Skip to main content
x

वाडेकर, देविदास दत्तात्रेय

      देविदास दत्तात्रेय वाडेकर यांचा जन्म कुरोली (ता. खटाव), जिल्हा सातारा येथे झाला. मुंबई विद्यापीठाची तत्त्वज्ञान विषयात एम.ए. ही पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी अध्यापन कार्याला सुरुवात केली. १९२६ ते १९३२ पर्यंत पुण्यातील डेक्कन महाविद्यालय व कोल्हापूरचे राजाराम महाविद्यालय येथे त्यांनी अध्यापन केले. पुढे फर्गसन महाविद्यालयात (१९३२ ते १९३९), विलिंग्डन महाविद्यालयात (१९३९ ते १९४३), पुनश्च फर्गसन महाविद्यालयात (१९४३ ते १९६२) असे विविध महाविद्यालयांत अध्यापन कार्य करून ते विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले. प्रामुख्याने ‘मराठी तत्त्वज्ञान कोश’ (तीन खंड) यांचे संपादक म्हणून त्यांनी केलेले काम पुढील पिढ्यांसाठीही बहुमूल्य असे आहे.

     भगवद्गीतेवरील संशोधनाने त्यांच्या व्यासंगाला सुरुवात झाली. पुढे ग्रीक तत्त्वज्ञान, ज्ञानमीमांसा, सद्वस्तूमीमांसा अशा अनेक शाखांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. आधुनिक मानसशास्त्र व त्यातील विविध सांप्रदायांची ओळख त्यांनी करून दिली.

     मराठी तत्त्वज्ञान महाकोश परिषदेची स्थापना करून व तेथे संचालक म्हणून त्यांनी अभूतपूर्व काम केले.  त्यातूनच मराठी तत्त्वज्ञान कोशाचे तीन खंड प्रकाशित झाले. त्यांनी ‘भगद्गीता - ए फ्रेश स्टडी’ (१९२४), ‘भारतीय मानसशास्त्र परिभाषा’(१९४४), ‘आधुनिक मानसशास्त्र : इतिहास व संप्रदाय’ (१९५१), ‘विगमन’ (१९५६), ‘निगमन’ (१९६३), ‘विगमनातील शब्द आणि वाक्प्रचार पद्धती’ (१९६३) असे विपुल लेखन केले. ‘इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेस’च्या ४३व्या  अधिवेशनाचे ते मुख्य अध्यक्ष (जनरल प्रेसिडेंट) होते. हे अधिवेशन धारवाड येथे भरले होते. ‘इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेस’च्या गोल्डन ज्यूबिली सेशन १९७५ दिल्लीमध्ये एका विभागाचे ते अध्यक्ष होते. त्यांचे निधन वृद्धापकाळाने झाले.

प्रा. विजय कारेकर

वाडेकर, देविदास दत्तात्रेय