Skip to main content
x

मराठे, रामचंद्र पुरुषोत्तम

राम मराठे

रामचंद्र पुरुषोत्तम मराठे यांचा जन्म पुण्याला झाला. त्यांच्या आई-वडिलांना गाण्याची आवड होती. रामभाऊंचे वडील त्या वेळी गावाला उत्सवात होणार्‍या संगीत नाटकांत ‘स्त्री’भूमिका करत. घरातून गाण्याला पोषक असेच वातावरण होते. वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत पुण्याच्या भावे स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले.

रामभाऊ लहान असताना ते घरातील डबे डग्गा-तबला म्हणून वाजवत. तबल्याची आवड ओळखून त्यांच्या वडिलांनी अंबीटकर मास्तर यांच्याकडे त्यांचे तबला वादनाचे शिक्षण सुरू केले. त्यांनी १९३३ ते १९३५ च्या दरम्यान सागर फिल्म कंपनीमधून हिन्दी आणि गुजराती बोलपटांतून प्रसिद्ध दिग्दर्शक मेहबूब यांच्या हाताखाली ‘मनमोहन’, ‘जहागीरदार’, ‘वतन’ या बोलपटांत भूमिका केल्या.

रामभाऊंची मोठी बहीण ‘गोपाळ गायन समाजा’त गाणे शिकत होती. रामभाऊ तिच्याबरोबर तबल्याच्या साथीला जात. ‘प्रभात फिल्म कंपनी’मधील मंडळी ‘गोपाळकृष्ण’ या चित्रपटासाठी बाल कलाकाराच्या शोधात गोपाळ गायन समाजात गेली. तेव्हा कृष्णाच्या भूमिकेसाठी रामभाऊंची निवड झाली. ‘गोपाळकृष्ण’ हा संगीतप्रधान चित्रपट खूप गाजला. त्यानंतर रामभाऊंनी प्रभातच्याच ‘माणूस’ या चित्रपटातील ‘रामू चायवाला’ ही महत्त्वपूर्ण भूमिका केली. ते १९३७ ते १९४० या काळात ‘प्रभात’मध्ये होते.

नंतर मिनर्व्हा मुव्हिटोन, जयंत पिक्चर्स, मेहबूब फिल्म्स, विजय भट्ट यांच्या ‘संत तुळशीदास’, ‘डेक्कन क्वीन’ अशा हिंदी चित्रपटांत रामभाऊंनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. रामभाऊंनी १९५३ मध्ये ‘अनंत फंदी’ या शाहिराच्या जीवनावर आधारित चित्रपटात अनंत फंदीची भूमिका केली.

घरंदाज गायक म्हणून नाव मिळवायचे अशी त्यांची इच्छा होती. मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्याजवळ त्यांचे शिक्षण सुरू झाले. मास्तरांच्या मागे तंबोर्‍याच्या साथीला बसण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. मास्तरांचे गाणे ते टिपकागदाप्रमाणे टिपत गेले. राम मराठे यांनी पं. मिराशीबुवा यांच्याकडे ग्वाल्हेर गायकीचे शिक्षण घेतले. मध्यंतरीच्या काळात ते पुण्याहून दादरला स्थायिक झाले. खोददाद सर्कलला पं. मनहर बर्वे यांच्याकडे विद्यार्थ्यांना शिकवून रात्री १२ पर्यंत मनहर बर्वे यांच्याजवळ ते शिकत असत. मनहर बर्व्यांचे मेहुणे श्री. काळे हे देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य. वामनराव सडोलीकर यांच्याकडून त्यांनी जयपूर गायकीची तालीम घेतली.

याच सुमारास स्नेहल भाटकरांसारख्या संगीतकारांनी काही भावगीते रामभाऊंकडून गाऊन घेतली, उदा: ‘शाम मनोहर माझा’, ‘प्रेमळ भाव तुझ्या मनीचा’. तसेच आकाशवाणीचे कार्यक्रमही सुरू होते.

रामभाऊंनी ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत स्वयंवर’, ‘संगीत शारदा’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘एकच प्याला’, ‘मृच्छकटिक’ या नाटकांत नायकांच्या भूमिका केल्या.

रामभाऊ कोल्हापूरला कार्यक्रमानिमित्त गेले असताना गुणिदास ऊर्फ जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याशी त्यांची गाठ पडली. बुवा मुंबईला आले, तेव्हापासून रामभाऊ जगन्नाथबुवांकडे शिकायला जाऊ लागले. रामभाऊंनी उ.विलायत हुसेन खाँसाहेबांकडूनही आग्रा गायकीचे शिक्षण घेतले. थोडा काळ बी.आर. देवधरांकडूनही ते शिकले. विद्याधर गोखल्यांची ‘सुवर्णतुला’, ‘मंदारमाला’, ‘जय जय गौरीशंकर’, ‘मेघमल्हार’ अशी नाटके १९६० च्या सुमारास रंगभूमीवर आली. त्यांत रामभाऊ नायकांच्या भूमिका करत. रामभाऊंनी ‘मंदारमाला’, ‘मेघमल्हार’, ‘रंगात रंगला श्रीरंग’ या नाटकांचे संगीत दिग्दर्शन केले. ते तबला उत्तम वाजवत. ‘मंदारमाला’ नाटकात शिकवणीच्या दृश्यात रामभाऊ स्वत: तबला वाजवून गात असत.

रामभाऊंनी विविध रागांमध्ये सुंदर बंदिशी केल्या. त्यांनी भारतभर असंख्य मैफली केल्या. स.का.पाटील यांच्या हस्ते त्यांना १९५१ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे ‘संगीत भूषण’ ही पदवी प्राप्त झाली. शंकराचार्यांच्या हस्ते ‘संगीत चूडामणी’, ‘बालगंधर्व’ सुवर्णपदक, ‘नाट्यदर्पण’ पुरस्कार, ‘विष्णुदास भावे’ पुरस्कार, तसेच जागतिक मराठी नाट्य परिषदेतर्फे त्यांना विशेष सन्मान मिळाला. १९८७ चा संगीत नाटक अकादमीचा ‘राष्ट्रपती पुरस्कार’ही त्यांना प्राप्त झाला. ते ‘ऑल इंडिया रेडियो’च्या ऑडिशन कमिटीवर होते.

आपल्या गुरुजनांखेरीज रहिमत खाँ, बडे गुलाम अली, सलामत अली, विनायकराव पटवर्धन, केसरबाई, सिद्धेश्वरी देवी, मास्टर दीनानाथ व वझेबुवांसारख्या गवैयांच्या गायकीची नक्कल ते अस्सलपणे करीत व तोही रंग आपल्या मैफलीत आणत. पल्लेदार, बिकट तानक्रिया, लयतालावर विलक्षण हुकमत, बोलअंगाचा उत्तम वापर करणारे रामभाऊ ‘जोडरागांचे बादशहा’ म्हणून गौरविले जात.

ग्वाल्हेर, जयपूर व आग्र या तीन घराण्यांचा संगम असणार्‍या पं.भास्करबुवा बखले प्रणीत गायकीचा वारसा पं.राम मराठे यांनी पुढे नेला. योगिनी जोगळेकर, विश्वनाथ बागूल, सुहास व सुधीर दातार, अरुण व उल्हास कशाळकर, प्रदीप नाटेकर, राजेंद्र मणेरीकर, तसेच पुत्र संजय व मुकुंद मराठे हे त्यांचे प्रमुख शिष्य होत. त्यांचे निधन ठाणे येथे १९८९ साली झाले.

प्रदीप नाटेकर

मराठे, रामचंद्र पुरुषोत्तम