Skip to main content
x

मंचरकर, रत्नाकर बापूराव

     रत्नाकर मंचरकर यांचा जन्म वडनिरे, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे झाला. जून १९६६पासून रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यायां-मधून त्यांनी मराठीचे अध्यापन केले. अनेक सार्वजनिक शैक्षणिक, साहित्यिक संस्थांशी ते संबंधित होते व त्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. जुनी नवी साहित्य मीमांसा, नवे वाङ्मयप्रवाह, तौलनिक साहित्याभ्यास ही मंचरकरांच्या अभ्यासाची क्षेत्रे होत. विविध नियतकालिकांतून त्यांचे लेखन प्रकाशित झाले. त्यांना विविध ग्रंथपुरस्कार व संशोधन पुरस्कार, पारितोषिके मिळाली. त्यांनी संपादने, संहिता संपादने आणि सर्वांगीण संशोधनात्मक लेखन, सूत्रसंचालने इत्यादी कार्य केले. विशेषतः मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा सखोल व संशोधनात्मक अभ्यास व लेखन केले.

     त्यांच्या ‘भाषाशास्त्रविचार’ (१९७५) या ग्रंथाला शिवाजी विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार (१९७६) मिळाला. ‘मुक्तेश्वरांची कविता : खंड पहिला :  आख्यानक व स्फुट कविता’ (१९८३), ‘मुक्तेश्वरांची कविता : खंड दुसरा : संक्षेपरामायण’ (१९८३), या दोन्ही खंडांना महाराष्ट्र शासनाचा ‘समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र’ या विभागातील सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार (१९८४) मिळाला.

     ‘मुक्तेश्वरांची कविता : खंड तिसरा : महाभारत’ (१९८७) या खंडाला हणमंते संशोधन पारितोषिक, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा, पुणे (१९८९) मिळाले.

     तसेच वरील तिन्ही खंडांना आधारभूत असलेल्या पीएच.डी. प्रबंधास ‘वि.रा.करंदीकर संशोधन पारितोषिक’ शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (१९८२) मिळाले आहे.

     ‘गो.म.कुळकर्णी यांची समीक्षा: परिचय आणि परामर्श’ (१९९०) या ग्रंथाला गो.म.कुळकर्णी गौरव समिती, पुणे (१९९०) व महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा पुणे, यांचे पारितोषिक (१९९१) मिळाले.

     त्यांची ‘एकनाथ आणि मुक्तेश्वर’ (१९८५), ‘धर्मसंप्रदाय आणि मध्ययुगीन मराठी वाङ्मय’ (२०००), ‘तौलनिक साहित्याभ्यास आणि मध्ययुगीन मराठी वाङ्मय’ (२००६) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘ज्ञानेश्वरी’ अध्याय दुसरा (१९६८), सातवा (१९७२), अध्याय पहिला (१९९५) ‘सामराजकृत रुक्मिणीहरण’ (१९६९) ही त्यांची संहिता संपादने आहेत.

     ‘त्रिदल’ - साहित्य, समाज व शिक्षणविषयक लेखसंग्रह (१९८३), ‘वाङ्मयाचे महाविद्यालयीन अध्यापन’, ‘दु.का.संत गौरवग्रंथ’ (१९८७), ‘वीरशैव संप्रदाय’: डॉ.वा.ग.कल्याणकर गौरवग्रंथ (१९८९) ही सूत्र संपादने व ‘राजकीय तत्त्वप्रणाली- सिद्धान्त आणि व्यवहार’, अ‍ॅड. रावसाहेब शिंदे गौरवग्रंथ सहकार्याने, भोर गौरव समिती (१९८९) अशी त्यांची साहित्यसंपदा आहे.

     वेगवेगळे ग्रंथ, प्रस्तावना, कोश आणि वाङ्मयीन नियतकालिकांतून त्यांचे निरनिराळ्या विषयांवरील शोधनिबंध प्रकाशित झाले. विषय व शोधनिबंध पुढीलप्रमाणे आहेत: ‘भाषा आणि भाषाविज्ञान’ (८ लेख) ‘मध्ययुगीन मराठी वाङ्मय’ (१०१ लेख); त्यांत ‘संतकवी आणि संतसाहित्य’ (३४ लेख), ‘पंडित कवी आणि पंडिती काव्य’ (२४ लेख), ‘धर्मसंप्रदाय आणि मध्ययुगीन मराठी वाङ्मय’ (९ लेख), ‘मध्ययुगीन मराठी  वाङ्मयाचा तौलनिक अभ्यास’ (१३ लेख), ‘मध्ययुगीन मराठीचा साहित्यिक भूगोल’ (५ लेख), ‘मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास’ (२ लेख), ‘मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या समीक्षकांचा परामर्श’ (१० लेख), ‘प्राचीन साहित्यविचार’ (४ लेख) तसेच ‘वाङ्मयाचे अध्यापन’ (५ लेख), ‘वाङ्मयाचे संशोधन’ (७ लेख) यावरचे लेख अभ्यासकांना, विशेषतः प्राचीन मराठी वाङ्मयाच्या अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त ठरतात.

     अर्वाचीन मराठी वाङ्मयातील काही विषयांवरही मंचरकरांनी प्रकाश टाकला आहे. ‘अर्वाचीन मराठी साहित्य आणि साहित्यिक’ (१९ लेख), ‘ग्रामीण-दलित-स्त्रीवादी-जनसाहित्य’ (१६ लेख), तसेच ‘अर्वाचीन मराठी साहित्यविचार आणि समीक्षा यांविषयीचे चिंतन’, ‘अर्वाचीन साहित्यविचार’ (८ लेख), ‘अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या समीक्षकांचा परामर्श’ (६ लेख) आणि ‘समीक्षा आणि समीक्षापद्धती’ (११ लेख), असे बहुविध लेख लिहून त्यांनी समीक्षकाची योगदान करण्याची भूमिका पार पाडली .

     मराठीतील प्राचीन, अर्वाचीन साहित्याविषयी समकालीन वाङ्मयप्रवाहाच्या संदर्भात सातत्याने चिंतन-लेखन करून मंचरकरांनी मराठी वाङ्मय क्षेत्राला न्याय दिला आहे. मूलगामी संशोधन, सहृदय आकलन, चिकित्सक प्रतिपादन आणि विश्लेषक निष्कर्षण यांमुळे मंचरकरांचे संशोधनात्मक लेखनही सर्वांना आकर्षित करते आणि म्हणून वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

- प्रा. अनुराधा साळवेकर

मंचरकर, रत्नाकर बापूराव