जोशी, केशव रामराव
केशव रामराव जोशी यांचा जन्म मध्य प्रदेशामधील छिंदवाडा जिल्ह्यातील रंगारी येथे झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून एम.ए., पीएच.डी. आणि शास्त्री या तीन पदव्या संपादन केल्या. तसेच जयपूर विद्यापीठातून साहित्याचार्य, कलकत्ता विद्यापीठातून काव्यतीर्थ, बडोदा विद्यापीठातून साहित्योत्तमा आणि वाराणसी विद्यापीठातून संपूर्ण दर्शनमध्यमा या पदव्या संपादन केल्या. त्यानंतर नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागात पदव्युत्तर शाखेसाठी (वर्गासाठी) त्यांनी अध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्य केले.
३० वर्षांच्या प्रदीर्घ अध्यापनाबरोबरच संस्कृत प्रचाराचे अखंड व्रत घेतलेल्या डॉ. जोशी यांनी संस्कृतच्या प्रचारासाठी अनेक उपक्रम राबवले. ते नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष होते. कला शाखेचे सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य आणि सिनेट मेंबर या सर्व पदांवरून विद्यापीठ स्तरावर त्यांनी संस्कृतच्या विकासासाठी कार्य केले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे ते सदस्य होते. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य उपाधीसाठी संशोधन केले. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारा अनुदानित १९८२मध्ये ‘प्रॉब्लेम्स ऑफ संस्कृत एज्युकेशन इन नॉन हिंदी स्टेट्स’ आणि १९८५ मध्ये ‘पोस्ट इंडिपेंडन्स संस्कृत लिटरेचर’, या दोन अखिल भारतीय चर्चासत्रांचे आयोजन केले.
डॉ. जोशी १९६० ते १९८५ या काळात ‘संस्कृतभवितव्यम्’ या साप्ताहिकाचे संपादक होते. विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारा प्रायोजित १९८५ ते १९८८ या कालावधीत आद्य शंकराचार्यांच्या शारीरक भाष्यातील विषयांचे विश्लेषणात्मक अध्ययन आणि २००० ते २००३ या कालावधीत पदार्थविज्ञानशास्त्र, आयुर्वेद, मानसशास्त्र व कामशास्त्र यांच्या संदर्भात वैशेषिकांच्या द्रव्यगुणविचारांचा चिकित्सक अभ्यास हे दोन प्रधान संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले. शास्त्राध्ययन करताना जुन्या शास्त्रांचे अध्ययन करून आधुनिक शास्त्रांच्या संदर्भात त्यांची उपयुक्तता दाखवून देण्याचा केशव जोशी यांचा सतत प्रयत्न असतो. म्हणूनच वैशेषिक दर्शनाचे अध्ययन करून त्यांनी आधुनिक भौतिकशास्त्रासाठी हे शास्त्र कसे उपयुक्त आहे, हे आपल्या लेखांमधून दाखवून दिले.
केशव जोशी यांच्या प्रगल्भ विचारसरणीचा आणि प्रगाढ पांडित्याचा परिपाक म्हणजे त्यांची ग्रंथसंपदा. विविध विषयांवर त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. ‘नीलकंठ दीक्षित व त्यांची काव्यसंपदा’ हा त्यांचा आचार्य उपाधीसाठी सादर केलेला शोधप्रबंध नागपूर विद्यापीठाने १९७७ मध्ये प्रकाशित केला. या ग्रंथामुळे अभ्यासकांना नीलकंठ दीक्षितांसारख्या संस्कृत ग्रंथकाराचा सविस्तर परिचय होऊ शकला. ‘न्यायसिद्धान्त मुक्तावली’ हा त्यांचा विद्वन्मान्य ग्रंथ ‘संस्कृत-मराठी स्पष्टीकरणासहित’ पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने १९८५ मध्ये प्रकाशित केला. त्याचप्रमाणे नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने ‘प्रॉब्लेम्स ऑफ संस्कृत एज्युकेशन इन नॉन हिंदी स्टेट्स’, नागपूरच्या प्रचारिणी सभेमार्फत ‘नीलकण्ठविजयम्’, पुणे भारतवाणीतर्फे ‘रहस्यमयी’, नागपूरच्या भारती प्रकाशनतर्फे १९९३ मध्ये ‘संस्कृतत्रिदलम्’, नागपूरच्या विश्वभारती प्रकाशनतर्फे २००१मध्ये ‘अभिनवं शास्त्रत्रिदलं’, ‘तीरे संस्कृताची गहनें’ अशी त्यांची ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. या ग्रंथसंपदेवरून साहित्य, न्याय, व्याकरण, भाषाशास्त्र इ. सर्वच शास्त्रांमध्ये त्यांची गती दिसून येते. शास्त्रविषयक चर्चा करणारे डॉ. जोशी काव्याबद्दल चर्चा करताना तेवढेच रसज्ञ होतात. संस्कृत क्षेत्रातील त्यांच्या अनमोल कामगिरीचा शासन स्तरावर सन्मान झाला. त्यांना १९८९मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाद्वारा संस्कृत पंडित पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच २००० मध्ये पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी द्वारा पुरस्कार , २००२मध्ये रामटेकच्या कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाद्वारा पुरस्कार , २००३मध्ये पुण्यातील देवदेवेश्वर संस्थानाद्वारा पुरस्कार , २००३मध्ये पर्वती देवस्थानचा नानासाहेब पेशवे पुरस्कार, २००३मध्ये जयपूरच्या संस्कृत सेवा परिषदेद्वारे तसेच २००४मध्ये स्वामी श्री जयेंद्र सरस्वती कांची कामकोटी पीठाद्वारा पुरस्कार , तसेच २००५मध्ये अमेरिकन बायोग्रफिकल इन्स्टिट्यूट, रालेहा (नॉर्थ कॅरोलिना)द्वारा द मॅन ऑफ दि इयर २००५ विथ कॉमेमरेटिव्ह गोल्ड मेडल, २००६मध्ये द ऑनर्ड बाय द फ्रेंडशिप फोरम ऑफ इंडिया, न्यू दिल्ली विथ द भारत एक्सलन्स अवॉर्ड अँड गोल्ड मेडल, २००९-१०चा श्रृंगेरी पीठम् आणि २००९ मध्ये राष्ट्रपती पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी केशव जोशी यांना गौरवण्यात आले.