Skip to main content
x

काकडे-देशमुख,मुगुटराव साहेबराव

     पुणे जिल्ह्यातील सहकारी चळवळ रुजविण्यात वाढविण्यात, ज्या सहकारी कार्यकर्त्यांनी योगदान दिलेले आहे त्यांच्यात मुगुटराव काकडे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.

     मुगुटराव साहेबराव काकडे यांचा जन्म बारामती तालुक्यातील निंबुत या गावी सधन कुटुंबात झाला. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण निंबुत या गावातच झाले. त्यांच्या खेडेगावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. त्यांच्या आईचे नाव सोनूबाई होते. त्यांचे वडील साहेबराव हे सामाजिक व सहकार क्षेत्रात काम करीत. मुगुटरावांच्या वडिलांनी त्या काळातील शेतकर्‍यांची सावकार-व्यापारी यांच्याकडून होणारी पिळवणूक लक्षात घेऊन ती थांबवण्यासाठी 1911 मध्ये ‘निंबुत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित’ची स्थापना केली. तसेच सणसर येथे ‘सणसर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, सणसर’ ही सहकारी संस्था स्थापन केली. तेव्हा त्यांना सहकार प्रणेते वैकुंठभाई मेहता यांचे मोलाचे सहकार्य लाभले. बालपणापासून झालेल्या या संस्कारांमुळे मुगुटराव सहकार क्षेत्राकडे आकृष्ट झाले. सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी यांचा खर्‍या अर्थाने सामाजिक व आर्थिक विकास करण्याचे सामर्थ्य सहकारी चळवळीत आहे, हे त्यांनी अचूक हेरले. त्यातूनच पुढे त्यांनी सहकारी संस्थांची स्थापना केली.

     शेतकर्‍यांना निश्चित असे उत्पनाचे साधन मिळवून देणारे खात्रीशीर पीक म्हणून ऊसाकडे पाहिले जाते. नीरा नदीवरील या परिसरात पाण्याची मुबलकता होती. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात गूळ उत्पादक शेतकरी होते. त्यांच्या गुळाला योग्य भाव मिळत नव्हता. बारामतीचे व्यापारी व नीरा कॅनॉल संस्था चालकांच्या बेबंदशाहीला त्या भागातील गूळ उत्पादक शेतकरी कंटाळले होते. या सगळयाला आळा घालण्यासाठी काकडे यांनी 1939 मध्ये नीरा कॅनॉल सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना केली. या खरेदी-विक्री संघामार्फत शेतकर्‍यांना शेतीसाठी लागणारी अवजारे, खते, बी-बियाणे व आAैषधे यांचा पुरवठा केला. त्यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय या संघाच्या माध्यमातून घेतले.   

     काकडे यांना पुणे जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघाचे अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. ही संस्था शेतकर्‍यांच्या हिताची असूनही ती ग्रामीण भागात कार्यरत नव्हती, हे लक्षात आल्यावर त्यांनी सहकारी तत्त्वावर शेतीमाल खरेदी-विक्री करावयचे व्यवहार सुरू केले. तसेच त्यांनी नीरा बाजार समितीचे संचालकपदही सांभाळले. व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची होणारी पिळवणूक थांबावी व शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून ते दक्ष असत.

     काकडे यांनी निंबुत जवळ निंबुत छप्री येथे नवीन खत कारखाना सुरू करण्यासाठी आठ एकर जागा खरेदी केली. तसेच त्यांनी शेतकर्‍यांच्या विकासासाठी असणारी जिल्हा बँक ग्रामीण भागातील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. त्यामुळे केवळ उद्योजकांना मिळणारे कर्ज सामान्य शेतकर्‍यांनी मिळू लागले व शेतकर्‍यांचे हित जोपासाले जावू लागले. काकडे यांनी सोमेश्वर भागातील लहान शेतकर्‍यांचे हित जोपासण्यासाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखाना काढण्याचे निश्चित केले. त्यावेळेस ढाकळा येथील ढाकळकरांनी कोर्‍हाळे येथे कारखाना उभारण्यासाठी भाग-भांडवल गोळा केले होते. परंतु साखर कारखाना काढण्यातील अडचणी लक्षात आल्यावर त्यांनी तो नाद सोडला. तेव्हा काकडे यांनी पुढाकार घेऊन पुन्हा नीरा येथे बैठक बोलावली व सर्वानुमते कारखाना काढण्याचे ठरले. वाहनांची पुरेशी सोय नसलेल्या काळात कारखान्यासाठी लागणारे भाग भांडवल जमवण्यासाठी ते आपल्या परिसरात सायकलवर फिरले. त्यांनी सहकार व सामाजिक क्षेत्रातील विचारवंतांशी विचार विनिमय केला. तसेच त्यांनी हा कारखाना सोमेश्वर गावात उभा करावा या हेतूने आजूबाजूच्या परिसरातील शेतकर्‍यांना कारखान्याचे महत्त्व पटवून दिले व 214 एकर जागा मोफत मिळवली आणि त्यांनी 20 जून 1960 रोजी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची नोंदणी केली. या कामात त्यांना मालोजीराव निंबाळकर, बाळासाहेब भारदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांनी कारखान्यासाठी लागणारी यंत्रे जुळवण्यासाठी पिंपरी येथील कंपनीबरोबर करार करून 84 लाखांची यंत्रे खरेदी केली. 14 फेबु्रवारी 1962 रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते कारखन्याचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या हंगामात कारखान्यामध्ये 5289 इतकी साखरेची पोती तयार करण्यात आली. त्यापैकी 5062 साखरेची पोती परदेशी निर्यात केली. पुढे त्यांनी या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहिले. आजही महाराष्ट्रातील उत्कृष्ट साखर कारखान्यामध्ये या कारखान्याची गणना केली जाते.

     काकडे यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसाचे क्षेत्र वाढावे व दूर अंतरावरून गेटकेन आणण्यापेक्षा आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी दिले तर आपल्याला कायमस्वरूपी हक्काचा ऊस मिळेल व त्यातून उत्पन्नाचे साधन वाढेल या भावनेतून ‘पाणी उचल’ परवाना कारखान्याच्या नावेे घेतला व ऊस वाढ व्हावी म्हणून पाणी पुरवठा योजना सुरू केली. या योजनेमुळे कार्यक्षेत्रातच कारखान्याला ऊस पुरवठा होऊ लागला. त्यामुळे वाहतुकीवर होणारा खर्च कायमस्वरूपी वाचला व त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मोठया प्रमाणात झाला.

     काकडे यांनी कारखान्याच्या सभासदांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय कारखान्याच्या आवरातच करून दिली. तसेच त्यांनी ग्रामीण भागातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे म्हणून ग्रामीण भागात महिलांसाठी ‘इंदिरा गांधी तांत्रिक विद्या निकेतन’ची स्थापना केली. तर शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षण घेता यावे या उद्देशाने त्यांनी ‘शिक्षण प्रसारक मंडळा’ची स्थापना केली. त्यांनी 1972 मध्ये शेतकर्‍यांच्या मुलांना महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे या उद्देशाने ‘मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालया’ची स्थापना केली.

     काकडे यांनी मांडकी गावचा केलेला कायापालट लक्षात घेऊन त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी गावात त्यांचे स्मारक उभारले.

- अर्चना कुडतरकर

संदर्भ
1. कै. मुगुटराव काकडे स्मरणिका.
काकडे-देशमुख,मुगुटराव साहेबराव