प्रभू, आर.आर.
जाहिरातक्षेत्रात छायाचित्रकला आणणारे आणि जाहिरात संकल्पनेच्या संदर्भात छायाचित्रांना कलात्मक दर्जा देणारे छायाचित्रकार आर.आर. ऊर्फ राया प्रभू यांनी १९३० च्या दशकात एका अडगळीच्या खोलीत छायाचित्रकलेची सुरुवात केली. त्यांना १९३६ मध्ये ‘सिने लॅबोरेटरीज’मध्ये नोकरी मिळाली. या प्रयोगशाळेच्या मालकाच्याच चित्रपटनिर्मिती विभागात ते १९४० मध्ये रुजू झाले आणि अल्पावधीतच स्थिर छायाचित्रकार (स्टील फोटोग्राफर ) म्हणून त्यांनी प्रावीण्य मिळवले.
त्यांनी १९४२ ते १९४४ पर्यंतची दोन-तीन वर्षे आर्मी फिल्म सेंटरच्या डार्क रूममध्ये काम करण्यात घालवली. मुंबईच्या गोदीत (बॉम्बे डॉक्समध्ये) १९४४ मध्ये स्फोट झाला, तेव्हा प्रभू यांना छायाचित्रे घेण्यासाठी तिथे पाठवण्यात आले. तिथे चार दिवसांत त्यांनी एक हजाराहून अधिक छायाचित्रे घेतली. प्रभूंना या कामामुळे बढती मिळाली आणि लघुचित्रपट करण्याची सुविधा त्यांना प्राप्त झाली. प्रभू यांच्या दृष्टीने व्यावसायिक छायाचित्रकलेचा हा पहिला अनुभव होता.
लवकरच प्रभू यांनी आपल्या दोन सहकार्यांच्या मदतीने मुंबईतला पहिला कमर्शिअल स्टुडीओ सुरू केला. त्यांनी प्रथितयश जाहिरात संस्थांची कामे करण्यास सुरुवात केली. स्ट्रोनॅक एजन्सीतर्फे त्यांना ‘लाइफ’ या नियतकालिकासाठी खेड्डा येथील जंगली हत्तींची छायाचित्रे घेण्याचे काम मिळाले. डी.जे.कीमर या एजन्सीने त्यांना भारतातील चहाचे मळे छायाचित्रित करण्याची कामगिरी दिली.
सिस्टास जाहिरात संस्थेतर्फे ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रात प्रभू यांचे छायाचित्र असलेली पहिली जाहिरात प्रसिद्ध झाली. तोपर्यंत जाहिरातींचा सारा भर लाइन इलस्ट्रेशन्स किंवा स्क्रेपरबोर्ड चित्रांवर असे.
वृत्तपत्रांच्या मुद्रणाला तंत्रज्ञानाच्या आणि कागदाच्या बऱ्याच मर्यादा होत्या. त्यामुळे छायाचित्रे छापायची तर ती क्वार्टरटोन करून छापावी लागत. या तांत्रिक मर्यादा लक्षात घेऊन प्रभू यांनी आपली छायाचित्रणाची पद्धत विकसित केली.
जाहिरातीत छायाचित्रे येत ती उत्पादित वस्तूंची किंवा अशा वस्तू अथवा उत्पादने वापरणाऱ्या व्यक्तींची. आई, गृहिणी, सिनेतारका, लहान मुले अशा प्रातिनिधिक व्यक्तिरेखांसाठी मॉडेल्स निवडल्यानंतर जाहिरातीतील मजकुराशी सुसंगत अशी वातावरणनिर्मिती करून प्रभू छायाचित्रे घेत.
प्रभू यांनी लिंटास व इतर अग्रगण्य जाहिरात संस्थांसाठी छायाचित्रणाची कामे केली. जाहिरात छायाचित्रणामध्ये त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले, तसेच अनेक छायाचित्रकारही घडवले. आज जाहिरात छायाचित्रणात अनेक शाखा निर्माण झाल्या आहेत. त्याची सुरुवात आर.आर. प्रभू यांनीच केली.
- दीपक घारे, रंजन जोशी