Skip to main content
x

टोपे, त्र्यंबक कृष्णाजी

      ज्येष्ठ न्यायविद, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबईचे नगरपाल त्र्यंबक कृष्णाजी टोपे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी तात्या टोपे यांच्या घराण्यात झाला.  त्यांनी एम.ए. व  एलएल.बी. या पदव्या मिळविल्या होत्या. १९३९ ते १९४७ या काळात ते मुंबईच्या रामनारायण रुइया महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक होते. १९४६मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅडव्होकेट झाले. १९४७ ते १९५८ या काळात ते मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे प्राध्यापक होते. नंतर १९५८ ते १९७५ या काळात ते कॉलेजचे प्राचार्य आणि न्यायशास्त्राचे पेरी प्राध्यापक झाले. प्राचार्य असतानाच ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९७७ पर्यंत ते कुलगुरू होते. नंतर ते मुंबईतील के.सी.विधि महाविद्यालयात ते अतिथी प्राध्यापक झाले. १९८२ मध्ये मुंबई विद्यापीठातही ते अतिथी प्राध्यापक होते. ते एलएल.एम. आणि पीएच.डी. या पदव्यांसाठी अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शकही झाले. याशिवाय चार नवीन विद्यापीठे स्थापण्यासाठी जो प्रकल्प अहवाल तयार करावयाचा होता, तो तयार करण्यामध्ये टोपे यांचा सहभाग होता. टोपे यांचे ‘हिंदू फॅमिली लॉ अ‍ॅण्ड सोशल चेंज’ हे पुस्तक मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केले. या व्यतिरिक्त ‘व्हाय हिंदू कोड?’ हे पुस्तक आणि ‘ए मॉडर्न सेज’ हे डॉ.पां.वा.काणे यांचे चरित्र टोपे यांनी लिहिले. मराठी भाषेत टोपे यांनी लिहिलेल्या ‘भारताचे संविधान’ या पुस्तकात त्यांनी घटनेच्या अंमलबजावणीतून होणारे राजकीय व सामाजिक परिणाम आणि त्याचे आर्थिक गर्भितार्थ यांविषयी पुष्कळ ऊहापोह केला आहे. त्यांनी लिहिलेला ‘कॉन्स्टिट्यूशनल लॉ ऑफ इंडिया’ हा ग्रंथ मोलाचा आहे. मूलभूत कर्तव्ये, मालमत्तेचा हक्क, संसदीय प्रणालीची भारताच्या संदर्भात असलेली युक्तता वा अनुरूपता, अध्यक्षीय पद्धतीच्या शासनव्यवस्थेचे गुण आणि निवडणूक सुधारणा या विषयांवर त्यांनी आपल्या या ग्रंथात प्रकाशझोत टाकला आहे.

        टोपे यांना अनेक मानसन्मान लाभले होते.  कायदा आयोगाचे ते दोन वेळा (१९६२ आणि १९६८मध्ये) सदस्य होते. हा मान मिळविणारे टोपे हे भारतातील पहिले विधि अध्यापक होत. १९७७ ते १९८०  दरम्यान टोपे महाराष्ट्र कायदा आयोगाचे सदस्य होते. मद्रास व मुंबई विद्यापीठांत त्यांनी व्याख्याने दिली होती. आंध्र विद्यापीठाने त्यांना सन्मान्य एलएल.डी. पदवी दिली होती. १९८६मध्ये ते मुंबईचे नगरपाल झाले. महाराष्ट्र सामाजिक परिषदेचेही ते अध्यक्ष होते.

- अ. ना. ठाकूर

टोपे, त्र्यंबक कृष्णाजी