Skip to main content
x

कांबळे, प्रमोद दत्तात्रेय

        वास्तववादी शैलीत काम करणारे प्रमोद दत्तात्रेय कांबळे हे अहमदनगरचे. ‘माझी मुलं चित्रकारच होतील’, असे ठाम विश्‍वासाने सांगणाऱ्या चित्रकार दत्तात्रेय कांबळे व आई अन्नपूर्णा यांची प्रेरणा सतत त्यांच्या पाठीशी होती. वडील नगरच्या प्रगत कला विद्यालयात कलाशिक्षक होते. प्रमोदचे तीनही भाऊ चित्रे काढीत. त्यामुळे घरात चित्रकलेला पोषक वातावरण होतेच. वडिलांबरोबरच शाळेतील कलाशिक्षक व ज्येष्ठ चित्रकार र.बा. केळकर यांनी तिसऱ्या इयत्तेपासूनच प्रमोद यांना प्रत्यक्ष शिल्प बनविण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

        अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी जाहिरातींचे फलक रंगवणे, निवडणूक काळात भिंती रंगवणे, संक्रांतीत पतंग करून विकणे, दिवाळीत आकाशकंदील विकणे, गणपतीसाठी आराशी करून देणे ही कामेही त्यांनी केली. दहावी उत्तीर्ण झाल्यावर नगरलाच प्रगत कलाविद्यालयात फाउण्डेशन कोर्स करून नंतर मुंबई येथील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी शिल्पकलेचे शिक्षण पूर्ण केले.

        या काळात त्यांना अनेक बक्षिसे मिळाली. अंतिम वर्षी जे.जे.चे सुवर्णपदकही मिळाले. शिक्षण संपल्यानंतर चित्रपट क्षेत्रात चांगली संधी मिळत असतानाही त्यांचे मन तिथे रमले नाही; कारण ओढ होती गावच्या मातीची. त्यामुळेच मुंबई-पुण्यासारखी कलेला पोषक अशी शहरे सोडून कलेचे वातावरण नसलेल्या अहमदनगर या गावात अनेक आव्हाने झेलत, त्यांनी चित्र व शिल्पकलेचा व्यवसाय सुरू केला.

        भारताच्या स्वातंत्र्याला १९९७ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून ‘सारे जहाँ से अच्छा’ या शीर्षकाचे ७०×२० फुटांचे ५०० हून अधिक थोर व्यक्तींची पेन्सिल—चित्रे असलेले भव्य चित्र त्यांनी नगर महापालिकेच्या महावीर सभागृहात काढले. या कलाकृतीत देवदेवता, ॠषिमुनी, थोर महापुरुष, स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत, खेळाडू अशा विविध क्षेत्रांतील विशेष व्यक्तींची चित्रे असून ते नगर शहरात येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. एम.आर.आर.सी.चा गौरवशाली इतिहास सांगणारे ‘द स्पिरिट’ हे ९०×१० फुटांचे पेन्सिल चित्र, वॉर मेमोरियल्सचे भव्य शिल्प, गणपती उत्सवातील भुलेश्‍वर मंदिराची प्रतिकृती अशी त्यांची आणखी काही उल्लेखनीय कामे आहेत.

        नानाजी देशमुख यांच्या चित्रकूट येथील ‘नन्ही दुनिया’ या प्रकल्पासाठी कांबळे यांनी २००४ मध्ये वन्य प्राण्यांची ‘लाइफ साइज’ शिल्पे बनविली. आई व मूल या संकल्पनेवर आधारित वाघ, हत्ती, गोरीला, उंट, गाय, मगर, जिराफ, झेब्रा अशा सर्व वन्यप्राण्यांची फायबरमधील ही अभ्यासपूर्ण शिल्पे लोकप्रिय झाली. त्यांचे उद्घाटन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते झाले. यांतील काही शिल्पांच्या प्रतिकृती मुंबईच्या काळाघोडा फेस्टिव्हलमध्ये २०१० मध्ये प्रदर्शित केल्या होत्या.

        तसेच कलाजगत न्यासाची स्थापना, लहान मुलांसाठी स्पर्धा, शिबिरे अशा उपक्रमांतून मुलांमध्ये चित्र व शिल्पकलेची आवड निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न ते करीत आहेत. नगरसारख्या ठिकाणी प्रमोद कांबळे यांनी आर्ट गॅलरीही सुरू केली आहे.

        या सगळ्या उपक्रमांत मूळ नगरच्याच असणाऱ्या त्यांच्या सुविद्य अर्धांगिनी, पूर्वाश्रमीच्या स्वाती उपासनी, सर्वार्थाने सहभागी असतात.

        उत्तम कौशल्य, तांत्रिक ज्ञान व व्यवसायाची उत्तम जाण असणारे प्रमोद कांबळे शिल्पाकृतींचा विविध प्रकारे वापर करून त्यांतून यशस्वी व्यावसायिक शिल्पकार म्हणून नावारूपाला आले आहेत. ११ मे २०२२ रोजी त्यांना नेपाळचा 'लुंबिनी वर्ल्ड पीस ' हा सन्मान जाहीर झाला.

        - डॉ. नयना कासखेडीकर

कांबळे, प्रमोद दत्तात्रेय