Skip to main content
x

परांडेकर, माधव कृष्ण

      युष्यभर निसर्गचित्रण या विषयाचा ध्यास घेतलेल्या व वास्तववादी शैलीत पारदर्शक जलरंगांत निसर्गचित्रण करून प्रसिद्धीस आलेल्या माधव कृष्ण परांडेकर यांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे वडील संस्कृतचे गाढे अभ्यासक व पंडित होते. त्यांना जुन्या पद्धतीने पोथ्या व हस्तलिखितांसाठी देवादिकांची चित्रे काढण्याची कला अवगत होती. घरातील या वातावरणामुळे माधव यांना लहानपणी चित्रे काढण्याचा छंद लागला.

      ‘नखचित्रे’ या माध्यमात पोट्रेट करण्यात परांडेकरांचा हातखंडा होता. शालेय शिक्षण संपल्यानंतर ते १८९४ मध्ये सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टची फर्स्ट ग्रेडची परीक्षा उत्तीर्ण झाले. पण पुढील कलाशिक्षण मुंबईला जाऊन घेण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी अर्थार्जना-साठी काही काळ न्यायालयात उमेदवारीही केली.

      इ.स. १९०० च्या दरम्यान लोकमान्य टिळकांना त्यांनी आपली शिवाजी महाराज, नाना फडणीस, न्या.रानडे अशा व्यक्तींची नखचित्रे दाखविली. ती बघून लोकमान्यांनी परांडेकरांचे कौतुक करून मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार परांडेकरांनी १९०२ मध्ये वयाच्या पंचविसाव्या वर्षी जे.जे.त प्रवेश घेतला. तत्पूर्वीच त्यांचा आनंदीबाईंशी विवाह झाला.

      शालेय जीवनात त्यांनी चित्रकलेचा अभ्यास व सातत्याने सराव केला. वर्गातला पहिला क्रमांक त्यांनी कधीच सोडला नाही. आबालाल रहिमान यांच्यामुळे लहानपणापासून त्यांच्या मनात निसर्गचित्रणाची आवड निर्माण झाली होती. त्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी जे.जे.मध्ये घेतले. या काळात त्यांची मेजर लेस्ली या युरोपियन कलावंताशी ओळख झाली. ते लहान हत्याराने चामड्यावर उठावाची चित्रे काढीत असत. परांडेकरांनी काढलेली नखचित्रे पाहून लेस्ली यांनी परांडेकरांना चामड्यावरील उठावाचे (लेदर एम्बॉसिंग) तंत्र शिकविले. परांडेकरांनी ते लवकर आत्मसात केले.

      किंग लॉर्ड दी फिफ्थ हे १९०५ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स म्हणून मुंबईस आले असता मुंबई महापालिकेने  त्यांना मानपत्र दिले. आर्ट स्कूलच्या प्राचार्यांच्या सांगण्यावरून या मानपत्रासाठी परांडेकरांनी डिझाइन एम्बॉस केलेले विशेष आवरण तयार केले होते. त्यांनी राजे-महाराजांसाठी अशी अनेक कामे केली.

      मुंबईचे एक कलाप्रेमी पुरुषोत्तम मावजी यांनी ‘लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स’ स्थापन केली होती. या छापखान्यासाठी हजारो रुपये किमतीची यंत्रसामग्री जर्मनीहून मागवण्यात आली होती. परांडेकरांनी स्वत: डाय तयार करून या छापखान्यातील यंत्रसामग्रीच्या साहाय्याने अनेक चित्रे छापली होती.

      परंतु त्यांचा खरा पिंड निसर्गचित्रणाचा होता. त्यांनी आयुष्यभर तीच आवड जोपासली. आपले कलाशिक्षण पूर्ण झाल्यावर ते कोल्हापूरला परतले. तेथे काही दिवस त्यांनी कलाशिक्षकाची नोकरी पत्करली. परंतु त्यांचे मन त्या नोकरीत काही रमले नाही. मुंबईत सॅण्डहर्स्ट रोडवर सुरू केलेल्या स्टूडिओमुळे त्यांचे नशीब उजळले. मुंबईत राहून त्यांनी निसर्गचित्रणासाठी संपूर्ण हिंदुस्थानचा दौरा केला. काश्मीर, उत्तर हिंदुस्थानातील अमृतसर, बनारस, हिमाचल प्रदेश, तसेच नाशिक, वाईचे घाट आणि पाचगणी, महाबळेश्‍वर यांची असंख्य मनोहारी निसर्गचित्रे त्यांनी साकारली आहेत.

      महाबळेश्वरच्या चित्रामुळे परांडेकरांचे भाग्य उजळले. त्या काळात गव्हर्नरांचे निवासस्थान उन्हाळ्यात महाबळेश्‍वरला असे. परांडेकर तेथे निसर्गचित्रणासाठी जात असत. ही माहिती गव्हर्नरांना मिळाल्यावर मुंबईत ३० नोव्हेंबर १९१६ रोजी गव्हर्नरांनी  निरोप पाठवून परांडेकरांना बोलावून घेतले. त्यांची चित्रे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन व लेडी विलिंग्डन यांना आवडली व त्यांनी काही चित्रे विकत घेतली, तसेच गव्हर्नर हाउससाठी निसर्गचित्रे काढण्याची कामगिरी सोपवली. परांडेकरांनी ती अशी काही उत्कृष्टरीत्या पार पाडली, की गव्हर्नरांनी खूष होऊन त्यांना ‘आर्टिस्ट टू हिज एक्सलन्सी गव्हर्नर ऑफ बॉम्बे’ असा सन्मान दिला. यामुळे परांडेकरांची प्रसिद्धी होऊन त्यांची कीर्ती अनेक संस्थानिकांपर्यंत पोहोचली. बिकानेरचे संस्थानिक गंगासिंग बहादूर यांनी परांडेकरांना अनेकदा बिकानेरला आमंत्रित करून त्या शहरातील सुप्रसिद्ध ठिकाणांची चित्रे काढून घेतली. त्या काळात फक्त ‘निसर्गचित्रणा’वर उदरनिर्वाह करून स्वाभिमानाने जगणारे परांडेकर हेच एकमेव चित्रकार असावेत.

      परांडेकरांना अनेक मानसन्मान मिळाले. यांत १९१२ मधील बॉम्बे आर्ट सोसायटीचा रौप्यमहोत्सव, म्हैसूर दसरा एक्झिबिशन अशा अनेक पारितोषिकांचा समावेश आहे. ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची  १९१८ मध्ये स्थापना करण्यात परांडेकरांचा महत्त्वाचा सहभाग होता. या संस्थेच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य महत्त्वाचे असून काही काळ ते बॉम्बे आर्ट सोसायटीच्या समितीवरही कार्यरत होते. परांडेकरांच्या हस्ते १९५८ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. पुण्यात १९४३ मध्ये भरलेल्या चित्र-शिल्पकार संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

      वास्तववादी शैलीत बारीक तपशिलासह निसर्गचित्र काढताना यथार्थ दर्शनाबरोबर अचूक रेखाटन करण्यात त्यांचा हातखंडा होता. पारदर्शक जलरंगांचा उत्कृष्ट वापर, परिप्रेक्ष्याचा आभास, प्रमाणबद्धता, मनमोहक रंगसंगती व चैतन्यदायी वातावरणनिर्मिती ही परांडेकरांच्या चित्रांची वैशिष्ट्ये आहेत. जलरंगांत चित्र रंगवताना रंगांचा ताजेपणा राखण्याचे त्यांचे कौशल्य थक्क करणारे आहे. त्यामुळेच त्यांच्या चित्रांतून निसर्गाच्या विविध रूपांचा प्रत्यय येण्याऐवजी, एक आकर्षक असे स्वप्नच चित्रफलकावर निर्माण होते. ही सर्व चित्रे जलरंगांतून साकारल्याने व चित्रातील बारीकसारीक तपशील भरून चित्रे पूर्ण केल्याने ती चित्रे छायाचित्रणाचा आभास निर्माण करतात. परांडेकरांची कलकत्ता, मद्रास, लाहोर, पुणे, मुंबई, सिमला इत्यादी ठिकाणच्या प्रदर्शनांत मांडलेली चित्रे लगेच विकली जात.

      लोकाश्रय व राजाश्रयाबरोबरच मानसन्मान प्राप्त करणाऱ्या परांडेकरांचे वयाच्या चौऱ्यांऐंशीव्या वर्षी निधन झाले.

- प्रा. सुभाष पवार

परांडेकर, माधव कृष्ण