Skip to main content
x

ताकवले, राम गोविंद

     राम गोविंद ताकवले यांचा जन्म हुरगुडे, जि. पुणे येथे झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक असल्यामुळे त्यांचे काही शालेय शिक्षण पुणे जिल्ह्यातील खेडेगावात झाले. त्यांच्या वडिलांची पुण्याला पदोन्नतीवर बदली झाल्यामुळे पुणे येथे शालेय शिक्षण पूर्ण करून ते फर्गसन महाविद्यालयात दाखल झाले. तेथून बी.एस्सी. १९५६ साली आणि पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. १९५७ साली प्राप्त करताना त्यांनी भौतिकशास्त्र आणि सैद्धान्तिक भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी फर्गसन महाविद्यालयात आणि पुणे विद्यापीठात भौतिकशास्त्राचे अध्यापन केले. मॉस्को विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. संपादन केली.

     पुणे विद्यापीठातील अध्यापनानंतर ते इ.स. १९७८-१९८४ आणि इ.स. १९८८-१९८९ या वर्षी पुणे विद्यापीठात कुलगुरूपदी होते. इ.स. १९८५ ते १९८७ या वर्षांत त्यांनी राज्य शासनाच्या शिक्षण विभागातर्फे महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. इ.स. १९८९-१९९५ या कालावधीत त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळली, तसेच इ.स.१९९५-१९९८ या कालावधीत ते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू होते. डॉ. ताकवले यांनी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील कारकिर्दीनंतर माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून दूरशिक्षणाची पद्धत विकसित करण्याचे काम सुरू केले. इ.स.२००१ ते २००४ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे संचालक म्हणून काम केले. महाविद्यालयांचे मूल्यमापन करून श्रेणी देणाऱ्या नॅशनल असेसमेन्ट आणि अ‍ॅक्रेडिटेशन काऊन्सिलचे (नॅक) अध्यक्षपद त्यांनी इ.स.२००३ ते २००६ असे तीन वर्षे भूषवले आहे.

     ते एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आहेतच; पण त्याचबरोबर शिक्षणाच्या विविधांगांचा अभ्यास करून त्याबाबतचे विचार निरनिराळ्या स्तरांवर ठामपणे मांडणारे आणि आपले विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविणारे मान्यवर शिक्षणशास्त्री आहेत. महाराष्ट्रात मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची योजना पुढे येताच या योजनेचे प्रारूप (आराखडा) तयार करून ते पार पाडण्यापर्यंतची सर्व जबाबदारी डॉ. ताकवले यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांनीही ती यशस्विरीत्या पार पाडली आणि त्यामुळेच शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

     डॉ. राम ताकवले यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे. राज्यातल्या विज्ञान प्रसाराच्या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्षेत्रांतल्या वैज्ञानिकांना काही ठोस वैज्ञानिक काम करता यावे म्हणून त्यांनी ‘महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस’ या संस्थेची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. ते राष्ट्रीय पातळीवरच्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे सदस्य आहेत. त्यामुळे मान्यवर संशोधकाच्या वैज्ञानिक विचारांची देवाणघेवाण होऊन मूलभूत आणि समाजाच्या उपयोगी पडणारे संशोधन करण्याचे व संघटना कौशल्य वापरण्याचे उद्दिष्ट साध्य होते. डॉ. ताकवले हे उत्तम प्रशासकही आहेत. आपण कठीण परिस्थितीतून मार्ग कसा काढू शकू याचा ते सतत कृतीतून विचार करत असतात. सतत नावीन्याचा ध्यास असणाऱ्या डॉ. ताकवले यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वांना शिक्षण कसे देता येईल, याचा अभ्यास केला. त्यासाठी संगणक साक्षरता कार्यक्रम, महाराष्ट्र ज्ञान मंडळ, डिजिटल स्कूल नेट, ट्रान्सफॉर्मेशन नेट अशा विविध संस्था व कार्यक्रम आखले. त्यायोगे प्रत्येकाच्या जवळच्या उत्तम स्रोताची देवाणघेवाण होऊन शिक्षण प्रसार होईल यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षीही शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून शिक्षण हे आपल्या जीवनाशी जोडले व त्याला कृतीची जोड देऊन ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे हे दाखवून दिले.

     डॉ. ताकवले यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरांवर शिक्षण क्षेत्रात अनेक पदे भूषविली आहेत. अमेरिका, चीन, कॅनडा, फिलिपाइन्स, आफ्रिका अशा वीसच्यावर देशांतर्फे शिक्षण क्षेत्राशी संलग्न विविध कार्यक्रमांत त्यांना सन्मानपूर्वक बोलविण्यात आले आहे. उत्तम वक्ते, उत्कृष्ट प्राध्यापक आणि संशोधक असलेले डॉ. ताकवले शिक्षणाच्या विविध अंगांचा सूक्ष्म अभ्यास करून विविध स्वरूपाचे अहवाल तयार करण्यात कुशल आहेत. सेमिस्टर पद्धती, शिकवण्याच्या पद्धतींमध्ये बदल, व्यवस्थापन पद्धतीत आणि शैक्षणिक निकाल पद्धतीत नव्या तंत्रज्ञानाचा वापर, परीक्षांचे निर्णय लावण्यासाठी कालमर्यादा ही त्यांची शिक्षण क्षेत्रातील ठळक कामगिरी आहे. शिक्षणगती संदर्भात त्यांनी अनेक पर्याय सुचवले. व्होकेशनल, टेक्निकल पद्धतीच्या प्रयोगात्मक अभ्यासक्रमाची आखणी करून ‘कमवा आणि शिका’ यानुसार प्रत्यक्ष काम करीत असताना दूरस्थ शिक्षण पद्धतीद्वारे अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रम आखले. शेतकरी, कामगार, माळी, सोनार अशा विविध क्षेत्रांतल्या समाजातील व्यक्तींसाठी मुक्त विद्यापीठातर्फे अभ्यासक्रमाचे आयोजन करून समाजातील सर्व स्तरांतील व्यक्तींना शिक्षण कसे मिळेल, याचा ध्यास त्यांनी घेतला. शेतीची लागवड पद्धती, फळबाग उभारणी, उत्पादन आणि निर्यात पद्धती असे छोटे-छोटे, शेतकऱ्यांना समजतील अशा भाषेत आणि कमी वेळात करता येतील, असे अभ्यासक्रम त्यांनी आखले व त्याची कार्यवाही केली. व्यक्तिमत्त्व विकास, खेळ, व्यवसायाभिमुख तांत्रिक पद्धती या सर्वांचा अभ्यास करून अभ्यासक्रम चालू केले.

     सर्वांत लहान वयात कुलगुरुपद भूषविणारे डॉ. ताकवले यांनी पुणे विद्यापीठाला पहिल्या पाच क्रमांकांत नेऊन बसवले, ते शैक्षणिक व सामाजिक जागृती आणि सुधारणेमुळेच. मराठी, इंग्रजी, हिंदी, रशियन या विविध भाषा जाणणाऱ्या डॉ. ताकवले यांचे अनेक निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले आहेत.

     शिक्षण क्षेत्रात शिक्षकापासून कुलगुरूपर्यंतच्या सर्व पदांवर विराजमान झालेल्या या शिक्षणतज्ज्ञाला ब्रिटनमध्ये डॉक्टरेट प्रदान करताना एक गमतीदार प्रश्‍न विचारला गेला, ‘‘तुम्ही विज्ञान संशोधक असताना या शिक्षण क्षेत्राच्या मार्गालाच का गेलात?’’ तेव्हा ‘‘ज्ञान आणि समाज यांची सांगड घालण्यासाठी शिक्षणासारखा दुवा नाही,’’ हे आपले ध्येय त्यांनी स्पष्ट केले आणि प्रत्यक्ष कृतीतून ‘इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठा’ला कोणतीही मदत नसताना, शिपायापासून कुलगुरूपर्यंत सर्वांना एका ध्येयाने प्रेरित करून, सर्व कामे आपलीच मानून जगात एक उत्तम (मॉडेल) प्रमाण म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली. मुक्त विद्यापीठाला नैपुण्य पुरस्कार (अवॉर्ड ऑफ एक्सलन्स)ही मिळवून दिले.

     निवृत्तीनंतरच्या काळातही ते शिक्षणक्षेत्रातील संशोधन करण्यात उत्साहाने मग्न असतात. त्यांची शिक्षणाविषयी आणि जीवनाविषयी काही तत्त्वे आहेत. ‘‘शिक्षण हे समाजाशी संलग्न असले पाहिजे. चाकोरीबद्ध शिक्षण समाजाशी फारकत घेते. म्हणूनच शिक्षण हे ज्ञानाने, तंत्रज्ञानाने आणि व्यवहाराने समृद्ध करून ज्ञान आणि समाज यांतील दुवा बनले पाहिजे. फक्त पैसा हीच काही संपत्ती नव्हे. आपला समाज, आपली संस्कृती, आपले पर्यावरण हीच खरी आपली संपत्ती आहे. म्हणूनच शिक्षणाने या सर्वांचे संवर्धन, संरक्षण आणि समृद्धीकरण झाले पाहिजे. समाज म्हणजे कोण? तर मी! मी चांगला तर समाज चांगला.’’ अशी त्यांची भूमिका आहे. त्यासाठी डॉ. ताकवले समाजाशी ‘शेअरिंग, केअरिंग आणि सॅक्रिफायसिंग’ या त्रिसूत्रीचा वापर करतात. कार्यप्रणाली यशस्वी करण्याचे त्यांचे तंत्र म्हणजे, ‘एखादी चांगली कल्पना सुचली तर ती अमलात आणा, ती जर यशस्वी झाली नाही, तर ती अमलात आणण्याचे मार्ग बदला; पण कल्पना सोडू नका.’

     ‘ओपन एज्युकेशनल रिसोर्स फॉर स्कूल्स’ या कार्यक्रमाचे सूत्र असे आहे की, ‘‘या कार्यक्रमाद्वारे माझ्या अगदी दूरच्या खेड्यातील मुलांना जगात जे-जे सर्वोत्तम आहे, ते-ते मी अगदी लवकरच पोहोचविले आहे, असे तुम्ही पाहाल.’’

- मृणालिनी साठे

- दिलीप हेर्लेकर

ताकवले, राम गोविंद