महाजन, देविदास लक्ष्मण
निझामाच्या राज्यात उर्दू माध्यमातून शिक्षण घेणे सक्तीचे असताना मराठी भाषेचे वैभव लयाला जाऊ न देण्याचे कार्य ज्या-ज्या महनीय व्यक्तींनी केले, त्यांत संत दासगणू व देविदास लक्ष्मण महाजन यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. या भागात शिक्षणाचा प्रसार अतिशय कमी होता. तालुक्याच्या ठिकाणी सातव्या इयत्तेपर्यंत व जिल्ह्याच्या ठिकाणी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मिळू शकत असे. मराठवाडा सातशे वर्षे इस्लामच्या अधिपत्याखाली राहिला. मात्र या राज्यकर्त्यांना येथे फार मोठे इस्लामीकरण करता आले नाही, त्याचे कारण दारिद्य्रात राहूनही आपल्या निष्ठा न विकणारे या भागातील लोक या संतांमुळे सुसंस्कारित झाले होते.
दे.ल. महाजन यांचे मूळ नाव देविदास श्रीनिवास कुळकर्णी आहे. त्यांचे वडील श्रीनिवासराव कुळकर्णी हे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडीचे रहिवासी. कुळकर्णी यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. भजन-कीर्तन यात ते आपले मन रमवत. सगरोळीचे सरंजामदार केशवराव देशमुख हे त्यांचे नातलग होते. पत्नी गरोदर असताना बाळंतपण व्यवस्थित व्हावे म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला नांदेड येथील त्यांचे नातलग श्री. बार्हाळे यांच्याकडे आणले. तेथे त्या प्रसूत झाल्या आणि २१ जून १८९६रोजी मुलगा जन्माला आला. दुर्दैव म्हणजे बाळाची आई त्याच्या जन्मानंतर थोड्या दिवसांतच मरण पावली. त्यांच्या मावशीला आपली बहीण गेल्याचे अतिशय दु:ख झाले आणि त्यांनी बाळाला कुलक्षणी ठरवले. एका टोपलीत बाळाला घालून गावातील महादेवाच्या मंदिरात नेऊन ठेवले. गोविंदराव बिंदू हे मंदिरात देवदर्शनासाठी आले असताना हे बालक त्यांच्या दृष्टीस पडले. गोविंदराव हे अंबुताईंचे मुनीम होते. हे गोविंदराव बिंदू म्हणजेच हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रमात गाजलेले थोर स्वातंत्र्यसेनानी आणि हैद्राबाद राज्याचे नावाजलेले गृहमंत्री दिगंबरराव बिंदू यांचे वडील.
गोविंदराव बिंदू यांनी परिस्थितीचा विचार करून अंबुताईंना ‘या बाळाचा देवाचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा’ अशी विनंती केली. पुढे त्यांनी या बाळाला दत्तक घेतले. आपल्या कुलदेवतेवरून त्याचे नाव देविदास ठेवले. श्रीमती अंबुताई यांचे सगरोळीच्या देशमुखांशी जवळचे नाते होते. त्यामुळे सगरोळीकर देशमुख महाजनांचेही नातलग झाले. नंतर त्यांचा विवाह दिगंबरराव बिंदू यांचे चुलत बंधू आनंदराव यांची कन्या राजाबाई यांच्याशी झाला. त्यामुळे गृहमंत्री दिगंबरराव बिंदू व देविदास ल. महाजन यांचे नाते सासरे-जावई असे झाले. मात्र समवयस्क असल्यामुळे ते जिव्हाळ्याच्या मित्राप्रमाणेच वागले आणि पुढे मराठी भाषेच्या विकासासाठी दोघेही प्रयत्नशील राहिले.
दे. ल. महाजन यांचे शिक्षण नांदेडला शासकीय शाळेत सातव्या वर्गापर्यंत झाले होते. त्यानंतरचा काही काळ त्यांनी साधुसंतांची चरित्रे आणि विविध प्रकारचे ग्रंथ वाचण्यात व्यतीत केला आणि १९४०साली प्रतिभा निकेतन शाळेत ते शिक्षक झाले. आरंभी काही दिवस या शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोहरीर होते. त्यानंतर दे.ल. महाजन मुख्याध्यापक झाले. नंतर श्री. दत्तुसिंग गहिलोत हे मुख्याध्यापक झाले आणि हायस्कूलचे वर्ग सुरू झाल्यानंतर १९४२साली श्री. वि.द. सर्जे गुरुजी हे मुख्याध्यापक झाले. १९५५साली प्रतिभा निकेतनमध्ये नरहर कुरुंदकर शिक्षक म्हणून आले आणि शाळेला केवळ नांदेड जिल्ह्यातच नव्हे, तर सर्व मराठवाड्यात गुणवत्तेमुळे खूपच कीर्ती मिळाली.
महाजन सातवी उत्तीर्ण होते, तरी मराठी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते शिवाय उर्दू आणि हिंदी या भाषांवरही प्रभुत्व होते. संस्कृत भाषेवर त्यांनी स्वत: अभ्यास करून प्रभुत्व मिळवले. प्राचीन ग्रंथ, पुराणे, रामायण-महाभारतांसारखी आर्ष महाकाव्ये आणि वैदिक तत्त्वज्ञान यांचा त्यांनी भरपूर अभ्यास केला होता. त्यांनी हैद्राबाद येथील धुंडीराज शास्त्री यांना गुरू केले होते. शिवाय गणंजय महाराज वसमतकरही त्यांचे गुरू होते. ह.भ.प. धोंडू महाराज कंधारकर हे त्यांचे परंपरागत गुरू होते. सातवीपर्यंत शिक्षण झालेले महाजन दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी असे विषय शिकवायचे. संत दासगणू महाराजांकडून त्यांना कीर्तन करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे ती त्यांनी खूप विकसित केली. आपल्या कीर्तनात ते स्वरचित आख्याने लावत असत. ‘कीर्तनरत्नमाला’ या नियतकालिकाचे ते काही काळ संपादक होते. पुढे महाजन यांनी ‘आख्यान रत्नमाला’ नावाने ही सर्व आख्याने पुस्तकरूपाने प्रकाशित केली.
लाला रघुवीर नावाचे त्यांचे एक मित्र होते. त्यांनी महाजनांना फारसी भाषा शिकवली. शिवाय त्यांच्याकडूनच त्यांनी ‘तुलसी रामायण’ समजून घेतले. हा ग्रंथ त्यांना एवढा आवडला की, त्यांनी ‘मानसचरित्र’ या नावाने तुलसीदासाच्या रामायणाचा मराठीतून काव्यात्म अनुवाद केला. साहित्य संमेलनातही त्यांचे कीर्तनाचे कार्यक्रम होत असत. स्वत: सनातनी असूनही ते राजकीय, सामाजिक संदर्भ डोळ्यांसमोर ठेवून एखाद्या सुधारकाप्रमाणे टीकाटिप्पणी करत असत. नव्या मूल्यांचा आदर करून सुधारणावादी गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारांचा ते तळमळीने प्रचार करत. पुढे त्यांनी इंग्लिश भाषाही शिकून घेतली.
दे.ल. महाजनांचे दत्तक येण्यापूर्वीचे वडीलबंधू दुर्वर्तनी व व्यसनी होते. त्यांनी इस्लाम धर्माची दीक्षा घेतली होती. त्यांच्या निधनानंतर महाराजांनी कुणाचीही पर्वा न करता त्यांचा अंत्यविधी हिंदू पद्धतीने केला आणि श्राद्धही केले. यामुळे नांदेडच्या सनातनी पुरोहितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. पुढे अनेकांनी मध्यस्थी केल्यामुळे महाजनांवरील बहिष्कार उठला. त्यांची हिंमत, विद्वत्ता आणि वक्तृत्व यांचे मोठेपण त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यास कारणीभूत झाले. आगरकरांबरोबर महर्षी कर्व्यांचाही त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्या काळी त्यांनी हिंमतीने सगळ्यांचे म्हणणे झुगारून दोन विधवा स्त्रियांची लग्ने लावून दिली होती.
महाजन हे हरिदासी कीर्तनकार होते. संगीत महर्षी अण्णासाहेब गुंजकर हे हार्मोनियमची व रंगनाथबुवा देगलूरकर तबल्याची साथ त्यांना कीर्तनात करत असत. अत्यंत साधे राहणारे महाजन सातत्याने व्यासंगमग्न असत. स्फुटकाव्य, चरित्रकाव्य, आख्यानकाव्य, खंडकाव्य, अनुवादित काव्य असे अनेक काव्यप्रकार त्यांनी हाताळले. ‘महाजन साहित्य मंडळा’ने त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांतील महत्त्वाची म्हणजे ‘महाजनांची कविता’, ‘मोत्याची मागणी’, ‘आख्यान रत्नमाला’ (चार भाग), ‘नामदेव महाराजांचे चरित्र’ हे त्यांचे स्वत:चे ग्रंथ, तर ‘मानसविहार’, ‘देवीमाहात्म्यसार’, ‘भर्तृहरी शतकत्रयम्’, ‘गुरुपरंपरा’ (दोन भाग), ‘मनोबोधसार’, ‘महाराष्ट्र गीतांजली’ ही त्यांची अनुवादित पुस्तके होत.
निझामाच्या काळात उर्दूचे गोडवे गायले जात असताना, मराठी भाषेचे महत्त्व जनमानसात टिकवण्याचे काम करणे अत्यंत अवघड होते. कुणालाही न दुखावता मराठीचे मोठेपण जाहीरपणे सांगण्याची हिंमत त्यांनी दाखवली. सुधारणावाद जपला आणि इस्लाम राजवटीचा प्रभाव आणि भीती असताना माणसांची अस्मिता टिकवली. हे त्यांचे कार्य कधीही विसरता येणार नाही.