Skip to main content
x

खटावकर, दत्तात्रेय श्रीधर

डी.एस.खटावकर

         पुण्यातील गणपती उत्सवात गेली चार दशके डी.एस.खटावकर यांचे नाव त्यांच्या अलंकरणात्मक गणेशमूर्ती व कलात्मक सजावटीसाठी प्रसिद्ध आहे. पुण्यातील अनेक तरुण चित्रकारांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासोबतच अलंकरणात्मक शैलीतील चित्रे काढण्यासाठीही ते प्रसिद्ध आहेत.

        दत्तात्रेय श्रीधर खटावकर यांचा जन्म पुण्यातील सुप्रसिद्ध तुळशीबाग मंदिराच्या परिसरात श्रीधर व चंद्रभागा या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, नानावाडा या शाळेत झाले. लहानपणापासूनच त्यांना चित्रकला व मूर्तिकलेची आवड होती. त्यांच्या घराजवळच असणाऱ्या दादा केळकर यांच्या ‘केळकर चित्रशाळे’तील नाटकांचे कलात्मक पडदे, हालत्या पुतळ्यांची उभारणी व साइनबोर्ड ते व्यक्तिचित्रे अशा सर्व कामांचा त्यांच्यावर  संस्कार झाला.

        शालेय शिक्षणानंतर खटावकरांनी कलाशिक्षणासाठी इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न आर्ट (सध्याचे अभिनव कला महाविद्यालय) येथे प्रवेश घेतला. रेखाकला व रंगकला या विषयांची पदविका ते  १९५३ मध्ये उत्तीर्ण झाले. याच काळात त्यांनी उपयोजित कला व हस्तकला या विषयांचेेही शिक्षण घेतले. १९५४ मध्ये त्यांचा विवाह फलटणच्या कुसुम काकडे यांच्याशी झाला.

        खटावकर १९५३ ते १९८९ या काळात कलाशिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. लोणी-काळभोरचे अध्यापक महाविद्यालय, पुण्यातील मुलींचे आगरकर विद्यालय व अभिनव कला महाविद्यालयात त्यांनी शिकविले असून १९९६ मध्ये भारती विद्यापीठ, पुणे येथे त्यांनी कलाशिक्षणविभागाची नव्याने सुरुवात केली. याशिवाय पुण्याच्या गणपतिउत्सवात खटावकर विद्यार्थ्यांसह गणेशमूर्ती व अलंकरणात्मक सजावटीच्या कामात आपला शिक्षकी पेशा सांभाळून रात्री उशिरापर्यंत व्यग्र असत. किंबहुना, त्यांच्या घराच्या जिन्याखालची जागा ही अशा प्रकारचे शिक्षण देणारी व रात्रंदिवस सुरू असणारी शिक्षणसंस्थाच होती. या संस्थेत पात्रतेची अट किंवा फी नव्हती, तसेच स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता कोणालाही मुक्त प्रवेश असे व अनेक तरुण-तरुणी यातून चित्र - शिल्पकलेकडे वळल्या.

        खटावकर १९५३ पासून तुळशीबाग या मानाच्या गणपतिउत्सवाच्या कार्यात सहभागी असून १९७५ मध्ये त्यांनी गणेशमूर्ती व सजावट करण्यासाठी फायबरग्लासचा प्रथमच वापर केला व या माध्यमाचा वापर चित्रपट व बांधकाम क्षेत्रांत पुढील काळात मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. आज हे माध्यम अत्यंत लोकप्रिय असून त्याचा कलात्मक मूर्तीसाठी महाराष्ट्रात यशस्विरीत्या प्रथम वापर करण्याचे श्रेय खटावकर यांना जाते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या नृत्यनाट्यातील १४ फूट उंचीची महिषासुरमर्दिनीची बारा भागांची व जोडता येणारी मूर्ती त्यांनीच बनविली आहे.

        याशिवाय पंढरपूर येथील संत नामदेव महाराजांचा रथ व प्रतापगडावरील भवानी देवीच्या देवळातील देवीचे मखर ही खटावकरांची फायबरग्लास या माध्यमातील महत्त्वाची कामे आहेत. अनेक पौराणिक व ऐतिहासिक देखावे आणि गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीतील त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रथ लक्षवेधक ठरले.

        सार्वजनिक उत्सव व त्यातील अलंकरणात्मक सजावटीतून सामान्य जनतेला आकर्षित करण्याचे त्यांचे कार्य, त्यांचे चिरंजीव विवेक यांनी सुरू ठेवले आहे. त्यांनी केलेली मंडईचा गणपती व दगडूशेठ हलवाई या गणपतीची कामे गाजली आहेत. याशिवाय स्मारके, शिल्पे, समारंभाची भव्य सजावट या क्षेत्रांतही खटावकर पिता-पुत्रांनी नावलौकिक संपादन केला आहे.

       - डॉ. नयना कासखेडीकर

खटावकर, दत्तात्रेय श्रीधर