माटे, श्रीपाद महादेव
प्रा.श्रीपाद महादेव माटे यांचा जन्म वर्हाडातील शिरपूर या गावी झाला. त्यांचे वडील महादेव हे संस्कृतविद्या पंडित म्हणून ‘महादेवशास्त्री’ या नावाने परिचित होते. त्यांच्या मातोश्री उमाबाई. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची होती. त्या दांपत्याला पाच मुलगे होते व श्री.म.माटे हे त्यांचे शेवटचे अपत्य. ते एक वर्षाचे असतानाच त्यांच्या पित्याचे छत्र हरपले. त्यानंतर त्यांच्या आईने माहेरचा आश्रय घेतला खरा; पण दारिद्य्राशी झगडण्यात व हालअपेष्टा सोसण्यात माटे व त्यांच्या भावांचे बालपण गेले.
विटे येथील प्राथमिक शाळेत माटे यांनी दुसरीत प्रवेश घेतला, तेव्हा त्यांचे मूळ नाव ‘श्रीपती’ हे बदलून ‘श्रीपाद’ झाले. १९०५साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९०६साली त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मात्र घरच्या गरिबीमुळे त्यांना तो विचार सोडावा लागला. १९०७साली सातार्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले. १९१२ साली शिक्षणाच्या हव्यासापोटी ते बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पुन्हा त्याच शाळेत शिक्षकाची नोकरी करू लागले. १९११ साली ते लक्ष्मीबाईंशी विवाहबद्ध झाले. त्याच सुमारास त्यांनी पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
१९१५ साली ते इंग्लिश व मराठी विषय घेऊन एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. ‘सरकारी नोकरी करणार नाही’, असा त्यांनी निर्धार केलेला असल्यामुळे १९१३पासूनच विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्थापन केलेल्या पुण्याच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये ते इंग्रजी विषयाचे अध्यापक झाले.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शिक्षकाचे उत्पन्न अगदीच तुटपुंजे असायचे. त्यामुळे उत्पन्न वाढावे म्हणून त्यांनी इंग्रजी विषयाच्या खासगी शिकवण्या घेणे सुरू केले. पुढे त्याचेच रूपांतर ‘इंग्रजीच्या क्लास’मध्ये झाले. उत्पन्न वाढले खरे; पण त्याच वेळी त्यांनी हाती घेतलेल्या अस्पृश्योद्धाराच्या कामी ते उत्पन्न खर्ची पडू लागले.
त्याच सुमारास ‘वसंत व्याख्यानमाले’च्या चिटणीसपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि तेव्हापासून त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली. १९१७पासून त्यांच्या अस्पृश्यता-निवारणाच्या कार्याला गती मिळाली. १९२०पासून पुण्याच्या ‘नूतन मराठी विद्यालया’त इंग्लिश विषयाचे शिक्षक म्हणून ते रुजू झाले. १९३५मध्ये त्यांची पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९१७ ते १९३७ ही वीस वर्षे त्यांनी अस्पृश्यांच्या सेवेत व्यतीत केली. १९४३ साली सांगली येथे भरलेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे ते अध्यक्ष झाले. १९४५ साली स.प.महाविद्यालयातून निवृत्त झाल्यावर पुण्याच्या ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चे ते कार्याध्यक्ष म्हणून काम पाहू लागले. १९४९ साली पुण्याच्या नातूबागेत त्यांनी स्वतःची ‘अनामिका’ नावाची बंगली बांधली. तेथेच त्यांचे शेवटपर्यंत वास्तव्य होते.
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकवत असतानाच गोपाळ गणेश आगरकर यांचे अनुयायी सीतारामपंत गणेश देवधर आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारसरणीचा प्रभाव माटे यांच्यावर पडलेला होता आणि त्यातूनच त्यांना निरपेक्ष बुद्धीने सार्वजनिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. दारिद्य्राचा अनुभव त्यांनी बालपणी घेतलेला होता; त्यामुळे अस्पृश्य समाजाची उच्चवर्णीयांकडून होणारी अक्षम्य उपेक्षा, शिक्षणाचा अभाव, त्यांची सामाजिक व आर्थिक मुस्कटदाबी, गुणांना वाव न मिळाल्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेले दारिद्य्र, त्यांचा इतरांकडून होणारा अपमान, हीन लेखल्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेली तुच्छता या सार्यांची जाणीव माट्यांना तीव्रतेने झाली. उच्चवर्णीयांची या उपेक्षित व वंचित वर्गाकडे पाहण्याची पूर्वग्रहदूषित दृष्टी बदलणे त्यांना अत्यावश्यक वाटले. समाजाची खरी प्रगती व्हायची असेल, तर संपूर्ण समाजाचे परिवर्तन होणे गरजेचे आहे. उपेक्षित समाजाला विकासाची संधी मिळालीच पाहिजे, अशी त्यांची धारणा होती.
पुण्यातील मातंग वस्तीत रात्रीच्या शाळा स्वखर्चाने चालविण्याचे अत्यंत मोलाचे, समाजसुधारणेचे कार्य त्यांनी आपल्या आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात (तिशीपासून ते पन्नाशीपर्यंत) अविरतपणे, निष्कामबुद्धीने आणि जिद्दीने चालविले. मांगवाड्यात पहिली शाळा, मंगळवार पेठेतील महार वस्तीत दुसरी शाळा, नारायणपेठेत नदीकाठी तिसरी शाळा अशा एकूण बावीस शाळा त्यांनी सुरू केल्या. या कार्यामागील हेतू अस्पृश्योद्धार करणे व शिक्षणाचा संस्कार करणे हा होता.
माट्यांनी ‘अस्पृश्य’ या शब्दाऐवजी ‘अस्पृष्ट’ या शब्दाची योजना हेतुपूर्वक केली. (अस्पृश्य- स्पर्श करण्यास अयोग्य; अस्पृष्ट- एके काळी अस्पृश्य मानले गेलेले पण आता बरोबरीच्या नात्याने वागवले जाणारे.) या कार्यात त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांचे बहुमोल सहकार्य मिळाले. या उपेक्षित वर्गाला त्यांनी स्वच्छतेचे धडे दिले; त्यांच्या अडचणी, व्यथा सहानुभूतीने ऐकून, त्यांना शक्य तेवढी मदत करण्याचा वसा माट्यांनी घेतला होता. हे कार्य करीत असताना पुण्यातील कर्मठ, सनातनी वर्गाकडून त्यांना अपमान, मनस्ताप सोसावा लागला. ‘महार माटे’, ‘महारडे माटे’ अशी बिरुदे त्यांना कुत्सितपणे बहाल करण्यात आली; पण या विरोधाला आणि सनातन्यांच्या निंदानालस्तीला न जुमानता आपल्या ध्येयावरील निष्ठा त्यांनी अबाधित ठेवली.
या सामाजिक कार्याबरोबरच समाजप्रबोधनाचे इतर उपक्रमही त्यांनी हाती घेतले होते. ‘वसंत व्याख्यानमाले’ची धुरा सांभाळत असताना अनेक मान्यवरांची, विचारवंतांची व्याख्याने आयोजित करून त्यांनी महाराष्ट्रातील श्रोत्याला अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर विचार करण्यास उद्युक्त केले. ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या कार्याध्यक्षपदी असताना त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. कोशवाङ्मयासाठी निधिसंकलन, विष्णुशास्त्री चिपळूणकर सभागृहाची उभारणी, चिपळूणकर सभागृहातील ‘वा.गो.आपटे संदर्भ संग्रहालया’ची निर्मिती असे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले. वाङ्मयेतिहासाची अकरा खंडांची भव्य कल्पना मात्र पुढे प्रत्यक्षात येऊ शकली नाही.
जीवनवादी लेखक
श्री.म.माटे यांनी आपल्या आयुष्यातील पंचेचाळीस वर्षांचा प्रदीर्घ काळ साहित्याची निर्मिती करण्यात आणि महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाच्या कार्यात व्यतीत केला. त्यांची वाङ्मयनिर्मिती ही त्यांच्या सामाजिक कार्याचेच एक अविभाज्य अंग आहे; त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान व त्यांनी लिहिलेले ललित वा ललितेतर वाङ्मय यांत एक अतूट अनुबंध आहे. मानवी जीवन सुंदर, समृद्ध आणि अर्थपूर्ण बनविण्याच्या ध्यासातून त्यांचे साहित्य सिद्ध झाले आहे. ‘ललित वाङ्मयाने मतप्रचार आणि मतपरिवर्तन होत नाही, असे म्हणणार्यांचा दावा चुकीचा आहे’; असे त्यांचे स्पष्ट मत होते. ‘जे-जे समाजहिताचे वाटते, ते-ते लिहून प्रकट करायला आपण बांधील आहोत,’ या भूमिकेतूनच त्यांनी वाङ्मयनिर्मिती केली. आचार्य अत्रे यांनी माटे यांना ‘खरे जीवनवादी लेखक’ म्हटले आहे, ते सर्वार्थाने योग्य आहे.
विविध विषयांवरची त्यांची एकूण चाळीस पुस्तके प्रसिद्ध आहेत. (‘विज्ञानबोधनाची प्रस्तावना’ ही प्रदीर्घ प्रस्तावना धरून)
त्यांच्या साहित्यनिर्मितीतील परिश्रमपूर्वक सिद्ध केलेला अत्यंत महत्त्वाचा, पण उपेक्षित राहिलेला ग्रंथ म्हणजे ‘अस्पृष्टांचा प्रश्न.’ या पुस्तकातील पहिल्या साडेचारशे पृष्ठांत अस्पृश्यतेच्या समस्येची सांगोपांग तात्त्विक चर्चा त्यांनी केलेली आहे. उरलेल्या पृष्ठांत अस्पृश्यता निवारणाच्या कार्यातील त्यांना आलेल्या अनुभवांचे वास्तव कथन आहे. भटक्या जमातींच्या समस्यांचा ऊहापोहही या ग्रंथात केलेला आहे. सर्वेक्षण, आकडेवारी, विविध प्रश्नावली व त्यांच्या उत्तरांतून मिळालेली महत्त्वाची माहिती आणि या सर्वांच्या आधारे माटे यांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धान्त असे या ग्रंथांचे स्वरूप आहे.
या ग्रंथामागील त्यांची भूमिका प्रचारकाची नसून समाजशास्त्रज्ञाची आहे. ‘हा ग्रंथ म्हणजे अस्पृश्यतेच्या प्रश्नांचा ज्ञानकोश आणि समाजशास्त्रीय अभ्यासकांसाठी अमोल खजिना आहे’, असे प्रा.स.गं.मालशे यांनी समर्पक शब्दांत प्रस्तुत ग्रंथाचे मूल्यमापन केलेले आहे. मात्र या ग्रंथात माट्यांनी वंशशुद्धीचे जे समर्थन केलेले आहे, ते कालबाह्य वाटल्यामुळे आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘सनातनी सुधारक’ म्हटले आहे. ह्या ग्रंथातून माट्यांच्या पांडित्याचे, तर्कनिष्ठतेचे, चिंतनशीलतेचे आणि सहृदयतेचे दर्शन घडते, हे निःसंशय.
‘परशुरामचरित्रा’त हिंदू समाजरचनेतील तत्त्वांची सूक्ष्म दृष्टीने केलेली चिकित्सा असून, हिंदू समाजाच्या जडणघडणीचा वेध ‘पंचमानव हिंदू समाज’ म्हणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. ‘विज्ञानबोध’ या ग्रंथाला लिहिलेली प्रदीर्घ प्रस्तावना ही त्यांच्या विज्ञाननिष्ठेची द्योतक आहे. ‘विज्ञाननिष्ठेची जोपासना झाल्याशिवाय सांस्कृतिक जीवन खर्या अर्थाने समृद्ध होणार नाही,’ असे आग्रहाचे प्रतिपादन प्रस्तुत प्रस्तावनेत आहे. ‘गीतातत्त्वविमर्श’ या ग्रंथातील लेखातून लोकमान्य टिळकांच्या काही विधानांशी, निष्कर्षांशी असलेला त्यांचा मतभेद, गीतेत त्यांना जाणवलेली अतार्किकता त्यांनी निर्भीडपणे व्यक्त केली आहे.
‘साहित्यधारा’, ‘विवेकमंडन’, ‘विचारशलाका’ इत्यादी ग्रंथांतील निबंध हे अनेक विषयांवरील स्फुटलेख आहेत. जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे हे लेख माट्यांनी तात्त्विक व व्यावहारिक अशा दोन्ही दृष्टींनी लिहिलेले आहेत. या लेखांतून त्यांची तर्कशुद्ध विचारसरणी, तत्त्वनिष्ठा, सत्यशोधक वृत्ती, सामाजिक जाणीव, सूक्ष्म अवलोकन, सहृदयता, आंतरिक तळमळ, प्रवृत्ती व परमार्थ यांची सांगड घालण्याचा समतोलपणा यांचे लोभस दर्शन घडते.
प्राचीन मराठी वाङ्मयाचा-विशेषतः संतसाहित्याचा चिकित्सक अभ्यास, हे माट्यांचे अत्यंत आवडते क्षेत्र होते. ‘रामदासांचे प्रपंचविज्ञान’ आणि ‘संत, पंत आणि तंत’ या त्यांच्या पुस्तकांत संतसाहित्याचे परिशीलन ते सामाजिक दृष्टिकोनातून करतात. तुकाराम, चोखोबा इत्यादी संतांच्या वाट्याला विषमतेमुळे आलेला छळ त्यांना व्यथित करतो. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास हे त्यांचे विशेष आवडते संत होते. सर्वच संतांबद्दल त्यांना वाटणारी आत्मीयता व्यक्त करताना माट्यांची रसिकता, सश्रद्धता आणि हळुवारपणा ह्यांचा प्रत्यय येतो, त्याचप्रमाणे त्यांची तर्कनिष्ठता आणि सामाजिक आशय शोधण्याची वृत्तीही जाणवते.
उपेक्षितांच्या अंतरंगात
कथावाङ्मयाकडे माटे उशिराच- म्हणजे वयाच्या पन्नाशीत- वळले खरे; पण एक अत्यंत यशस्वी लेखक म्हणून त्यांना मान्यता मिळाली, ती त्यांच्या ‘उपेक्षितांचे अंतरंग’ यातील कथांमुळे. तंत्रात न बसणार्या, पण विलक्षण जिवंत अनुभूतींनी रसरसलेल्या वास्तववादी घटना व व्यक्तिचित्रे यांचे समर्थपणे रेखाटन करणार्या आणि म्हणून वाचकाच्या हृदयाला हात घालणार्या या अत्यंत प्रभावी कथा आहेत. या कथांचे वेगळेपण लेखकाच्या जीवनदृष्टीत आहे. लोकानुरंजन हा ह्या कथांचा हेतू नाही. उपेक्षितांच्या अंतरंगाचे दर्शन घडवणे आणि वाचकाला अंतर्मुख करणे हे या कथांच्या निर्मितीमागील हेतू आहेत.
कथावाङ्मयात त्या काळात चित्रित न झालेले उपेक्षितांचे विश्व माट्यांनी प्रथमच या कथांतून साकारले. प्रत्यक्ष पाहिलेल्या या उपेक्षित वर्गाच्या व्यथा-वेदना, त्यांच्यावर होणारे अन्याय, त्यांना नाकारलेल्या संधी हे सारे त्यांनी आपल्या कथांमधून शब्दबद्ध केल्या, मुक्या वेदनांना बोलके केले आणि मराठी रसिकांची मने जिंकली. या कथांतील अनुभवांचा सच्चेपणा, हेच या कथांचे सामर्थ्य होय.
‘शैलीकार माटे’ हे भूषणही त्यांना कथालेखनानंतर मिळाले. लेखकाची उत्कट संवेदनशीलता, सामाजिक अन्यायाबद्दल कणव आणि तो दूर व्हावा यासाठी त्यांची धडपड, उपेक्षित वर्गाच्या भाषेचे वेगळेपण आत्मसात करण्याची वृत्ती, सहज स्वाभाविकपणे साकारणारे जिवंत अनुभव आणि प्रतिभेचा दिव्य स्पर्श ही त्यांच्या कथेची सामर्थ्ये आहेत. त्यांच्या कथा म्हणजे जीवनावरील भाष्याचे उत्कृष्ट नमुनेच होत. ‘अनामिका’, ‘माणुसकीचा गहिवर’, ‘भावनांचे पाझर’ इत्यादी संग्रहांतील कथाही उत्कट अनुभव व लेखकाची प्रामाणिक तळमळ यांमुळे अत्यंत प्रत्ययकारी झालेल्या आहेत.
त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र - ‘चित्रपट- मी व मला दिसलेले जग’ माट्यांचे हे आत्मकथन वाचकांना अनेक प्रकारचे ज्ञान देते. माट्यांचा काळ, त्या काळची प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे, जिवंत व रोचक वर्णने, आपले खासगी जीवन व आलेले बरेवाईट अनुभव, अलिप्तपणे केलेले आत्मपरीक्षण, परिपक्वता व सहृदयता यांचा सुरेख संगम अशा कितीतरी दृष्टींनी हे आत्मचरित्र वाचनीय झालेले आहे. त्यांच्या चिंतनशील व्यक्तिमत्त्वाचा सुंदर आविष्कार म्हणजे हे आत्मचरित्र होय. त्यांचे हे आत्मचरित्रदेखील सामाजिक बांधीलकीच्या भूमिकेतून त्यांनी लिहिलेले आहे. सारांश, महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे व प्रमुख शिल्पकार म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले आहे.
- डॉ. यास्मिन शेख