Skip to main content
x

जोशी, दमयंती

          भारतातील ख्यातनाम कथक नृत्यांगनांपैकी एक म्हणून महाराष्ट्रातील गुरू दमयंती जोशी यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म मुंबई येथे एका सामान्य चाळीतील सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मानंतर काही महिन्यांतच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. या दुर्दैवी घटनेनंतर दमयंती यांना मातु:श्रीसोबत खडतर परिस्थितीला सामोरे जावे लागले.

त्या चार वर्षांच्या असतानाच त्यांचे नृत्यातील गुण ओळखून त्यांच्या मातोश्रींनी त्यांना सीताराम प्रसाद यांच्याकडे नेले व त्यांचे प्राथमिक नृत्य शिक्षण सुरू झाले. थोड्या काळातच गुरूंनी या शिष्येला शालेय व नृत्यातील उत्तम शिक्षणाकरिता एका उच्चभ्रू कुटुंबात सोपवावे असे त्यांच्या मातु:श्रींना सांगितले. याप्रमाणे दमयंती यांना हाफकिन इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर श्री. सोखी यांच्या पत्नी श्रीमती लीला सोखी ऊर्फ विश्वविख्यात नर्तिका मॅडम मेनका यांनी आश्रय दिला.

यामुळे दमयंती यांना लहान वयातच उच्चभ्रू व उत्तम जीवनशैली मिळाली. त्याचबरोबर इंग्रजांच्या काळात युरोपियन गव्हर्नेसकडून दीक्षा व उत्तम शाळेत शिक्षण मिळाले. हे शिक्षण चालू असतानाच हाफकिन इन्स्टिट्यूटमुळे नृत्याची तालीमपण उत्तम प्रकारे सुरू होती. स्वत: मॅडम मेनका यांच्या डोळस निगराणीत त्या अत्यंत दर्जेदार, शिस्तबद्ध व लालित्यपूर्ण नृत्यांगना म्हणून बहरत गेल्या. पुढे रुइया महाविद्यालय, मुंबई येथून इंग्रजी विषय घेऊन त्यांनी ऑनर्स ही पदवी संपादन केली. याबरोबर त्यांनी कथक नृत्यातील श्रेष्ठ गुरू पं. शंभू महाराज, पं. लच्छू महाराज, पं. रामगोपाल यांच्याकडून उत्तम मार्गदर्शन घेतले. तसेच मणिपुरी, भरतनाट्यम् या नृत्यशैलींचेही त्यांनी शिक्षण घेतले होते.

खंडाळा येथील मॅडम मेनका यांच्या नृत्यालयात विविध शैलींतील ख्यातनाम गुरू शिकवण्यासाठी येत असत, ज्याचा लाभ दमयंती जोशी यांना झाला. मॅडम मेनका यांच्या चमूसह भारतात व परदेशात (लंका, मलाया, ब्रह्मदेश, युरोप) त्यांनी आपले कलाप्रदर्शन केले.

कालांतराने दमयंती जोशी यांनी मॅडम मेनका यांचे नृत्यपथक सोडून स्वतंत्र कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. त्यांची नृत्यशैली अत्यंत नजाकतीची, ठहराव असलेली व लालित्यपूर्ण अशी होती. लखनौ व जयपूर या दोन्ही घराण्यांच्या तालमींसह इतरही नृत्यशैली शिकण्यामुळे त्यांच्या कथक नृत्यप्रस्तुतीला बाधा न येता एक वेगळी मिती प्राप्त झाली होती. विलंबित लयीत थाट, गत निकास यांमध्ये त्यांचे नैपुण्य दिसून येत असे. त्या कथकमधील सूक्ष्मतम हावभाव अतिशय सौंदर्यपूर्ण तऱ्हेने पेश करीत असत. विशेष म्हणजे, नृत्याबरोबर त्यांची वेशभूषा, अलंकार इ. अतिशय आकर्षक असत. कधी भरजरी घागरा नेसून, तर कधी भरजरी राजेशाही शालू नेसून त्या जेव्हा रंगमंचावर येत असत, तेव्हा नृत्यातील निपुणतेबरोबर चोखंदळ निवड असलेले शालीन व सुंदर रूप पाहून रसिक मंत्रमुग्ध होत असत.

भारतात व भारताबाहेर अनेक संगीत-संमेलनांमध्ये त्यांना आमंत्रित केले जाऊ लागले व त्यांचे दौरेही यशस्वी झाले. भारतातील अनेक मान्यवर संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाची पदे भूषविली. त्यात इंदिरा कला विश्वविद्यालय खैरागड आणि कथक केंद्र लखनऊ याचा उल्लेख करावा लागेल. भारत सरकारद्वारा चीन व जपान येथे जे सांस्कृतिक मंडळ पाठविले गेले, त्याच्या सदस्यत्वाचा मान दमयंती जोशी यांना मिळाला. ज्या काळी महाराष्ट्रात नृत्यकलेकडे, विशेषत: महिला कलाकारांकडे तेवढे आदराने पाहिले जात नव्हते, त्या काळी नृत्यक्षेत्रात त्यांनी स्वत:चा ठसा उमटविला व नंतर येणाऱ्या अनेक पिढ्यांना एक दालनच उघडून दिले व नृत्यकलेला समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांचे एक ज्येष्ठ शिष्य बिरेश्वर गौतम यांना त्यांच्याकडून विशेष मार्गदर्शन मिळाले. त्यांना बर्लिन (जर्मनी) येथे ‘डान्स ऑलिम्पियाड’मध्ये, ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार, दिल्ली व ‘महाराष्ट्र राज्य संगीत नृत्य अकादमी’ पुरस्कार, भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ इत्यादी महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.

अशा या बाणेदार, करारी व एकांतप्रिय कलावतीचे निधन मुंबईतील राहत्या घरी झाले. शेवटचे काही दिवस त्या पूर्ण एकाकी आणि विविध व्याधींशी झगडत होत्या. भारत सरकारने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'दमयंती जोशी 'नावाचा चित्रपट तयार केला आहे.

आसावरी राहाळकर

जोशी, दमयंती