Skip to main content
x

कोल्हटकर, कृष्णाजी केशव

          भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातञ्जल योगदर्शनहा केवळ एकच ग्रंथ लिहून ग्रंथकार म्हणून अत्युच्च गौरव होण्याचे भाग्य कृष्णाजी केशव कोल्हटकर यांना लाभले. त्यांचा जन्म सातारा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

इंटर आटर्सपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांचे डोळे बिघडल्यामुळे पुढील शिक्षण होऊ शकले नाही. १९०१ साली त्यांनी सातारा येथील जिल्हा न्यायाधीशाच्या न्यायालयात कारकुनाची नोकरी धरली.

नंतर १९१३ साली वेस्टर्न इंडिया लाइफ इन्श्युरन्समध्ये नोकरी धरली व त्यात अधिकारी श्रेणी पर्यंत त्यांना बढती मिळाली. कृष्णाजी कोल्हटकरांचे काका गणेश राघो कोल्हटकर हे योग व वेदान्तशास्त्राचे चांगले अभ्यासक होते. त्यांनी वाई येथे प्राज्ञ पाठशाळेचे संस्थापक नारायणशास्त्री मराठे ह्यांच्याकडे वेदान्तशास्त्राचा अभ्यास केलेला होता. त्यांनीच कोल्हटकरांंना योग व वेदान्ताची गोडी लावली व मार्गदर्शन केले.

१९३७ साली सेवानिवृत्त झाल्यावर कोल्हटकर यांनी अध्यात्म व योग यांचा सखोल अभ्यास करून पातञ्जल योगदर्शनहा ग्रंथ लिहिला. पातञ्जल योगसूत्रे द्वैतमताला पोषक नसून अद्वेैत वेदान्ताला पोषक आहेत व वेदान्ताचे ते प्रायोगिक अंग आहे हा सिद्धान्त त्यांनी आपल्या ग्रंथात सप्रमाण सिद्ध केला. हा सिद्धान्त नवा असून प्रचलित द्वैतवादी सिद्धान्ताविरुद्ध आहे; पण अनेक विचारवंत, अभ्यासू साधक व बॅ. जयकर, पंडित राजेश्वरशास्त्री द्रविड, केवलानंद सरस्वतींसारख्या प्रगाढ विद्वानांनी कोल्हटकरांचा हा सिद्धान्त मान्य केला. ९ जुुलै १९७२ रोजी पुणे विद्यापीठाने कोल्हटकर यांना डी.लिट. ही पदवी प्रदान केली.

हाल-अपेष्टा व संकटांना तोंड देत, उच्च शिक्षण पदरी नसतानाही निवृत्तीनंतर एखाद्या विषयाच्या मागे झपाटल्यासारखे लागून दहा वर्षांत योगदर्शनावरील सर्वांगसुंदर ग्रंथ लिहिण्याचे त्यांचे कर्तृत्व मोेठे आहे. विद्यापीठानेही या कर्तृत्वावर आपली मान्यतेची मोहोर उमटविली आहे. यानंतर कृष्णाजी कोल्हटकरांचे शंकराचार्यांच्या विवेकचूडामणीवर लिहिलेले पुस्तक शांकर-वेदान्त-दर्शन’, तसेच महर्षी    वेदव्यास, अवतारकार्य-तत्त्वज्ञानहा ग्रंथही प्रसिद्ध झाला.

कोल्हटकरांना संसारात, तसेच त्यांच्या लिखाणातही त्यांच्या पत्नीने उत्तम साथ दिली. त्यांच्या पत्नीचे शालेय शिक्षण झालेले नसूनही योगदर्शन या ग्रंथाची पहिली आवृत्ती त्यांनी पूर्णपणे वाचून एखाद्या ठिकाणी मार्मिक सूचनाही केली. पुणे विद्यापीठाने केलेला गौरव पाहण्याआधीच त्यांच्या पत्नीने इहलोकाची यात्रा संपविलीयोगाभ्यास व अध्यात्मचिंतनात आयुष्याचा काळ व्यतीत करून वयाच्या ब्याण्णवाव्या वर्षी पुणे येथे त्यांचे निधन झाले.

डॉ. वीणा लोंढे

कोल्हटकर, कृष्णाजी केशव