Skip to main content
x

लोलयेकर, अंजनीबाई

गोव्यातील लोलये या निसर्गसंपन्न गावी अंजनीबाईंचा जन्म झाला. सूर-लय त्या घरात हातात हात घालून गात होती. त्यांचे बंधू यशवंतबुवा हे ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते, तर दुसरे बंधू रामदासजी हे तबलावादक होते. या दोघांकडून अस्सल सूर-लयीची जाण अंजनीला बालवयातच मिळाली. वयाच्या चौदाव्या वर्षीच त्यांची जाहीर बैठक झाली आणि रसिकांच्या पसंतीस उतरली.

एकविसाव्या वर्षी ‘इंटरनॅशनल म्युझिक ऑफ कलकत्ता’ या संस्थेत त्यांना प्रवेश मिळाला. तिथे दोन वर्षे राहून अंजनीबाईंनी गाण्याची अथक साधना केली. त्यांनी हरिभाऊ घांग्रेकर यांच्याकडून ग्वाल्हेर गायकीचे संस्कार घेतले. यानंतर गाण्याची पारख आणि आवड असणार्‍या, धनवान आणि गुणवान अशा बाबूभाई बँकर यांच्या सहवासात त्या आल्या. ते आग्रा घराण्याची गायकी शिकायचे. अंजनीबाई अन्वर हुसेन खाँचे शिष्य गोविंदराव अग्नी यांच्याकडून आग्रा गायकीही शिकू लागल्या.

अंजनीबाई लोलयेकर यांनी देशभर गायनाच्या मैफली केल्या. दिल्ली, मद्रास, कलकत्ता (कोलकाता), ग्वाल्हेरचा तानसेन समारोह अशा ठिकाणच्या मैफली गाजल्या. मुंबई आकाशवाणीवर त्या अनेक वर्षे गात होत्या, तसेच एच.एम.व्ही.ने त्यांच्या अडाणा, बागेश्री, शंकरा, नटबिहाग या रागांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या, त्या खूप गाजल्या.

सुरेल गायकी, लोचदार, जव्हारदार आणि तीनही सप्तकांत मोकळा लागणारा असा त्यांचा आवाज होता. आग्रा घराण्याच्या शिरस्त्यानुसार त्या रागाची नोमतोम आलापी करत, त्यातील कणस्वर अत्यंत सुरेल आणि मुलायम लागत. प्रवाही उपज, भरपूर दमसास, रेखीव हरकती-मुरक्या ही त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्ये होती. रागदारीबरोबरच त्या ठुमरी व नाट्यसंगीतही उत्तम गात असत.

अनेक सामाजिक संस्थांसाठी अंजनीबाई लोलयेकर यांनी मैफली केल्या, तसेच मुक्त हस्ताने दानही केले. कन्या सुवर्णा बँकरला व इतर अनेक शिष्यांना त्यांनी आपली कला शिकविली. त्यांचा मुलगा साई बँकर हे उत्तम तबलावादक आहेत. अंजनीबाई लोलयेकरांचे मुंबईत निधन झाले.

डॉ. शुभदा कुलकर्णी

लोलयेकर, अंजनीबाई