Skip to main content
x

काठे, वासुदेव चिमणराव

   वासुदेव चिमणराव काठे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे या गावी एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक  शिक्षण जन्मगावी झाल्यावर तीन पिढ्यांपासून चालत आलेल्या द्राक्ष शेतीकडे ते वळले. शेतीमध्ये काम करत असतानाच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. ही पदवी प्राप्त करताना त्यांनी स्वतः शेतात काही प्रयोग यशस्वीपणे केले.

प्रतिकूल परिस्थितीत जमिनीची सुपीकता राखत विक्रमी द्राक्ष उत्पादन मिळवण्यासाठी त्यांनी मसाला मातीतयार केली. मसाला माती ही ५०% काळ्या मातीत २५% मुरूम आणि २५% शेणखत यांचे मिश्रण करून  तयार होते. दर नऊ फुटांवर दोन फूट रुंदीचा पट्टा करून ही माती पसरवून तिथे द्राक्ष लागवड केल्यास अत्यल्प पाणीपुरवठा करून विक्रमी द्राक्ष उत्पादन आपल्या शेतात त्यांनी करून दाखवले. या मसाला मातीच्या  प्रयोगाद्वारे त्यांनी एकरी ५० टन उत्पादन मिळवून दाखवले.

द्राक्ष शेतीला सूर्यप्रकाश अत्यंत महत्त्वाचा असतो, परंतु लहरी वातावरणाचा (ढगाळ किंवा कडक ऊन) फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसतो. यावर उपाय म्हणून सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर करण्यासाठी त्यांनी फोटोलाइट मीटरचा वापर करून पानांचे व सूर्यप्रकाशाचे नेमके व्यवस्थापन करून अत्यंत ढगाळ वातावरणातही द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळवून दाखवले. शेतीला देण्यात येणार्‍या पाण्यामध्ये काही खते निसर्गतः असतात. या पाण्यातील खतांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यात नवीन खते मिसळवून नैसर्गिक खते असलेले पाणी पिकांना देण्याच्या प्रयत्नांतही ते यशस्वी झाले. यामुळे पिकांना खतपुरवठ्याचे नियोजनही झाले. द्राक्षाच्या वाया जाणाऱ्या काड्या, पाने याद्वारेही त्यांनी खतनिर्मिती केली. तण, जनावरांचे मलमूत्र अशा बिनखर्ची घटकद्रव्यांच्या खतपुरवठ्याचे व्यवस्थापनही केले आहे. महाराष्ट्रात द्राक्ष पिकांवर प्रयोगात्मक संशोधन या विषयावरील व्याख्यानाद्वारे ते शेतकऱ्यांमध्ये जागृती करतात. द्राक्ष उत्पादनाची प्रयोगसिद्ध मूलतत्त्वेया त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात स्वतःच्या शेतात केलेल्या ७५ यशस्वी प्रयोगांसंदर्भात लेखन केलेले आहे. तसेच द्राक्ष शेतीसंदर्भात महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना ‘शेतकऱ्यांच्या ४०० प्रश्‍नांना उत्तरेया पुस्तकातून उत्तरे दिली. यास शेतकऱ्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला.

काठे यांना पूर्वा केमिकल्स नाशिक यांच्यातर्फे द्राक्षभूषण पुरस्कार (१९९९), बळीराजातर्फे संशोधक शेेतकरी पुरस्कार (२०००) मिळाले आहेत. तसेच त्यांना २००३ मध्ये द्राक्ष लागवडीच्या ७५ प्रयोगांबद्दलच्या पुस्तक लिखाणासाठी द्राक्ष बायागतदार संघ, पुणेतर्फे गौरवण्यात आले आणि मुंबई येथील राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरतर्फे रिनॉऊन्ड पर्सन २०११ हा मानाचा पुरस्कार दिला गेला.

- मानसी श्रेयस बडवे

 

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].