Skip to main content
x

पोरे, चंद्रकांत उमेश्वर

          चंद्रकांत पोरे व रविकिरण पोरे या बंधूंनी सोलापुरात एका छोट्या जागेत स्टूडिओ स्थापन करून व्यंगचित्रे, उपयोजितकलेची कामे, व्यक्तिचित्रे अशा अनेक कामांची सुरुवात केली. महाराष्ट्रात व्यंगचित्रकलेत विशेष नाव कमावले. चंद्रकांत उमेश्वर पोरे यांचा कलात्मक हात आणि रविकिरण पोरे यांच्या कल्पना यांतून साकार झालेल्या अनेक कलाकृती पुरस्कारप्राप्त ठरल्या आहेत. सोलापुरात जन्मलेल्या चंद्रकांत पोरे यांना कलेचा वारसा वडील उमेश्वर पोरे यांच्याकडून मिळाला. चंद्रकांत यांच्या वडिलांचे अकाली निधन झाल्यावर आईने पाच भावंडांचे संगोपन केले व चंद्रकांत यांच्या कलेला प्रोत्साहन दिले. व्यंगचित्रकला व तैलरंगातील व्यक्तिचित्रण यांमध्ये त्यांनी विशेष कसब प्राप्त केले. त्यांचे शिक्षण एम.कॉम.पर्यंत झाले होते. सोलापूर डीसीसी बँक व जनता बँक यांतील व अनेक सामाजिक संस्थांमधील पदाधिकार्‍यांची शंभराहून अधिक व्यक्तिचित्रे त्यांनी साकारली.

साहित्य, संगीत, राजकारण, कलाक्षेत्रातील घडामोडी यांविषयी नेमके भाष्य करण्यासाठी पोरे यांनी व्यंगचित्रकला आत्मसात केली. स्थानिक वर्तमानपत्रांपासून लोकप्रभा’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’, ‘सामनायांमध्ये व आवाज’, ‘किस्त्रीमयांसारख्या दिवाळी अंकांतून त्यांची कथाचित्रे व व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली. नाटकाच्या जाहिरातीत त्यांनी व्यंगचित्रांचा कल्पकतेने वापर केला. त्यांनी मुंबईतल्या अनेक व्यावसायिक नाटकांच्या जाहिराती केल्या.

ऑल दि बेस्टया नाटकाची जाहिरात करताना त्यांनी चार्ली चॅप्लिनच्या व्यंगचित्राचा उपयोग केला. तिकिटघराच्या खिडकीतून चार्ली चॅप्लिन वाकून बघतोय आणि म्हणतोय, ‘असं आहे तरी काय या नाटकात?’ या संकल्पनेच्या कल्पकतेमुळे नाटकाचा प्रेक्षक वाढण्यास मदत झाली आणि मोहन वाघ यांनी त्यांच्याकडून अनेक डिझाइन्स करून घेतली. या जाहिरातीमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

 पोरे यांनी चित्रकलेची कोणतीही पदवी न घेता, अविरत कष्ट करून नाव कमावले व कलाक्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले. एखाद्या घटनेवर विनोदी टिप्पणी करणे, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये शोधणे, नाटक, गाणी, सिनेमा यांच्या नोंदी स्मरणात पक्क्या ठेवणे या त्यांच्या स्वभावामुळे महाराष्ट्रात त्यांचे नाव झाले. त्यांच्याकडे व्यंगचित्रकलेला आवश्यक असलेले गुण, अभिजात चित्रकलेला आवश्यक असणारा हात व सतत कष्ट करण्याची वृत्ती होती. ते व्यक्तिचित्रणात अत्यंत तपशिलाने काम करीत असत.

चंद्रकांत पोरे व्यंगचित्र अत्यंत कमी वेळात पूर्ण करण्याची यांच्याकडे हातोटी होती. सोलापूरची व्यंगचित्रकारांची परंपरा त्यांनी प्रगल्भ केली. आकर्षक मुखपृष्ठ व रंगमंच सजावट, उत्कृष्ट कलात्मक जाहिरात म्हणजे पोरे ब्रदर्सअशी ख्याती चंद्रकांत पोरे यांच्यामुळेच प्राप्त झाली.

- संपादकीय विभाग

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].