Skip to main content
x

तुपे, शिवाजी रघुनाथ

चित्रकार

युष्यभर निसर्गचित्र या एकाच विषयाचा ध्यास घेऊन सातत्याने भारतभर प्रवास व निसर्गचित्रण करणारे कलावंत म्हणून शिवाजी रघुनाथ तुपे ख्यातनाम आहेत. कलाविषयक उपक्रमात तेवढाच रस घेणारे शिवाजी तुपे यांचा जन्म नाशिक येथील सिन्नर या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते. त्यांना कलेचा वारसा काष्ठ शिल्पकार आजोबा व वडील यांच्याकडून मिळाला. कलेचे शिक्षण घेण्यास ते सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट या संस्थेत दाखल झाले. १९५७ मध्ये त्यांना अप्लाइड आर्टमधील पदविका मिळाली. शिक्षणानंतर नाशिकला परतल्यावर त्यांनी तेथील अग्रगण्य दैनिक ‘गावकरी’ व ‘अमृत’ मासिकाचे कथाचित्रकार (इलस्ट्रेटर) म्हणून काम केले. त्यानंतर चित्रकार वा.गो. कुळकर्णी यांनी स्थापन केलेल्या ‘नाशिक कला निकेतन’ या संस्थेच्या ते संपर्कात आले. तेथे त्यांनी १९६० ते १९९८ पर्यंत नोकरी केली व संस्थेचे सचिव म्हणून काम केले. चित्रकार वा.गो. कुळकर्णी, सा.ल. हळदणकर, एम.आर. आचरेकर यांच्या प्रदीर्घ सहवासाचे संस्कार त्यांच्यावर झाले.

मुख्यत: त्यांनी नाशिकचा परिसर, तेथील मंदिरे, जुनी घरे, बाजार यांची सातत्याने चित्रे काढली. यातून नाशिकच्या वैशिष्ट्यांचे जतनीकरण त्यांच्या चित्रांद्वारे घडले आहे. त्याचप्रमाणे काश्मीर ते कन्याकुमारी आणि द्वारका ते कोलकाता अशा भारतभरच्या भ्रमणात त्यांनी अनेक स्केचेस, निसर्गचित्रे, विविध वास्तूंची चित्रे काढली. जलरंगांचे प्रवाहीपण व पारदर्शकता राखीत आणि पांढर्‍या रंगाचा वापर न करता जशी ते सुंदर चित्रे काढीत, त्याच प्रभुत्वाने जलरंगाचे किंचित जाडसर व आवश्यकतेनुसार पांढर्‍या रंगाचे मिश्रण करून ‘अपारदर्शक’ पद्धतीनेही ते अप्रतिम चित्रे रंगवीत.

फिक्या रंगछटांवर कधी गडद रंगांचे स्ट्रोक्स, तर कधी गडद रंगांवर फिक्या रंगांचे स्ट्रोक्स देत ते चित्रात बहार आणतात. थोडी मोठी म्हणजे सुमारे २० × ३० इंचांची चित्रे काढताना प्रथम फ्लॅट ब्रशेसचा वापर करून चित्रातील मोठ्या घटकांची ते रंगभरणी करतात व नंतर वेगवेगळ्या राउण्ड ‘ब्रशेस’नी तपशील भरत चित्र पूर्ण करतात. सहज, सुटसुटीत रचना, छायाप्रकाशाचा खेळ, शीतोष्ण रंगाचा अचूक वापर, आल्हाददायक रंगसंगती, तजेला ही त्यांची काही खास वैशिष्ट्ये. समोरच्या दृश्यातील आकार, रंग यांचे सौंदर्य ते त्यांच्या शैलीतून व्यक्त करतात. त्यांचे सुरुवातीचे मुक्त रंगलेपन नंतर अधिकाधिक जोरकस, नेमके व प्रगल्भ होत गेलेले आढळते. जलरंगांप्रमाणे त्यांनी तैलरंग, ऑक्रिलिक, इंक-पेन, पेन्सिल या माध्यमांचाही प्रभावी वापर केला आहे.

त्यांच्या चित्रांची एकल प्रदर्शने मुंबई, पुणे, कोल्हापूर, दिल्ली, कोलकाता येथे झाली आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी निसर्गचित्रांची प्रात्यक्षिकेही दिली आहेत. निरनिराळ्या स्पर्धात्मक चित्रप्रदर्शनांत त्यांना पारितोषिके मिळाली आहेत.

त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करणारा नाशिकचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला. फाइन आर्ट सोसायटी, दिल्ली, बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया यांनीही सन्मानपत्रे देऊन त्यांचा गौरव केला. नाशिक येथील लोकहितवादी मंडळ, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, फाळके फिल्म सोसायटी, पक्षी मित्रमंडळ अशा अनेक संस्थांच्या कार्यात व कलाविषयक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. तुपे अविवाहित आहेत.

‘स्केच करता करता’ व स्केचबुक’ ही त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांतून त्यांच्या कलाशैलीची ओळख होते. या पुस्तकांच्या मराठी व इंग्रजी आवृत्त्या निघाल्या आहेत.

- राम अनंत थत्ते, साधना बहुळकर

 

संदर्भ :
१. देशपांडे, राहुल; ‘मास्टर आर्टिस्ट — शिवाजी तुपे’; ज्योत्स्ना प्रकाशन; २०११. २. परांजपे, रवी; मासिक ‘अंतर्नाद’ — जून २०११.

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].