Skip to main content
x

सरदेसाई, राधाकृष्ण नरहर

      प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील डॉ. नरहर गोपाळ सरदेसाई यांचा वारसा त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉक्टर राधाकृष्ण यांनी समर्थपणे चालविला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण वडिलांप्रमाणेच पंढरपुरात पाध्ये घराण्यात झाले. त्या घराण्याचे संस्कार नकळत त्यांच्यावर झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयामध्ये झाले आणि त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. सुदैवाने पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांना जर्मनीच्या विद्यापीठातून ‘फॉॅन हॅुम्बोल्ट’ शिष्यवृत्ती मिळाली आणि पुढील अभ्यासासाठी ते जर्मनीच्या लायप्झिक शहरात दाखल झाले.

     पदव्युत्तर शिक्षण करीत असताना पारंपरिक संस्कृतीचा वारसा, जर्मनीसारख्या संस्कृत भाषाप्रेमी देशात त्यांना स्वस्थ बसू देईना. आपण काही वेगळे पाहावे, लिहावे असे त्यांना सतत वाटू लागले. त्या काळात युरोपमध्ये अनेक मान्यवर संस्कृत आणि प्राच्यविद्येचा अभ्यास करीत होते.

     वेद, संस्कृत भाषा, नाटके, पुराणे, दैवतशास्त्र यांवर अनेक विद्वान संशोधन करीत होते. त्यांचे हे काम पुण्यात डॉ. राधाकृष्ण यांच्या कानावर अनेक वेळा आले होते. त्या संशोधकांना भेटावे, त्यांची चरित्रविषयक माहिती, अध्ययन, संशोधन यांचा एखादा कोश काढावा असा प्रकल्प त्यांनी हाती घेतला. त्या दृष्टीने त्यांनी अनेकांच्या भेटीगाठी, बोलणी, मुलाखती एकत्रित केल्या. त्यांची छायाचित्रे आवर्जून मिळवली. वास्तविक, विदेशी अभ्यासकांची प्रसिद्धिपराङ्मुख वृत्ती पाहता हे काम खूपच अवघड होते; पण डॉ. राधाकृष्ण यांनी ते पूर्ण केलेे आणि भारतात परतल्यावर ओरिएंटलतर्फे  झळर्लीीींर्शीिींश जीळशिींरश्रळर या नावाचा ग्रंथ प्रकाशित केला, जो आजही अद्वितीय स्वरूपाचा मानला जातो, जो पुढच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरला.

     डॉ. राधाकृष्ण यांचा नाणकशास्त्राचाही अभ्यास होता. अनेक देशांतून भ्रमण करताना किंवा पुस्तक व्यवसायाच्या निमित्ताने अनेक विदेशी पंडितांच्या भेटींतून त्यांनी नाणी गोळा केली. अनेकांना त्यांचा हा संग्रह कुतूहलाचा वाटे. त्यांच्या चिरंजीवांनी, प्रा. वैकुंठ यांनी हा संग्रह अद्यापही उत्तम प्रकारे सांभाळला आहे.

     ओरिएंटल बुक एजन्सीद्वारा पिता—पुत्रांनी सुमारे शंभर ग्रंथ प्रकाशित केले. या पुस्तकांना जगभरातून नित्य मागणी असे. आणखी पुढे जाऊन त्यांनी ‘द ओरिएंटॅलिस्ट’ नावाचे त्रैमासिक सुरू केले. अनेक देशांतील संशोधकांना आपले संशोधन मांडायला ते खूपच उपयुक्त ठरले. प्राच्यविद्येवरील संशोधनात्मक देशी—विदेशी विद्वानांचे लेख यात असत, जे आजच्या काळात अपूर्वाईचे वाटतील. दर दोन वर्षांनी भरणार्‍या, भारतभर अधिवेशने चालणार्‍या अ.भा. प्राच्यविद्या परिषदेचे ते सक्रिय सदस्य होते. त्या निमित्ताने ते देशोदेशीच्या पंडितांना पुण्यात आणीत, घरी आग्रहाने ठेवून घेत. आपली संस्कृती—इतिहास समजावून देत. एक प्रकारचे त्यांना ‘पुण्यपत्तनस्थ भारतीय राजनीतिज्ञ वकील’च म्हणावे लागेल.

     पुण्याच्या संभाजीपार्कच्या कोपर्‍यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा त्यांच्या सामाजिक कार्याचे एक एकमेवाद्वितीय उदाहरण म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील कर्‍हाडे ब्राह्मण संघांच्या माध्यमातून निधी उभारून, पुढाकार घेऊन त्यांनी हा झाशीच्या राणीचा पुतळा उभा केला, जो आज पुण्याचे भूषण मानला जातो.

     त्यांच्या पश्चात, ओरिएंटल बुक सर्व्हिसचे स्थलांतर त्यांचे चिरंजीव कैलास सरदेसाई यांनी नारायण पेठेत स्वतंत्रपणे, एका प्रशस्त जागेत केले.

वा.ल. मंजूळ

सरदेसाई, राधाकृष्ण नरहर