पोहनकर, अजय जनार्दन
जनार्दन शंकर पोहनकर व सुशीलाबाई यांच्या पोटी अजय पोहनकर यांचा जन्म जबलपूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण महाराष्ट्र हायस्कूल येथे तर सेंट अलायन्सेस महाविद्यालय जबलपूर येथे महाविद्यालयीन शिक्षण झाले. अजय पोहनकर यांच्या मातोश्री सुशीलाबाई या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. त्यामुळे त्यांच्यावर गाण्याचे मुख्य संस्कार त्यांच्या आईकडूनच झाले.
अजय पोहनकरांना गायनाची संधी वयाच्या सातव्या वर्षी नागपूर येथील एका संगीत संम्मेलनामध्ये मिळाली. नऊ वर्षांचे असताना त्यांना कलकत्ता येथील कार्यक्रमात तत्कालीन नामांकित गायक केसरबाई केरकर, विलायत खाँ, ओंकारनाथ ठाकूर यांच्या बरोबरीने गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर संगीत अलंकार परीक्षेत त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. १९५९-१९६० साली पोहनकरांना सवाई गंधर्व कार्यक्रमात गाण्याचा बहुमान मिळाला. गाण्यात सौंदर्याची स्थळे दाखवून देणे हे अजय पोहनकरांच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. ख्याल शास्त्रीय गायनाबरोबरच ते ठुमरी, दादरा, गझल इत्यादी उपशास्त्रीय संगीताचे प्रकारही मनःपूर्वक व खुलावून गातात.
गायन सादरीकरणात मूर्च्छना हा प्रकार ते वैशिष्ट्यपूर्णतेने सादर करतात. गायनाचे कुठलेच प्रकार ते निषिद्ध मानत नाहीत. ह्या सर्व गायनाच्या वाटचालीत त्यांच्या पत्नी अंजली पोहनकर यांची तेवढीच समर्थ साथ त्यांना लाभली आहे. अजय पोहनकरांनी गाण्याचे नाते आधुनिक रूपात त्यांचा मुलगा अभिजित पोहनकर याच्या सोबत ‘फ्यूजन’ या प्रकारातील ‘पिया बावरी’, ‘सजनवा’ या ध्वनिमुद्रिकांतून सादर केले आहे. ‘संगीत प्रवीण’, ‘सूरमणी’, ‘माणिक वर्मा पुरस्कार’, या पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. त्यांना मध्य प्रदेश सरकारकडून ‘तानसेन’ पुरस्काराने (२००९-१०) सन्मानित करण्यात आले तसेच ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (२०१२) मिळाला.