Skip to main content
x

वाटवे, केशव नारायण

        केशव नारायण वाटवे ह्यांचे शिक्षण औंध व पुणे येथे झाले. ते मराठीचे प्राध्यापक तर संस्कृत व मराठी यांतील साहित्याचे रसिक अभ्यासक होते. त्यांच्या लेखणीतून त्यांनी अनेक साहित्यांचे गहनतेने सूक्ष्म अवलोकन केले आहे. रसविमर्श (१९४२), संस्कृत काव्याचे पंचप्राण (१९४७) (पंच महाकाव्याधिष्ठित), किरातार्जुनीयम् कथा (१९६०), नलदमयंती काव्य (१९६१), संस्कृत नाट्यसौंदर्य (१९६२), प्राचीन मराठी पंडिती काव्य (१९६४), माझी वाटचाल (१९६४), पंडिती काव्य (१९६८), संस्कृत साहित्यातील विनोद ही वाटवे यांची ग्रंथसंपदा आहे. केशव नारायण वाटवेंच्या ह्या साहित्यकुंजीमध्ये अनेक रत्ने विखुरलेली आहेत. त्यांच्या रसविमर्श ह्या पुस्तकामध्ये रसावरील अनेकविध विचारांचा ऊहापोह केलेला दिसतो. भरतमुनींपासून विद्यमान पंडितांपर्यंत सगळ्यांची रसविषयक मते व मतांतरे घेऊन मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचारांद्वारे नवप्रकाश टाकण्याचा प्रयत्न यात केलेला आहे. रसविवेचनाकरता त्यामध्ये केशवसुतांनंतरची मराठी उदाहरणे घेतली आहेत. तसेच रसचर्चेतील मुद्दे मांडताना संस्कृत व प्राकृत पंडितांची मते संक्षिप्तपणे कथन केली आहेत. ‘रसविमर्श’ या पुस्तकाला १९४२सालातील उत्तम पुस्तक म्हणून मुंबई विश्वविद्यालयाचे दादोबा पांडुरंग तर्खडकर पारितोषिक मिळाले. तसेच भोर येथील शंकराजी नारायण आणि डेक्कन सोसायटीचे इचलकरंजी पारितोषिक मिळाले. मुंबई, पुणे, नागपूर, कर्नाटक, गुजरात इत्यादी विद्यापीठांनी हा ग्रंथ मराठी सन्मान शाखेत बी.ए.ला व एके ठिकाणी एम.ए.लासुद्धा संदर्भग्रंथ म्हणून ठेवला. ह्या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीत करुणरसाबाबत दुरुस्ती तसेच वीररसाबाबत थोडा बदल करण्याचा प्रयत्न केला.

     करुणरसाचा भरतांनी दिलेला स्थायिभाव शोक आहे. शोकभावना प्रेमाच्या पूर्वस्थितीवर अवलंबून आहे इत्यादी गोेेष्टी दाखवून त्या आधारे करुणरसाची कशीतरी उभारणी केली होती. मात्र आता तीच चुकीची वाटत असल्याने प्रेम हा करुणरसाचा स्थायिभाव मानावा हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. उत्साह हा वीररसाचा स्थायिभाव भावनारूप नसल्याने ‘अमर्ष’ हा स्थायिभाव मानावा, असे म्हटले होते. अमर्ष म्हणजे आक्रमण सहन न होणे अर्थात राग. याच्यामध्ये स्वयंप्रभूतेची (डशश्रष-रीीशीींळिि) सहजप्रवृत्ती असल्याने अहंभाव हाच वीररसाचा स्थायिभाव असावा, असे मत मांडले आहे.

     ह्यातील विषयांचा क्रम बघितल्यास आपल्याला ह्या पुस्तकाच्या संस्कृत-मराठी साहित्यातील योगदानाची कल्पना येऊ शकते.

     विषय प्रवेश-

     १) रसांचा संस्कृतीतील उद्गम व विकास.

     २) रसांचा मराठीतील अवतार.

     निकष-

     १) रसांचे मानसशास्त्रीय अधिष्ठान.

     २) रससामग्री

     ३) रसनिष्पत्ती प्रक्रिया

     ४) रसास्वाद किंवा काव्यानंदमीमांसा

      ५) रससंख्यानिर्णयाची तत्त्वे

      ६) भक्तिरस

      ७) नवरसस्वरूपदर्शन

      ८) रसाची व काव्याची उपांगे

     ९) रस व ललितकला

    १०) रस व पाश्चात्त्य साहित्यशास्त्र

     ११) रस व्यवस्थेचे संस्कारण व आधुनिक मराठी साहित्यशास्त्राचा पाया.

     के.ना. वाटवे ह्यांनी संस्कृत साहित्यात अग्रगण्य  असणार्‍या पाच महाकाव्यांविषयी लिहिलेले ‘संस्कृत काव्याचे पंचप्राण’ हे पुस्तक, ज्यामध्ये रघुवंशम्, कुमारसंभवम्, किरातार्जुनीयम्, शिशुपालवधम् आणि नैषधीयचरितम् या काव्यांवरती प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. पंचमहाकाव्यांची रूपरेषा देऊन त्यांतील सौंदर्याचा आस्वाद अतिशय मधाळपणे घेऊन त्यांचे रसग्रहण, पात्रचित्रण इत्यादी वर्णन सुगम आणि सरल भाषेत केले गेले आहे. जे विद्यार्थ्यांना आणि संस्कृत व मराठी अभ्यासकांना अमूल्य मार्गदर्शन प्रदान करते.

     नाटकांविषयीच्या सर्व घटकांचा विचार करणारे संस्कृत नाट्यसौंदर्य नामक पुस्तक आहे. निवडक नऊ नाट्यकृतींचे परिशीलन करण्याचा प्रयत्न के. ना. वाटवे यांनी केला आहे. संस्कृत साहित्यातील विनोद निर्मिती करणारा घटक म्हणजे विदूषक. विदूषक या संकल्पनेवर विचार मांडून संस्कृत साहित्यामध्ये विखुरलेल्या व विदूषकाच्या आवतीभोवती फिरणार्‍या विनोदाचे मार्मिक चित्रण यात दिसून येते. संस्कृत साहित्यविषयक विचार मांडणार्‍या या कवीच्या लेखणीद्वारे मराठी साहित्यालासुद्धा अधिक समृद्ध केले. त्यामध्ये प्राचीन मराठी पंडिती काव्य व मराठी पंडिती काव्य या दोन पुस्तकांचा समावेश होतो. या दोन्ही पुस्तकांमध्ये प्राचीन काळातील पंडिती काव्य म्हणजे काय व पंडिती काव्यामागील मूल प्रेरणास्रोत शोधण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला दिसतो. पंडितीकाव्य समीक्षक आणि संस्कृत कवींचा पंडित कवींवर पडणारा प्रभाव यांच्याबाबत विस्तृत विवेचन केले आहे.

     ‘नल-दमयंती’ यांच्यावर आधारित असलेले ‘नल-दमयंती’ हे काव्य त्यांनी मराठी भाषेत छंदोबद्ध लिहिले. साध्या सोप्या मराठी भाषेत लिहिलेली किरातार्जुनीयम् नामक कथा हे त्यांचे आणखी एक प्रसिद्ध पुस्तक होय. आपल्या संपूर्ण वैयक्तिक जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारा प्रांजळ, आत्मकथनपर असा ‘माझी वाटचाल’ हा ग्रंथ होय. लोकांना मार्गदर्शनपर ठरतील असे अनेक संस्कृत व मराठी भाषांतील ग्रंथ त्यांच्या लेखणीतून रचनाबद्ध झाले. मराठी व संस्कृत साहित्याला मिळालेला हा अमूल्य ग्रंथरूपी ठेवा होय. ज्यासाठी दोन्ही भाषिक वर्ग निरंतर त्यांचे ऋणी असेल.

प्रा. सुचित्रा ताजणे

संदर्भ
१. मराठी वाङ्मयसेवक चरित्रकोश; १०३९ ते १९४०; खंड पहिला.
वाटवे, केशव नारायण