Skip to main content
x

जामखेडकर, अरविंद प्रभाकर

       रविंद प्रभाकर जामखेडकर यांचा जन्म ६ जुलै १९३९ रोजी नाशिक जिह्यातील मालेगाव या तालुक्याच्या गावी प्रभाकर श्री. जामखेडकर व त्यांच्या पत्नी लक्ष्मी प्र. जामखेडकर यांच्या पोटी मध्यमवर्गीय घरात झाला. पारंपरिक गाणपत्य संप्रदायाचे वातावरण असलेल्या त्यांच्या घरात गणेशोत्सवात गणपतीची मूर्ती घरीच बनवण्याची परंपरा होती आणि ती आजही पाळली जाते. घरातूनच त्यांना कलादृष्टी आणि बुद्धीवादी तत्त्वज्ञानाचा वारसा मिळाला. त्यांचे वडील मालेगावच्या शाळेत शिक्षक होते. डॉ. अरविंद प्रभाकर जामखेडकरांना घरातूनच संस्कृत विषयाचे बाळकडू मिळाले होते. त्यांच्या सहाही मोठ्या बहिणीदेखील संस्कृत विषयात प्रवीण होत्या. संस्कृतबरोबरच इंग्लिश भाषेचे ज्ञान आणि गणित विज्ञानातील प्रावीण्य हादेखील त्यांना लाभलेला विद्वत्तेचा वारसा होता. त्यांचे शालेय शिक्षण मालेगाव येथेच पार पडले.

     उच्च शिक्षणासाठी ते पुण्याला आले. १९५४ ते १९५८ या काळात बालमुकुंद लोहिया संस्कृत पाठशाळेत (आताचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ) त्यांचे संस्कृतचे पारंपरिक शिक्षण झाले आणि सर परशुरामभाऊ (स. प.) महाविद्यालयात व नंतर पुणे विद्यापीठात (आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) औपचारिक शिक्षणाची सुरुवात झाली. या काळात त्यांनी वेदांचा अभ्यास सुरू केला. त्यांच्या पुण्यातील वास्तव्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर सिद्धेश्‍वरशास्त्री चित्राव आणि प्रा. रा.ना. दांडेकर यासारख्या भारतविद्येच्या गाढ्या अभ्यासकांचा व पं. भागवत गुरुजी (पं. वा.भा. भागवत) आणि धुपकर गुरुजी या संस्कृत-प्रेमींचा मोठा प्रभाव पडला. या काळात त्यांनी व्याकरण, मीमांसा यासारख्या विषयांचेही अध्ययन केले. त्यांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी त्यांनी संस्कृतबरोबरच अर्धमागधी हा विषय अभ्यासला. मुळातच कुशाग्र बुद्धी, उत्तम स्मरणशक्ती आणि जिज्ञासू वृत्ती असलेल्या डॉ. अरविंद जामखेडकरांनी आपल्या पदवी अभ्यासक्रमानंतर एक वेगळा मार्ग निवडला.

     वेदांच्या अध्ययनासाठी भाषाशास्त्राचे ज्ञान असणे गरजेचे आहे, हे लक्षात आल्यावर १९५८ ते १९६० मध्ये येरवडा येथील डेक्कन महाविद्यालयामध्ये त्यांनी संस्कृत विषयाबरोबरच भाषाशास्त्र हा तज्ज्ञतेचा (Specialization) विषय स्वीकारून पदव्युत्तर पदवीचा (एम.ए.) अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला. तेथे नंतरच्या काळात त्यांनी संस्कृत डिक्श्‍नरीमध्ये काम केले. या काळात त्यांना डॉ. एस.एम. कत्रे, डॉ. ह.धि. सांकळिया, डॉ. शां.भा. देव अशा विद्वानांचा सहवास लाभला. पुणे विद्यापीठाने त्यांना ‘वसुदेवहिंडीः एक सांस्कृतिक अध्ययन’ (Cultural History of Vasudevhindi) या विषयावर प्रा. डॉ. शां.भा. देव यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेल्या प्रबंधासाठी (१९६१-१९६६) प्राचीन भारतीय संस्कृती या विषयामध्ये विद्यावाचस्पती (Ph.D.)  पदवी प्रदान केली. या काळात डॉ. ह.धि. सांकळिया आणि डॉ. शां.भा. देव यांच्या मार्गदर्शनाखाली १९६०-६१मध्ये नेवासा आणि १९६१मध्ये चांडोली या ताम्रपाषाणयुगीन पुरातत्त्वीय स्थळांवर होत असलेल्या उत्खननामध्ये सहभाग घेतला. १९६६ ते १९६८ या काळात अर्धमागधीचे साहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) म्हणून श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या कला, विज्ञान आणि एम.एफ.एम.ए. वाणिज्य महाविद्यालय, धुळे येथे काम केले. यानंतर ते नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व या पदव्युत्तर विभागामध्ये अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. १९७७ पर्यंत त्यांनी सोनगाव (१९६५), टाकळघाट—खापा (१९६८-६९), पौनी (१९६९-७१), माहूरझरी (१९७०-७१), भोकरदन (१९७२-७३), मांढळ (१९७५-७७) अशा अनेक पुरातत्त्वीय उत्खननात सहभाग घेऊन त्यापैकी काहींचे उत्खनन अहवाल लिहिण्यातही योगदान दिले.

     १९६९ मध्ये त्यांचे पितृछत्र हरपले. १९७१-७२ साली त्यांना नेदरलँड सरकारची रेसीप्रोकल फेलोशिप मिळाली. या काळात त्यांनी आग्नेय आशियाच्या संस्कृतीवर काम केले. संस्कृत, अर्धमागधी, भाषाशास्त्र, कोशशास्त्र, पुरातत्त्व हा प्रवास या काळात कला आणि कलेतिहासाच्या दिशेने होऊ लागला. या काळात युरोपातील अनेक वस्तुसंग्रहालयांना आणि कला वस्तुसंग्रहांना त्यांनी भेट दिली.

     सन १९७३ मध्ये अनुराधा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना पुष्कर (१९७५), मृणालिनी (१९७६) आणि प्रमोद (१९८०) अशी तीन अपत्ये झाली.

     १९७७ साली डॉ. अ.प्र. जामखेडकर यांची महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाच्या संचालकपदी नियुक्ती झाली. त्यांच्या २० वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विभागाच्या कार्यपद्धतीत काही मोलाचे आमूलाग्र बदल घडवून आणले, अनेक नवीन वस्तुसंग्रहालयांची स्थापना केली, अनेक पुरातत्त्वीय उत्खनने केली. या काळात त्यांनी डॉ. शां.भा. देव, डॉ. नागराजा राव, डॉ. म.न. देशपांडे, डॉ. वॉल्टर स्पिंक, डॉ. मेरलीन लीज, डॉ. जेरी मलांड्रा, डॉ. नंदना चुटीवॉन्ग अशा अनेक दिग्गज विद्वानांबरोबर काम केले. त्यांच्या कार्यकाळातील सर्वात मोलाचे योगदान म्हणजे १९९३ मधील लातूरजवळील किल्लारी येथे झालेल्या भूकंपानंतरचे पुरातत्त्वीय स्थलांच्या आणि स्मारकाच्या संवर्धनाचे कार्य. १९८३-९६ या काळात एकूण तीन वेळा  महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेखागाराच्या संचालकपदाचा अधिभार त्यांच्यावर सोपवण्यात आला.

     १९८४ साली केंद्रीय विद्यापीठ आयोगाने (University Grants Commission) राष्ट्रीय अधिव्याख्याता (National Lecturer) म्हणून नियुक्ती देऊन त्यांचा सन्मान केला. १९८५ साली त्यांनी जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. १९८८ साली एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने त्यांना रजतपदक (Silver Medal) (१९८३-८६) देऊन त्यांचा सत्कार केला.

     डॉ. अरविंद जामखेडकरांच्या २० वर्षांच्या संचालक पदाच्या कारकिर्दीत त्यांनी स्वतंत्रपणे तसेच नागपूर विद्यापीठ, डेक्कन कॉलेज, औरंगाबाद विद्यापीठ अशा अनेक विद्यापीठांबरोबर अनेक पुरातत्त्वीय उत्खनने हाती घेतली. नायकूंड (१९७७-८०), माहूरझरी (१९७८-७९), नागरा (१९७९-८३), सोअनेर (१९८०-८१), खैरवाडा (१९८१-८२), भागिमाहिरी (१९८२-८४), हमलपुरी (१९८२-८३), चारठाणा (१९८२-८३), तेर (१९८३-८४, १९८७-८८ आणि १९८८-८९), कंधार (१९८४-८५), मांढळ (१९८४-८५), अगर (१९८४-८५), थाळनेर (१९८४-८५), दौलताबाद (१९८४-८५), मुलचेरा आणि विवेकानंदपूर (१९८७-९०), इर्ला (१९८९-९०), मांढळ (१९९१-९२), वाशिम (१९९२-९३, १९९४-९५) आणि पैठण (१९९४-९५) ही त्यापैकीच काही होत.

     या कामाच्या व्यापातही त्यांचे संशोधनही सातत्याने सुरूच होते. त्यांचे आजपर्यंत शंभरच्या जवळपास लेख प्रकाशित असून संशोधनात्मक आणि ललित अशा अंगांनी त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय ग्रंथांमध्ये ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला ‘अजिंठा’ (२००९) तसेच महाराष्ट्र राज्य गॅझेटीअर विभागाने प्रकाशित केलेला ‘महाराष्ट्रः प्राचीन काळ, भाग १ खंड २, महाराष्ट्र स्थापत्य आणि कला’ हे ग्रंथ आहेत. त्यांनी भारतीय संस्कृतीतील हिंदू, बौद्ध आणि जैन या तिन्ही धर्मपरंपरांवर विपुल लेखन केले आहे. कला, स्थापत्य, मूर्ती विज्ञान, मूर्तिशास्त्र, तत्त्वज्ञान, पुराकथा, पुरातत्त्व, पुराभिलेखविद्या, भाषाशास्त्र, संस्कृत-प्राकृत साहित्य, मौखिक परंपरा आणि चरित्र अशा विविध विषयांवर लेखन केले.

     वाकाटक नृपती आणि त्यांचे सांस्कृतिक योगदान या विषयावर त्यांचे महत्त्वाचे काम आहे. त्यांनी वाकाटकांशी संबंधित अनेक पुरातत्त्वीय पुरावे उजेडात आणले. वाकाटकांचे पुराभिलेख, कला, साहित्य, काळ अशा अनेक विषयांवर त्यांनी लेखन केले.

     त्याशिवाय वेद आणि सिंधू संस्कृती, वेदांचा काळ, वैदिक देवता, शैव-वैष्णव-शाक्त परंपरा, अदिती-लज्जागौरी, पाञ्चरात्र परंपरा व त्यांचा साहित्य व कलेवरील प्रभाव, स्मार्त व श्रौत परंपरांचा कलेवरील प्रभाव, मंदिर स्थापत्य: उगम आणि विकास, जैन साहित्य, कला, संस्कृती, स्थापत्य, बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञान, बौद्ध कला, हीनयान ते महायान, स्तूप: संकल्पना आणि तिचा विकास, अग्नेय आशियातील भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि प्रभाव, तेथील कला, स्थापत्य आणि पुराभिलेख अशा अनेक विषयांवर त्यांनी मूलभूत लेखन केले आहे.

     १९९७ मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांची अनंताचार्य इंडॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मुंबई विद्यापीठाकरिता प्राचीन भारतीय संस्कृती या विषयासाठी मार्गदर्शक (Research Guide) म्हणून नेमणूक झाली. यानंतर त्यांनी क. जे. सोमैया सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीज येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यास सुरुवात केली. सौंदर्यशास्त्र ( Aesthetics), पुरातत्त्वविद्या, बौद्धविद्या, प्राचीन भारतीय कला आणि विज्ञान, नाणकशास्त्र, प्राचीन भारतीय संस्कृती इ. अनेक विषयांचे विविध अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठामध्ये आखण्यात त्यांचे भरीव योगदान आहे. त्यांचे हे प्रचंड कार्य पाहून त्यांना २००१ या वर्षी इंडियन हिस्टरी काँग्रेसच्या कोलकाता येथे भरलेल्या ६१व्या अधिवेशनाचे पुरातत्त्व विभागाचे अध्यक्ष म्हणून सन्मानिले गेले. महाराष्ट्रातील आणि देशातील शैक्षणिक संस्थांमध्येच नव्हे, तर जगभर त्यांच्या विद्वत्तेचा स्नमान केला गेला आहे.

     यशाच्या आणि कीर्तीच्या शिखरावर असतानाच त्यांच्या मातोश्री लक्ष्मी प्र. जामखेडकर यांचे सन २००६ मध्ये निधन झाले. २००७ ते २०१३ या काळात डॉ. अरविंद प्र. जामखेडकर एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई या संस्थेचे उपाध्यक्ष होते. ते आजही या संस्थेचे पदाधिकारी म्हणून काम पाहतात. एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईमध्ये त्यांनी अनेक संशोधनात्मक उपक्रम सुरू करून संस्थेला मोठा लौकिक प्राप्त करून दिला. संस्थेच्या ग्रंथालयातील हस्तलिखितांच्या अध्ययनाचा संशोधन प्रकल्प हा त्यापैकीच एक होय.

     भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने (Archaeological Survey of India) स्थापन केलेल्या अजिंठा हेरिटेज कमिटीचे सदस्य सल्लागार म्हणूनही डॉ. जामखेडकर काम पाहत होते. डॉ. जामखेडकर यांनी छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाचे (पूर्वीच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअमचे) सल्लागार व महाराष्ट्र राज्याच्या गॅझेटीअर विभागाच्या संपादक मंडळाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. आज डॉ. जामखेडकर हे भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष आहेत. मुंबई विद्यापीठांतर्गत १५ विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली पदवी बहाल करण्यात आल्या आहेत.

     अशा या ज्ञानसूर्याच्या सन्मानार्थ मुंबई विद्यापीठाने २०१४ साली ‘महाराष्ट्रातील पुरातत्त्वीय सर्वेक्षण’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. २०१५ च्या मार्च महिन्यात पुण्यातील संविद्या या संस्थेने त्यांच्या सन्मानार्थ एक आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. याच चर्चासत्रात त्यांचा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला. आजही पुरातत्त्वविद्या, प्राच्यविद्या, प्राचीन साहित्य, धर्म व तत्त्व-परंपरा अशा अनेक विषयावर त्यांचे अविरत संशोधन सुरू आहे.

डॉ. सूरज अ. पंडित

जामखेडकर, अरविंद प्रभाकर