Skip to main content
x

निस्ताने, अमृत झांगोजी

मृत झांगोजी निस्ताने यांचा जन्म गोकुळाष्टमीच्या दिवशी हरदोली येथे, आत्याच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव बयाबाई होते. त्यांचे वडील झांगोजी ऊर्फ बाबाजी हे चांदूर तालुक्यात शिदोडी गावी शेतीवाडी व तंबाखूचा व्यवसाय करीत आणि एकतारीवर भजने म्हणत असत. अमृत निस्तानेंचे शालेय शिक्षण वर्धा येथे झाले. तिथे संगीत शिक्षक राघोबाजी मुठाळ त्यांना संगीताचे पाठ देऊ लागले. त्यांनी १९२७ मध्ये शिक्षक प्रशिक्षण घेण्यासाठी नागपूर येथील नॉर्मल स्कूलमध्ये प्रवेश घेतला.
नागपूर नगरपालिकेच्या महाल प्राथमिक शाळेत ९ सप्टेंबर १९२८ पासून अमृत निस्ताने शिक्षक या नात्याने रुजू झाले. तेव्हापासून ते नागपूरलाच स्थायिक झाले. मुठाळ गुरुजी यांचीही बदली होऊन त्याच शाळेत आल्याने त्यांचा संगीताचा अभ्यास त्यांच्याकडेच चालू राहिला. १९२९ मध्ये निस्ताने चतुर संगीत महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून दाखल झाले. सहाध्यायांशी झालेल्या मतभेदामुळे निस्ताने यांनी १९३३ साली संस्था सोडली व घरीच रियाज सुरू केला. त्यांचा आवाज जाडाभरडा होता. पण जिद्द व मेहनती स्वभावामुळे ते घरी वर्ग घेऊ लागले.
ते १९३४ मध्ये संगीत विशारद झाले. ते १९५६ मध्ये लखनौ संगीत विद्यापीठातर्फे ‘संगीत निपुण’ झाले. त्यांचा १९३२ मध्ये सुलोचनाबाई शिंदे यांच्याशी विवाह झाला होता. दुर्दैवाने त्यांच्या पत्नीचे १९४५ मध्ये निधन झाले. पुढच्याच वर्षी त्यांनी कमलाबाई घोंगे यांच्याशी विवाह केला.
भाटेबुवांच्या नाट्यकला प्रवर्तक संगीत नाटक कंपनीचे नागपुरात आगमन झाले आणि कंपनीतील नारूकाका पुणेकर या कलाकारांकडून निस्ताने यांनी दुर्मिळ चिजा घेतल्या. संगीत दिग्दर्शनाचे तंत्र समजून घेऊन त्यांनी ‘दोन बायका’ या नाटकाचे संगीत दिग्दर्शनही केले. मास्तरांनी १९४४-४५ मध्ये ‘नाथ गायन वादनालया’त संगीत शिक्षकाचे काम केले.
ते १९४५ मध्ये चतुर संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्य करू लागले. संस्थेची १९४९ मध्ये घटना व १९५० मध्ये नोंदणी करून सरकारी मान्यताही मिळवली.  संस्थेला १९५४ पासून सरकारी अनुदानही मिळू लागले. ही संस्था १९४१ ते १९५८ पर्यंत लखनौ विद्यापीठाशी संलग्न होती. नंतर १९५८ ते १९७० पर्यंत खैरागडच्या इंदिरा संगीत कला विद्यापीठाशी व पुढे अ.भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाशी संलग्न होती. ते १९६६ मध्ये प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले.
अमृत निस्ताने यांनी अरुणकंस, गोपीकंस व रामबहार या नवीन रागांची निर्मिती केली व चिजाही रचल्या. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या शिष्य-परिवारात राजेश्वर बोबडे, बाळासाहेब पुरोहित, प्रमिला बेलसरे, पुष्पा जोशी, कमल इंगळे, नागरीकर, सुषमा चितळे, अळेकर भगिनी, कल्पना गोखले, कृष्णा दयमवार, गीता मुजुमदार, सुरेखा झाडगावकर, अशोक मंजुळे, माईसाहेब चांदूरकर, विमल कुलकर्णी इत्यादी शिष्यांचा समावेश होता.

         — वि. . जोशी

निस्ताने, अमृत झांगोजी