Skip to main content
x

नागेशकर, विश्वनाथ गोविंद

चित्रकार

चित्रकार विश्‍वनाथ गोविंद नागेशकर यांचा जन्म गोव्यात नागेशी येथे झाला. त्यांचे कलाशिक्षण मुंबई, पॅरिस व जर्मनी येथे झाले. त्यांचे वास्तव्य जर्मनीत होते. दुसर्‍या महायुद्धात बर्लिन व वूल्झबर्ग येथील त्यांचा स्टूडिओ आतल्या चित्रांसकट उद्ध्वस्त झाला. युद्धामुळे त्यांची जर्मन प्रेयसीशी ताटातूट झाली. अशा विलक्षण कलाटण्या मिळालेल्या या चित्रकाराच्या निर्मितीला भारतीय व पाश्‍चात्त्य जगातील समाजजीवन, कलामूल्ये व महत्त्वाच्या राजकीय घटनांचा संदर्भ आहे.

विश़वनाथ नागेशकर यांच्या आईचे नाव राधाबाई होते. त्यांना सात अपत्ये होती. हे कुटुंब खाऊनपिऊन सुस्थितीत होते. गोविंदरावांचे अचानक निधन झाल्याने हा परिवार चरितार्थाकरिता कोल्हापूरला आला. नागेशकरांचे शालेय शिक्षण ‘प्रायव्हेट हायस्कूल’ या शाळेत झाले. विसाव्या वर्षापर्यंत ते कोल्हापूरमध्ये होते. या काळात त्यांच्यावर कोल्हापूरच्या कलात्मक वातावरणाचा संस्कार झाला. कोल्हापुरातील बाबूराव पेंटर आदींच्या सल्ल्याने त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. तेथे १९२७ ते १९३० या काळात त्यांनी शिक्षण घेतले. कोल्हापूरच्या संस्थानिकांचे आर्थिक साहाय्य मिळवून ते पॅरिसमधील ‘एकोल नॅशनल सुपिरिअर द ब्यू आर्ट’ या शैक्षणिक संस्थेत १९३३ मध्ये दाखल झाले.

पॅरिसमधील शिक्षण संपल्यावर ते १९३५ मध्ये भारतात परतले. त्यांनी १९३६-३७ या दोन वर्षात मुंबईत व्यावसायिक चित्रकार म्हणून काम केले. चित्रकलेचे शिक्षण देण्यासाठी त्यांनी ‘अकादमी नागेशकर’ ही संस्था स्थापन केली. पण येथील सामाजिक परिस्थितीशी व कलाक्षेत्राशी ते समरस होऊ शकले नाहीत. ते भारत सोडून जर्मनीतील म्यूनिक येथील कून्स्ट अकॅडमीमध्ये विद्यार्थी म्हणून दाखल झाले (१९३८ ते १९४०) व तेथे आपले बस्तान बसवू लागले. अर्थार्जनासाठी ते फिल्म आर्किटेक्ट म्हणून चित्रपट कलादिग्दर्शनाच्या क्षेत्रात काम करीत. याच दरम्यान दुसर्‍या महायुद्धापूर्वीच्या उद्रेकांना सुरुवात झाली होती. परंतु त्यांनी तेथेच परदेशी राहण्याचा निर्णय घेतला. तथापि, बॉम्बहल्ल्यात त्यांचा स्टूडिओ जळून खाक झाला. त्यांना निर्वासित म्हणून १९४५ पर्यंत वूल्झबर्ग येथे राहावे लागले. भारत तेव्हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असल्याने जर्मनीत ते शत्रूपक्षाचे, ब्रिटनचे नागरीक होते. एका युद्धकारवाईत नागेशकरांना तुरुंगात डांबण्यात आले.

याच काळात जर्मन युवती एडना हेनिंग्सनशी नागेशकरांचे प्रेमसंबंध जुळले होते. तिच्या घरी यासाठी मान्यता नसल्याने ती घराबाहेर पडली व त्यांच्याबरोबर राहू लागली. परंतु महायुद्धाच्या धुमश्‍चक्रीत त्यांची ताटातूट झाली. जर्मनीचा पराभव होऊन दुसरे महायुद्ध संपत आले. या जीवन-मृत्यूच्या संघर्षात नागेशकर ब्रिटिश नागरीक असल्यामुळे कसेबसे लंडनला थडकले. हा प्रवास त्यांना गर्दीमुळे गाडीच्या शौचालयातून करावा लागला.

लंडनला पोहोचल्यावर आपली घडी बसविण्याचा, स्थिरावण्याचा त्यांचा खटाटोप पुन: सुरू झाला. शासनातर्फे एडनाचा शोध घेणेही सुरू झाले. हे सर्व घडत असताना, १२ ऑगस्ट १९४६ रोजी त्यांनी लंडनमध्ये साठ चित्रांचे एक प्रदर्शन भरविले होते. त्यांतील काही चित्रे युद्धामुळे होणारा विध्वंस, विनाश, वेदना, मृत्यूचे तांडव अशा अनुभवांवर आधारित होती.

दरम्यान एडनाचा शोध लागून ती लंडनला येऊन पोहोचली आणि ते दोघे १९४७ मध्ये लंडन येथे विवाहबद्ध झाले. १९५३ पर्यंत हे जोडपे लंडन येथे होते. नंतर १९५४ मध्ये त्यांनी जर्मनीला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पुढील आयुष्यात चरितार्थासाठी त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. ‘फ्री लान्स आर्टिस्ट’ म्हणून त्यांनी पुस्तकासाठी चित्रे काढली. व्यावसायिक कामांबरोबरच सातत्याने स्वत:ची चित्रनिर्मितीही केली. या दरम्यान त्यांनी पॅरिस, म्यूनिक, वूल्झबर्ग, फ्रँकफर्ट इत्यादी ठिकाणी चित्रप्रदर्शने केली. पाश्‍चात्त्य देशांतील अनेक महत्त्वाची कलाकेंद्रे त्यांनी पाहिली.

नागेशकरांच्या कलानिर्मितीत व्यक्तिचित्रे, व्यक्तिसमूहचित्रे, निसर्गचित्रे, धार्मिक विषयांवरील चित्रे, कामचित्रे (एरोटिक), युद्धसंहार व त्याचे भयंकर परिणाम, भारतीय व पाश्‍चिमात्यांचे दैनंदिन व्यवहार इत्यादी विविधता आहे. त्याचबरोबर आशा-निराशा, सुख-दु:ख, वेदना, वात्सल्य, समर्पण, त्याग, दिव्यत्व, अनपेक्षित घटना अशा सनातन मानवी भावना व्यक्त होणारी चित्रेही आहेत. काही चित्रांतल्या मनुष्याकृतींतून गोगँ, पिकासो यांचा प्रभाव जाणवतो. मानवी शरीरासाठी त्यांनी काही वेळा भडक किंवा सौम्य निळा, जांभळा, हिरवा अशा रंगछटांचा वापर करून अवयवांची गोलाई, कोन व चेहर्‍याचे घाट सूचित करण्यासाठी त्याच रंगाची वेगळी छटा कलात्मकतेने वापरली आहे.

नागेशकरांच्या निर्मितीत रंगांपेक्षा आकाराला अधिक महत्त्व आहे. तो आकार अधिक आशयघन करण्यासाठी रंग येतो. त्यांच्या व्यक्तिरेखांतून, पार्श्‍वभूमीतून अपरिहार्यपणे पाश्‍चात्त्य जग सूचित होत असले तरी भारतीय जीवन संस्कृती, भारतीय कलाशैलीही सातत्याने डोकावत राहिली. जे.जे.मध्ये शिकतेवेळी तेथे ब्रिटिशांच्या अकॅडमिक पद्धतीवर भर होता. तसेच, स्वातंत्र्यचळवळीमुळे प्रेरित झालेल्या पुनरुज्जीवनवादी (रेव्हायव्हलिस्ट) शैलीतही काही विद्यार्थी व चित्रकार काम करीत असत. नागेशकरांनी युरोपमध्ये राहूनही या दोन्ही शैलींत समर्थपणे काम केले आणि विषयांच्या हाताळणीतून मातृभूमीविषयीची ओढ जपली. जलरंग व तैलरंग ही दोन्ही माध्यमे त्यांना चांगली अवगत होती.

फ्रेंच राज्यक्रांती, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध यांच्या परिणामी पाश्‍चात्य कलाजगतात अनेक कलाप्रवाह (इझम्स) निर्माण झाले होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपमध्ये झालेल्या या कलाचळवळी, त्यांतील प्रायोगिकता त्यांनी बरीच जवळून अनुभवली. जर्मनीत बहरलेल्या अभिव्यक्तिवादाचा (एक्स्प्रेशनिझम) खोल परिणाम त्यांच्या चित्रांवर झाला. तसेच दादाइझम, फॉव्हिझम या प्रतिक्रियात्मक चळवळींचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या चित्रशैलीवर झाला.

दुसर्‍या महायुद्धानंतरच्या युरोपियन कलेतील बंडखोरी नकारात्मक, हिडीस, विध्वंसक रूपाने त्या काळातील चित्रांतून व्यक्त झाली होती. पण विशेष म्हणजे, युद्धात झालेल्या संहाराची प्रत्यक्ष झळ लागूनही नागेशकरांच्या निर्मितीवर नकारात्मक परिणाम झाला नाही. माणूस व चित्रकार म्हणून हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

केवळ जिवंत राहण्यासाठी आणि चित्रकार म्हणून जगण्यासाठी अनेक हालअपेष्टा नागेशकरांच्या वाट्याला आल्या तरी त्यांची निर्मितीतील प्रयोगशीलता लोपली नाही. विविध कलाशैलींच्या प्रभावांतून विविध अनुभव चित्रित होत असताना कलेचा परिपूर्ण आविष्कार त्यांच्या चित्रांमधून झाल्याचे आढळत नाही. चित्रांवर कोणत्या ना कोणत्या शैलीचा प्रभाव ही त्यांच्या कलानिर्मितीची मर्यादा ठरली. याचे कारण, त्यांच्या वाट्याला आलेली परिस्थिती किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मर्यादा असेल.

विलक्षण कलाटणीपूर्ण जीवन व सातत्याने कलानिर्मिती हे त्यांचे ठळक विशेष आहेत. त्या काळात पाश्‍चात्त्य देशात स्थायिक होणार्‍या भारतीयांच्या द्विधा मानसिकतेचे प्रतिनिधित्व करणारा हा चित्रकार आहे. एकंदरीत त्यांची वाटचाल यथार्थवादी व भारतीय शैलीकडून जर्मन अभिव्यक्तिवादाकडे झाली. पण मायभूमीचे संस्कार बीजरूपाने कायम राहिले.

नागेशकरांना त्यांच्या संसारात व कलाप्रवासात पत्नी एडनाची मन:पूर्वक साथ आयुष्यभर लाभली. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात एडनासह भारतात येऊन राहण्याची त्यांची इच्छा होती. परंतु एडनाला अल्झायमरने ग्रसल्यामुळे हा बेत प्रत्यक्षात आला नाही. दुर्दैवाने, नागेशकरांचे हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर एडनाला तिथे वृध्दाश्रमासारख्या संस्थेत दाखल करण्यात आले.

त्यांच्या मृत्युपत्रानुसार कोल्हापूरमधील नाते-वाइकांकडे सुपूर्द झालेल्या चित्रांचे प्रदर्शन, मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत नोव्हेंबर २००४ मध्ये ‘मास्टर स्ट्रोक्स’ या मालिकेत झाले. हे त्यांचे भारतातील पहिले चित्रप्रदर्शन होते.

- साधना बहुळकर

संदर्भ: ‘मास्टर स्ट्रोक्स ३’; एक्झिबिशन कॅटलॉग; जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई; २००४.

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].