Skip to main content
x

कीर्तने, नीलकंठ जनार्दन

       नीळकंठ जनार्दन कीर्तने हे विनायकराव कीर्तने यांचे धाकटे बंधू. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरास व मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मुंबईस झाले. १८६७ मध्ये डेक्कन महाविद्यालयात असताना त्यांनी ‘ग्रँट डफ कृत मराठ्यांच्या बखरीवरील टीका’ हा प्रसिद्ध निबंध लिहिला व ‘पूना यंग मेन्स असोसिएशन’ या संस्थेपुढे तो निबंध वाचला. तेव्हा कृष्णशास्त्री चिपळूणकर हे अध्यक्ष होते व श्रोत्यात शंकर पांडुरंग पंडित होते. या उभय विद्वानांनी त्यांची खूप प्रशंसा केली. पंडितांनी तर हा निबंध आग्रहपूर्वक मागून घेऊन ‘इंदुप्रकाश’मध्ये छापला. या निबंधात सदर ग्रंथाचा कोतेपणा व प्रमाद दर्शवले आहेत. पुढे अस्सल कागदपत्रे शोधण्याने त्यांच्या निबंधातील विधानांना पुष्टीच मिळाली आहे. याशिवाय त्यांचे ‘टेंपेस्ट’ नाटकाचे मराठी भाषांतर व ‘लोकप्रिय हिंदू धर्म व त्याची योग्यता’ या  नावाचा एक निबंध प्रसिद्ध आहे. याशिवाय हमीर महाकाव्याचे (संस्कृत) त्यांनी केलेले संपादन प्रसिद्ध आहे. ‘इंडियन अँटिक्वेरी’ यांतही त्यांनी काही इंग्रजी लेख लिहिले होते. जावराव देवास धाकटी पाती यांच्या अधिपतींचे ते शिक्षक होते. देवासकडून यांना एक गावही त्याकरिता मिळाले होते. ते काही दिवस मंगळूर (काठेवाड) व देवास धाकटी पाती येथील दिवाणही होते.

ग्रँट डफवरील त्यांच्या निबंधाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या व भारतीय लोकांनी इतिहास संशोधनाचे काम हाती घेतले. त्यांनीच १८८२मध्ये ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ संपादण्यास सुरुवात करून पहिला खंड विविध ज्ञानविस्तारातून ; चिटणीसकृत शिवाजीच्या सप्तप्रकरणी चरित्ररूपाने काढला.

संपादित

कीर्तने, नीलकंठ जनार्दन