मध्ये त्यांना दि इंडियन अकॅडमी ऑफ फाइन आटर्स अ‍ॅण्ड क्राफ्ट (अमृतसर) चे सुवर्णपदक मिळाले. १९७० मध्ये धि गोवा हिंदू असोसिएशनने दलालांना सन्माननीय सभासदत्व दिले.

               दलालांनी १९३७ पासून व्यवसायात पदार्पण केले. बी.पी. सामंत आणि कंपनी या जाहिरात वितरणाच्या कंपनीत दलाल स्लाइड्स व त्यांसाठी लागणाऱ्या रेखाचित्रांचे काम करीत. याच सुमारास प्रा.अनंत काणेकर यांच्या ‘चित्रा’ साप्ताहिकासाठी त्यांनी व्यंगचित्रे काढण्यास सुरुवात केली. काणेकरांच्या मनातील कल्पना आणि दलालांची व्यंगचित्रकारिता यांच्या समसमासंयोगाने तत्कालीन राजकीय धोरणांवर, ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेवर ताशेरे ओढत दलालांच्या लवचीक कुंचल्याने अप्रतिम कामगिरी केली. ‘मी जागाच आहे’ या मथळ्याचे त्यांचे व्यंगचित्र त्या वेळी फार गाजले होते. आचार्य प्र.के.अत्रे यांचे ‘नवयुग’ व प्रा. ना.सी.फडके यांचे ‘झंकार’ या नियतकालिकांमध्ये दलालांची व्यंगचित्रे येऊ लागली. त्या काळातील बाळ ठाकरे व वसंत सरवटे यांसारख्या तरुण चित्रकारांनी दलालांच्या व्यंगचित्रांपासून प्रेरणा घेतली. पुढील काळात ‘दीपावली’ या नियतकालिकातील त्यांच्या ‘बिंगचित्रमाला’, ‘व्यंगचित्रे’, ‘हास्यचित्रे’, ‘अर्कचित्रां’नी वाचकांना आकर्षित केले.

               दलाल १९३८ च्या सुमारास बा.द.सातोस्कर यांच्या ‘सागर प्रकाशना’साठी काम करू लागले. मामा वरेरकर यांच्या ‘वैमानिक हल्ला’ या पुस्तकासाठी दलालांंनी पहिले मुखपृष्ठ केले. १९४३ पर्यंत त्यांनी सातोस्करांसाठी पंधरा पुस्तकांची मुखपृष्ठे तयार केली. १९४३ मध्ये ‘मौज’ प्रकाशनाच्या जिन्याखालील एका छोट्याशा खोलीत त्यांनी ‘दलाल आर्ट स्टुडीओची सुरुवात केली. कामाचा व्याप वाढल्याने १९४४ मध्ये दलाल आर्ट स्टूडिओचे मुंबईतील केनेडी ब्रिजजवळील एका मोठ्या जागेत स्थलांतर झाले.

               दलालांची स्वतंत्र व्यवसायाची सुरुवात आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात जवळपास एकाच वेळी झाली. ‘केतकर आर्ट इन्स्टिट्यूट’मधील सहकारी चित्रकर्ती सुमती पंडित १ मार्च १९४३ रोजी दलालांची सहधर्मचारिणी झाली. सुमती यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टची पदविका घेतली होती. काही नियतकालिकांसाठी त्यांनीही चित्रे काढण्याचे काम केले होते. नंतर मात्र त्या मीरा, अरुणा, प्रतिमा, अमिता या चारी कन्यकांचे लालनपालन करण्यात आणि संसारात रमल्या.

               रॉय किणीकर व दीनानाथ दलाल या जोडीने १९४५ मध्ये ‘दीपावली’ या वार्षिक दिवाळी अंकाचे प्रकाशन सुरू केले. ‘‘ ‘दीपावली’ वार्षिक हे माझे पाचवे कन्यारत्न आहे,’’ असे दलाल म्हणत. ‘दीपावली’वर दलालांनी जिवापाड प्रेम केले. ‘दीपावली’तील साहित्याची निवड, परीक्षणे, वाचकांची पत्रे, जाहिराती, कथाचित्रे, मुद्राक्षर मांडणी, डिझाइन्स, रंगसंगती, ब्लॉक्स, छपाई इत्यादी सर्वच बाबतींत दलाल व किणीकर बारकाईने विचार करत. त्यामुळे अंक वेळच्यावेळी आणि सर्वांगसुंदर रूप घेऊन प्रसिद्ध होत असे. साहित्य व चित्रकला यांच्या संगमातून निर्माण झालेल्या ‘दीपावली’ने मराठी नियतकालिकांच्या क्षेत्रात नवा मापदंड निर्माण केला.

               वि.स.खांडेकर, पु.भा.भावे, विजय तेंडुलकर, पु.ल.देशपांडे अशा प्रथितयश लेखकांपासून ते नवकवींपर्यंत महत्त्वाचे लेखन दीपावलीत प्रकाशित झाले. उदा. १९५५ मध्ये ‘बटाट्याची चाळ’, १९५८ मध्ये ‘असा मी असामी’, ‘अंतू बर्वा’, ‘सखाराम गटणे’ असे पु.ल.देशपांडेचे लेख व अशा लेखांसाठी काढलेली विनोदगर्भ चित्रे ‘दीपावली’त प्रथम प्रसिद्ध झाली.

               ‘रागरागिण्या’, ‘बारा-मास’, ‘ऋतू’, ‘नद्या’, ‘नवरस’, ‘शृंगारनायिका’ अशा भारतीय संस्कृत साहित्यावर आधारित रंगीत चित्रमालिका हे ‘दीपावली’चे वैशिष्ट्य होते.

               ‘दीपावली’ वार्षिक १९५६ पासून मासिक रूपात प्रकाशित होऊ लागले. त्यांनी हिंदी भाषेत ‘दीपावली’चे प्रकाशन जवळजवळ दहा वर्षे केले. हिंदी ‘दीपावली’ मराठी दीपावलीचे भाषांतर नव्हते, तर अनेक मान्यवर हिंदी लेखक, कवींना दलालांनी त्यायोगे प्रकाशात आणले व स्वत:च्या विविध प्रकारच्या चित्रांनी सजविले.

               त्यांनी ‘डोंगरे बालामृत’, ‘कोटा टाइल्स’, ‘धूतपापेश्‍वर’, ‘वर्तकी तपकीर’, ‘कॅम्लीन’, ‘किर्लोस्कर ऑइल इंजीन्स’ अशा कंपन्यांसाठी जाहिराती व दिनदर्शिका केल्या. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांतारामांनी ‘राजकमल’चे बोधचिन्ह दलालांकडून करून घेतले. गुरुचरित्राच्या ग्रंथाध्यायांसाठी दलालांनी चित्रे काढली. श्रावण महिन्यातील ‘जिवती’च्या पूजेसाठी लागणारे आकर्षक चित्र दलालांनी काढले व महाराष्ट्रातील देवघरांपर्यंत ते पोहोचले.

               याशिवाय त्यांनी रंगविलेले शिवराज्याभिषेकाचे भव्य चित्र त्यांच्या अभ्यासू वृत्तीसोबतच त्यांच्यातील प्रतिभाशाली कलावंताचे प्रत्यंतर देणारे आहे. या चित्रातील असंख्य व्यक्तिरेखा, त्यांची व्यक्तिमत्त्वे, भावदर्शने व राज्याभिषेकाच्या समयीचे वातावरण अत्यंत सामर्थ्याने व्यक्त झाले आहे.

               दीनानाथ दलालांनी उपयोजित कला आणि अभिजात कला अशा दोन्ही क्षेत्रात तितक्याच समर्थपणे काम केले. पुस्तकांची मुखपृष्ठे, आतील कथाचित्रे, मासिकांची मुखपृष्ठे, दिवाळी अंकामधील एखादा विषय घेऊन केलेल्या चित्रमालिका अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी चित्रे काढली. या चित्रांमध्ये शैलींची विविधता आणि रंगांची आकर्षकता आहे, पण त्याचबरोबर पेंटिंग अथवा अभिजात कलेचे मूळ वळणही आहे. आकृतिबंधाची उत्तम जाण, आकर्षक रंगसंगती, वास्तवातले अनावश्यक तपशील गाळून चित्र परिणामकारक करणारा साधेपणा ही त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये होती. भारतीय लघुचित्रशैलीतली रेखनपद्धती आणि सपाट रंगांचा वापर एका बाजूला तर दुसरीकडे आधुनिक चित्रकलाप्रवाहांमधले अवकाशविभाजन आणि विरुपीकरण यांचा दलालांनी आकर्षक पद्धतीने मेळ घातला आणि लोकांच्या रूढ अभिरूचीला रूचेल, पचेल अशी एक आधुनिक वळणाची, पण भारतीय कलापरंपरेत रूजलेली शैली त्यांनी विकसित केली.

               संतचित्रमालिकेतील संत तुलसीदास यांचे चित्र किंवा ‘स्वामी’ कादंबरीचे मुखपृष्ठ यात लघुचित्रशैलीसारखे सपाट रंग आहेत. चेहर्‍यांचे रेखांकन बाजूने (प्रोफाईल) केलेले आहे. प्रतिकांचा आणि पार्श्‍वभूमीचा वापर चित्रातला कथात्मक आशय सांगण्यासाठी केलेला आहे. चेहऱ्यावर पांढरा किंवा उजळ रंगाचा पट्टा वापरून आधुनिक पद्धतीने चित्रात त्रिमितीचा आभास आणला आहे. लघुचित्रशैलीतील अलंकरण, लयबद्धता आणि आधुनिक चित्रकलेतले त्रिमितीपूर्ण वास्तवचित्रण यांचा मिलाफ इथे दिसतो. दलालांनी १९७०च्या ‘दीपावली’ दिवाळी अंक चित्रमालिकेसाठी केलेल्या एका चित्रात एक युवती आणि तिचा प्रियकर असे संगमोत्सुक युगल दाखवले आहे. या चित्राची रचना आणि रंगसंगती यातून तिला भेटलेला प्रियकर म्हणजे वास्तव की तिचे स्वप्नरंजन असा एक मनोहर संभ्रम दलालांनी सूचकपणे व्यक्त केला आहे.

               दलालांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे आणि मासिके, तसेच पुस्तकांसाठी कथाचित्रे केली. पेंटिंग आणि रेखांकनातले कौशल्य त्यांनी पुस्तकांचा आशय व्यक्त करण्यासाठी वापरले. ‘बनगरवाडी’ कादंबरीतील प्रवाही रेषांनी जिवंत झालेली स्केचेस वाटावीत अशी कथाचित्रे, ‘राजा शिवछत्रपती’ पुस्तकातील काळ्या रंगात केलेली प्रसंगचित्रे, काही कथांसाठी आधुनिक शैलीत केलेली कथाचित्रे अशी विविधता त्यांच्या चित्रांमध्ये होती. ‘बनगरवाडी’च्या मुखपृष्ठ रचनेतला साधेपणा, ‘रणांगण’ कादंबरीतला युद्धाच्या पार्श्‍वभूमीवरचा मानसिक संघर्ष दाखविण्यासाठी केलेला रंगांचा वापर, जयवंत दळवींच्या ‘स्व-गत’ कादंबरीच्या नायकाच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे टिपणारे त्या पुस्तकावरील काल्पनिक व्यक्तिचित्र यातून दलालांचा मुखपृष्ठांमधील संकल्पनात्मक विचार जाणवतो. त्यासाठी मांडणीचा एक घटक आणि आशयाभिव्यक्तीचे एक साधन म्हणून ते अक्षरांकनाचा बारकाईने विचार करीत. पुस्तकांची मुखपृष्ठे आणि आतील चित्रे म्हणजे फक्त सजावट नसते, तर पुस्तकाचा आशय दृश्य प्रतिमांनी समृद्ध करणारी, पुस्तकाला व्यक्तिमत्त्व देणारी, पुस्तकाशी संवादी अशी ती नवनिर्मिती असते याची जाणीव दलालांच्या मुखपृष्ठांनी प्रथम दिली.

               दीनानाथ दलालांनी अंगी क्षमता असूनही अभिजात कलेची निर्मिती केली नाही, अथवा व्यावसायिक कामांच्या रेट्यामुळे त्यांना तशी उसंतच मिळाली नाही, याबद्दल खंत व्यक्त केली जाते. स्वत: दलालांनी देखील ही खंत व्यक्त केली होती. जनसामान्यांची जशी मनमोकळी दाद त्यांच्या चित्रांना मिळाली तशी, विद्वान कलारसिकांकडून दाद मिळेल अशी भरीव सृजनशील कलानिर्मिती आपल्या हातून व्हावी अशी त्यांची तीव्र इच्छा होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही, पण त्यांची जी काही रंगीत स्केचेस, काही पेंटिंग्ज, व्यक्तिचित्रे उपलब्ध आहेत त्यावरून त्यांच्या चित्रांमधल्या अभिजात गुणांची प्रचिती येते. तीन प्रकारची व्यक्तिचित्रे त्यांनी केली. महात्मा गांधी, विनोबा यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींची व्यावसायिक व्यक्तिचित्रे; ना.सी.फडके., न.चिं.केळकर, वि.स.खांडेकर अशा साहित्यिकांची अथवा ‘अमिता’सारखी स्वतंत्रपणे केलेली व्यक्तिचित्रे आणि तिसरा प्रकार म्हणजे मासिकाच्या मुखपृष्ठांसाठी केलेल्या काल्पनिक व्यक्तिचित्रांचा. यांपैकी व्यावसायिक व्यक्तिचित्रांमध्ये व्यक्तीच्या चेहऱ्याबरोबरच व्यक्तिमत्त्वदर्शक अशा इतर तपशीलांचा रचनात्मक उपयोग केेलेला जाणवतो. दुसर्‍या प्रकारच्या चित्रांमध्ये स्केचेसमध्ये जी उत्स्फूर्तता असते ती आहे आणि त्यात एक ताजेपणा आहे. तिसऱ्या प्रकारची व्यक्तिचित्रे सरळ सरळ वाचकांच्या अभिरुचीने संस्कारित आहेत.

               दलालांनी जलरंग आणि तैलरंगात केलेली जी चित्रे आहेत त्यावर समकालीन चित्रकारांचा आणि चित्रप्रवाहांचा प्रभाव दिसतो. ‘स्नान करणाऱ्या स्त्रिया’, ‘आदिवासी नृत्य’, ‘रेड रूफ’सारखे निसर्गचित्र, ‘हर फ्ल्युट’ या चित्रांमधल्या मानवाकृतींचे रेखाटन, त्यांची मातकट रंगसंगती (अर्थ कलर्स), उभ्या-आडव्या रेषांनी केलेले अवकाश विभाजन पाहिले की, आलमेलकर, हेब्बर अशा चित्रकारांची आठवण होते. त्यांच्या ‘फॉरेस्ट’सारख्या काही निसर्गचित्रांमध्ये एक्स्प्रेशनिस्ट चित्रांप्रमाणे रंगलेपन आढळते. तीन कोळिणींच्या जलरंगातील एका रफ स्केचमध्ये पळशीकरांच्या ‘थ्री ग्रेसेस’ चित्राचे पडसाद उमटलेले दिसतात. या सगळ्या चित्रांवरून दलाल भोवतालच्या कलाप्रवाहांबद्दल किती सजग आणि प्रयोगशील होते हे दिसून येते. या चित्रांचा आणि त्यांच्या उपयोजित कलेतील चित्रांचा तुलनात्मक अभ्यास केला तर अभिजात कलेतील रचनावैशिष्ट्यांचा व्यावसायिक कलेत त्यांनी कसा खुबीने उपयोग करून घेतला ते लक्षात येते.

               धि गोवा हिंदू असोसिएशनचे ते १९५६ ते १९७१ या काळात कलाविभागाचे मार्गदर्शक होते. ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘लेकुरे उदंड जाहली’, ‘मत्स्यगंधा’, ‘नटसम्राट’ यासारखी नाटके त्यांच्या काळात निर्माण झाली व त्यांच्या नेपथ्य व कलादिग्दर्शनात दलालांचा सहभाग होता.

               काही काळ ते चित्रपट निवड समितीवरही होते. दलाल ‘टॉम अ‍ॅण्ड बे’ या जाहिरात कंपनीचे सल्लागार होते. त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’साठी इलस्ट्रेशनचे पाच-सहा वर्षे काम केले. १९५३ ते १९५८ या कालखंडात दलालांनी गोवामुक्तीसाठी मदत केली.

               चित्रकार म्हणून दलालांना विलक्षण लोकप्रियता मिळाली. दलालांच्या आकर्षक मुखपृष्ठांमुळे प्रकाशन व्यवसायाला चालना मिळाली. त्यांचे व्यक्तिमत्त्व विनयशील, आतिथ्यशील आणि पारदर्शी होते. साहित्यिक, प्रकाशक, संपादक, कलाकार यांना दलाल आपले वाटत. १९६५ मध्ये ‘महाराष्ट्र शासन’ व केंद्रशासनाकडून ‘दीपावली’ला उत्कृष्ट कामगिरीसाठी श्रेष्ठ गुणवत्तेचे प्रशस्तिपत्रक मिळाले. ९ जानेवारी १९७१ मध्ये ‘दीपावली’च्या रौप्यमहोत्सव शाही थाटाने दलालांनी साजरा केला. ‘‘आता माझ्या मनाप्रमाणे मी चित्रकलेला वाहून घेणार,’’ अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली, परंतु ‘दीपावली’च्या रौप्यमहोत्सवी समारंभानंतर काही दिवसांतच १५ जानेवारी १९७१ रोजी दलालांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर दलाल ट्रस्टतर्फे त्यांच्या चित्रांची महाराष्ट्रात प्रदर्शने झाली. 

 

- डॉ. स्वाती राजवाडे, शकुंतला फडणीस

संदर्भ
१. डॉ. ओंकार, भैयासाहेब;  ‘चित्रसौरभ’; प्रकाशक : संस्कार भारती, महाराष्ट्र प्रांत; १९९७. २. अंतरकर, आनंद ‘हंस’ मासिक, लेख : चित्रकवी; १९९२. ३. राजाध्यक्ष, मं.वि.; ‘दलाल खरे रसिक मित्र’; ‘दीपावली’ श्रद्धांजली विशेषांक; मार्च १९७१.  ४. काणेकर, अनंत; ‘राजकीय टीकाचित्रे व चित्रटीका’;  दलाल आर्ट स्टुडीओ , मुंबई. ५. ‘दीनानाथ दलाल’, ज्योत्स्ना प्रकाशन, मुंबई, २००७.
दलाल , दीनानाथ दामोदर