Skip to main content
x

निंबाळकर, वामन सुदामा

      विद्यार्थी चळवळ आणि सामाजिक चळवळ यांत भाग घेणारे दलित कवी, ‘अस्मितादर्श’ व ‘लोकायतन’ यांचे संपादक वामन निंबाळकर होय. विद्रोही भावनांचे भावोत्कट दर्शन त्यांच्या कवितेतून घडते. त्यांची कविता भावनाप्रधान आहे. विचारांच्या प्रखरतेपेक्षा अनुभूतीतील वेदना ते अधिक प्रभावीपणे मांडतात.

‘गावकुसाबाहेरील कविता’ १९७३ व १९७९ या निंबाळकरांच्या पहिल्या काव्यसंग्रहालाच वाचकांनी, मान्यवर समीक्षकांनी मनापासून दाद दिली. याच्या दोन आवृत्त्या निघाल्या. शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमातील पुस्तकातून यातील काही कवितांचा समावेश झाला आहे. इंग्रजी, हिंदी, गुजराती, तेलगू इत्यादी भाषांमध्येही काही कवितांची भाषांतरे झाली आहेत. ‘माय’ या कवितेने तर अनेकांना अंतर्मुख केले, रडविले. ‘गावकुसाबाहेरील कविता’ हा दलित साहित्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

यानंतरचा त्यांचा दुसरा संग्रह आहे ‘महायुद्ध’. या संग्रहातील कविता मराठीतील वाङ्मयीन व कवितेला वाहिलेल्या दर्जेदार नियतकालिकातून यापूर्वी प्रकाशित झाल्या आहेत.

‘महाकवी डॉ. आंबेडकर’ (१९९२) हा आंबेडकरांचा राष्ट्रवाद, निरीश्वरवाद, शिक्षणविषयक विचार, सामाजिक विचार, बौद्ध संस्कारांचा स्वीकार इत्यादीचा अतिशय थोडक्यात परिचय करून देणारा हा लेखसंग्रह आहे.

‘गावकुसाबाहेरील कविता’ (१९७३), ‘दलित साहित्य: स्वरूप व भूमिका’ (समीक्षा), ‘आंबेडकरी विचारांची दिशा’, ‘अस्मितादर्शची नऊ वर्षे’, ‘दलित साहित्य- एक वाङ्मयीन चळवळ’ अशी निंबाळकरांची ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या ‘महायुद्ध’ (१९८७) या काव्यसंग्रहाला राज्य पुरस्कार मिळाला. ‘सामाजिक लोकशाहीचे प्रणेते - डॉ.बाबासाहेब आंबेडकर’, ‘अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन, अध्यक्षीय भाषणे’, ‘दलितांचे विद्रोही वाङ्मय’, ‘भीमसंदेश’, ‘प्रबोधन’, ‘लोकायत’, ‘अस्मितादर्श’, ‘समुचित’ इत्यादी नियतकालिकांचे आणि विशेषांकांचे संपादन त्यांनी केले.

निंबाळकर एका अविचल काव्यनिष्ठेने आणि सखोल सामाजिक जाणिवेने काव्यलेखन करतात. त्यांची कविता एका परिपक्व व एका समृद्ध मनाचा आविष्कार आहे. या कवितेत विद्रोह आहे, बेचैनी आहे. प्रतिकूलतेतून वाट काढण्याचे सामर्थ्य आहे. गावकुसाबाहेरील दुःखाचे प्रतिनिधित्व करणार्‍या त्यांच्या कवितेची भाषा स्वतंत्र आहे.

प्रस्थापित शब्दप्रभूंना ही कविता विचार करायला लावताना म्हणते-

‘या गावकुसाबाहेरचे वाळलेले,

चिरडलेले जीवनविषय झालाच नाही,

तुमच्या कवितेचा...’

निंबाळकर यांनी मांडलेले वास्तव दाहक आहे, कठोर आहे आणि विशेष म्हणजे मराठी कवितेला हे नवे आहे. 

- प्रा. मंगला गोखले

निंबाळकर, वामन सुदामा