मुझुमदार, वासंती अरुण
ललित गद्य लेखन, कविता, चित्रकला, संगीत अशा सर्व कलागुणांनी संपन्न व्यक्तिमत्त्व लाभलेल्या वासंती मुझुमदार यांचा जन्म कर्हाड येथे झाला. अतिशय तरल व संपन्न असे भावविश्व लाभलेल्या या कवयित्रीला चित्रकला व संगीत यांचेही देणे असल्याने त्यांच्या कवितेला व ललितलेखनाला एक वेगळी उंची लाभली होती. आपल्या नादपूर्ण व लयबद्ध शैलीने त्यांनी प्रथमपासूनच काव्य-रसिकांना भुरळ घातली होती. एम.ए.ही पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी अधिक आत्मविश्वासाने काव्यलेखन केले. वासंती वळवडे या आपल्या पूर्वाश्रमीच्या नावानेच त्यांनी कविता लिहित. पुढे रसिकांचा प्रतिसाद मिळाल्यावर वळवडेचे मुजुमदार झाले. काहीसे गूढ, धूसर तरीही भावविभोर असे भावविश्व त्यांच्या काव्यातून प्रकटते. त्यांच्या काव्यलेखनावर इंदिरा संत यांचा प्रभाव होता.
‘सहेला रे’ (१९८३), ‘सनेही’ (१९९७) हे त्यांचे काव्यसंग्रह कृष्णाकाठच्या गावाचे व संस्कृतीचे दर्शन घडवणारे ‘नदीकाठी’ हा त्यांचा ललितलेखसंग्रह. ‘रुची’ (संगीत विशेषांक), ‘श्री.पु.व्यक्ती आणि संपादक’ (१९९३), ‘साहित्याची भूमी’ (१९९७) इत्यादी पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले होते. वासंती मुझुमदार यांची पुस्तकांच्या मुखपृष्ठांवरची चित्रेही वाखाणण्यासारखी आहेत. ‘इंडियन हेरिटेज’ या ग्रंथांचे संपादन व सजावट वासंती मुझुुमदार यांची आहे. मानवी नाती व त्यांचा परस्पर संबंध यांचे मनोज्ञ दर्शन त्यांच्या साहित्यात घडते. लेखकाच्या व कवीच्या मनातले भाव नेमकेपणाने चित्रात टिपण्याची ताकदही त्यांच्या कुंचल्यामध्ये होती. लेखणी व कुंचला यांचा दुर्मीळ संगम असणारे हे व्यक्तिमत्त्व ७नोव्हेंबर, २००३ रोजी काळाच्या पडद्याआड गेले.