Skip to main content
x

साधले, आत्माराम नीळकंठ

आनंद साधले

     संस्कृत विदग्ध साहित्याचा मराठी वाचकांना ललित शैलीत परिचय करून देण्याचे महत्त्वाचे काम आनंद साधले यांनी केले आहे. स्वतःला आवडलेले हे काम मनापासून करता यावे म्हणून पोस्टखात्यातील नोकरीत त्यांनी कायम रात्रपाळी मागून घेतली होती. साधले संस्कृतचे पंडित नव्हते, किंबहुना त्यांचे संस्कृत ज्ञान फार जुजबी होते, तरी आवड म्हणून संस्कृत साहित्याचा सानुवाद अभ्यास त्यांनी केला आणि आपल्या देवदत्त प्रतिभेच्या साहाय्याने त्यावर आधारित बरीच साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली. आयुष्याच्या उत्तरकाली प्रथम पत्नीशी घटस्फोट घेऊन त्यांनी हैदराबाद येथील संस्कृत प्राध्यापक नलिनी पराडकर यांच्याशी विवाह केला. ऐच्छिक निवृत्ती घेऊन वयाच्या पंचावन्न-छप्पन्नाव्या वर्षी ते हैदराबादला स्थायिक झाले, ते निधनापर्यंत तेथेच राहिले. अशा प्रकारे मुंबई आणि हैदराबाद ही त्यांची कर्मभूमी होती.

     आनंद साधले यांचे साहित्य स्थूलमानाने असे विभागता येईल : संशोधनपर निबंध, आत्मनिष्ठ ललित साहित्य, कथा साहित्य आणि अनुवाद. अनुवादात भावानुवाद आणि भाषांतर असे दोन्ही प्रकार आहेत. त्यांच्या संशोधनपर साहित्यात महाभारत आणि रामायण यांवरील साहित्य प्रामुख्याने विचारात घ्यावे लागेल. त्यातही महाभारतावरील त्यांचे पुस्तक ‘हा जय नावाचा इतिहास आहे’, हे भल्या-बुर्‍या, दोन्ही अर्थांनी गाजले. त्याच काळात लिहिल्या गेलेल्या ‘युगान्त’, ‘व्यासपर्व’ इ. पुस्तकांच्या पठडीतले हे पुस्तक असून त्यातील अनेक विधानांचा परामर्श प्रा. अ.दा. आठवले यांनी ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ या ग्रंथात घेतला आहे.

     ‘परि हरि हा ब्रह्मचारी’ या पुस्तकात श्रीकृष्ण हा रंगेल, कामुक नव्हता जसा तो चित्रकार आणि काही कवींनी रंगविला आहे, तर विवाह होईपर्यंत तो ब्रह्मचारी होता हे अनेक ग्रंथांद्वारे सप्रमाण दाखवले आहे. याच पुस्तकातील ‘वसुंधरेचे स्तन्य उसळले’ या लेखात गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदादी नद्यांचे पुराणैतिहासिक साहित्य समन्वित झाले असे जे रसगर्भ वर्णन आहे, त्यात प्राकृतिक सौंदर्याच्या अनुभूतीने त्यांच्या मनात उसळलेल्या आनंदकल्लोळाचा प्रत्यय वाचकांनाही येतो. त्यांच्या या दोन्ही पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

     ‘शाकुंतल’, ‘मालविकाग्निमित्र’, ‘विक्रमोर्वशीय’, ‘मालती माधव’,  ‘वेणीसंहार’, ‘मृच्छकटिक’, ‘मुद्राराक्षस’ अशा प्रसिद्ध संस्कृत नाटकांचा अनुवाद साधले यांनी कादंबरीरूपात केला. ‘शकुंतला’, ‘मालविका’, ‘ऊर्वशी’, ‘मालती’, ‘द्रौपदी’, ‘वसंतसेना’, ‘चाणक्य’ अशी नावे त्यांनी कादंबरीस दिली. ‘कुट्टनीमतम्’, ‘अमरुशतक’, ‘गीतगोविंद’ या काव्याचा त्यांनी गद्यात अनुवाद केला. याशिवाय त्यांनी अनेक संस्कृत विषयांवर लेख लिहिले आणि त्यांचे संग्रह प्रसिद्ध झाले. अनुवादित आणि आधारित असे हे जे साहित्य साधले यांनी निर्माण केले, त्यांत त्यांची भावमधुर कविवृत्ती, सौंदर्यग्रही प्रकृती आणि आपली संपूर्ण श्रीकळा घेऊन अवतरलेली भाषाशैली मोहवून टाकते. त्यांची भाषा संस्कृतप्रचुर असली तरी प्रासादिक आहे. कोमल वर्णयुक्त असल्याने श्रुतिमधुर आहे. संस्कृतातील आशय स्पष्ट करण्याइतकी भावगर्भ आहे, रसार्द्र आहे. वाचकांवर ते संस्कृत, रसगंधी साहित्यफुलांचा नुसता सडा घालतात. संस्कृत साहित्याची ही सौंदर्यदालने मराठी वाचकांना उघडून दाखवण्याचे मोलाचे काम साधले यांनी केले आहे.

     ‘महाराष्ट्र रामायण’ हे त्यांचे प्रचंड काव्य सीतेच्या व्यक्तित्वावर विशेष प्रकाश टाकणारे असले, तरी त्याची दखल समीक्षकांनी घेतली नाही. साधले यांच्या स्वतंत्र अशा साहित्याची दखल समीक्षकांनी घेतली नाही याचे कारण, त्या कथा, एक-दोन अपवाद वगळता, अतिशृंगारिक, किंबहुना अश्लीलतेकडे झुकणार्‍या होत्या, कलात्मक दृष्टीनेही सामान्य होत्या. पाश्चात्त्य शृंगारकथांचा आधार घेऊन त्यांनी या कथा लिहिल्या. पण त्यांचे ‘चतुर्भाणी’ हे शृंगारिक असले तरी संस्कृत ग्रंथाचे रूपांतर असून ‘भाण’ हा रूपक प्रकार मराठीत आणण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. पात्राशी एकरूप होऊन केलेले त्यांचे स्वभाववर्णन, प्रसन्न शैली, वाचनीयता हे त्यांचे गुण निश्चितच प्रशंसेस पात्र आहेत.

      साधले फार परोपकारी होते. शारीरिक कष्ट सोसून, आर्थिक झळ सहन करून ते इतरांना साहाय्य करीत. नवलेखकांना ते नेहमी प्रोत्साहन देत. पत्नी नलिनी पराडकरांच्या मागे लागून त्यांनी त्यांच्याकडून कथा ‘सरित्सागर’ या विषयावर पीएच.डी.चा प्रबंध पूर्ण करून घेतला, तुलसी रामायणाच्या बालकांडाचा संस्कृत अनुवाद पूर्ण करून घेतला.

     नलिनीचे मार्गदर्शक वेगळे होते; पण प्रेरणा मात्र साधले यांची होती. या दाम्पत्याला संगीताची गोडी व जाण होती. मित्रांमध्ये दिलखुलास गप्पा करणारे साधले सभेमध्ये मुखदुर्बळ होत. त्यांनी कधी भाषण दिले नाही. जीवनाचा उपभोग त्यांनी अत्यंत रसिकतेने घेतला.

प्रा. दिनकर खंडेराव देशपांडे

संदर्भ
१.  प्रा. देशपांडे, दिनकर; ‘आनंद साधले ः लेखक आणि माणूस’, ‘राजस’; ऑक्टोबर १९८०.
साधले, आत्माराम नीळकंठ